सोलापूर : जलजीवन मिशनच्या (Jaljeevan Mission) कामात प्रथमदर्शनी गैरव्यवहार झाल्याचा अहवाल बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी यांच्या समितीने सादर केला आहे.
या अहवालावरून जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिली.
उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचे कामाला शासनाच्या परवानगी शिवाय स्थगिती दिल्याने स्मार्ट सिटीचे तत्कालीन सीईओ त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांना नोटीस काढली जाणार आहे.
समांतर जलवाहिनीच्या कामात स्मार्ट सिटीच्या सीईओंनी त्यांच्या अधिकारात नसताना त्या ठेकेदाराचे काम थांबविण्याचा आदेश दिला होता. या संदर्भात त्यांना नोटीस बजावून त्यांच्याकडे विचारणा केली जाणार आहे.
जलजीवन मिशनच्या कामात झालेल्या गैरव्यवहाराचा मुद्दा यापूर्वीच्या बैठकीत आमदार सुभाष देशमुख यांनी उपस्थित केला होता. आजच्या बैठकीत त्यांनीच पुन्हा हा मुद्दा सर्वप्रथम उपस्थित केला.
जलजीवन मिशनची कामे घाई गडबडीने होत आहेत. या कामाच्या सर्व्हेमधून अनेक वाड्या-वस्त्या वंचित राहिल्या असल्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले. या योजनेचा सर्व्हे पुन्हा करावा अशी मागणी त्यांनी केली.
पालकमंत्री विखे-पाटील म्हणाले, सध्या तयार केलेल्या आराखड्यात ज्या गावातील वाड्या व वस्त्या राहिल्या आहेत. त्यांचा समावेश करावा. आमदारांनी सांगितलेले बदल अधिकाऱ्यांनी करावेत अशा सूचना त्यांनी केल्या.
प्रभारी सीईओ मनीषा आव्हाळे म्हणाल्या, जलजीवन मिशनच्या कामासाठी शासनाने ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. आता या कामांना १५ जानेवारीपर्यंतची मुदतवाढ दिली आहे.
कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांनी मोहोळ तालुक्यातील आढेगाव व वरकुटे येथील जलजीवन मिशनची कामे चुकीच्या पद्धतीने दिली असल्याचा आरोप मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी केला आहे. ही कामे रद्द करावीत. अन्यथा या विरोधात न्यायालयात धाव घेऊ, असा इशारा माने यांनी दिला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.