A New Revolution in the Vegetable Seed Industry : जागतिक भाजीपाला बियाणे बाजारात भारतीय कंपन्यांचा दबदबा वाढत आहे. चीन, जपान, अमेरिकेप्रमाणे भारतही भाजीपाला बियाणे निर्यातीत आघाडी घेत आहे. वर्ष २०२४ मध्ये ७०१ दशलक्ष डॉलरवर असलेला भारतीय बियाणे बाजार २०३० पर्यंत वार्षिक ५.५ टक्केहून अधिक दराने वाढून ९७० दशलक्ष डॉलरवर पोहोचेल, असे अनुमान आहे.
मॉन्सूनच्या काळात देशात पडणारा चांगला पाऊस, देशभरातील २० कृषी हवामान विभागातील मातीचे वेगळेपण तसेच वैविध्यपूर्ण हवामान, पावसाळ्यानंतर येणारे हिवाळा आणि उन्हाळा असे पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त हंगाम या बाबी या देशात अन्नधान्याबरोबर प्रामुख्याने फळे-भाजीपाला घेण्यासाठी फारच उपयुक्त आहेत.
त्यामुळेच चीननंतर भाजीपाला उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. भाजीपाला बियाण्याची देशातील मोठी बाजारपेठ आणि जगभरातून वाढती मागणी यामुळे देशात भाजीपाला बियाणे उद्योग चांगलाच बहरत आहे. असे असले तरी भाजीपाला बियाण्याची उत्पादकता, गुणवत्ता, रोगप्रतिकारकता आणि पोषणमूल्ययुक्तता या बाबींवर संशोधनात भर द्यावी लागेल. शिवाय आपले भाजीपाला बियाणे जगभर पोहोचेल, यावर देखील अधिक काम व्हायला पाहिजेत.
भाजीपाला बियाणे उत्पादनात सरकारी संस्थांपेक्षा खासगी कंपन्यांचा वाटा अधिक आहे. भारतात ५०० हून अधिक लहान-मोठ्या खासगी कंपन्या भाजीपाला बियाणे उत्पादनात असून, त्यातील काही कंपन्या तर फक्त भाजीपाला बीजोत्पादन करतात. जागतिक बाजारपेठेशी तुलना करता आपल्या भाजीपाला बियाण्याची उत्पादकता कमी आहे.
शिवाय आपल्या येथील भाजीपाला बियाणे महागडे असल्याने या देशातील बहुतांश अल्प-अत्यल्प भूधारक ते खरेदी करू शकत नाहीत. बियाण्याची कमी उत्पादकता आणि अधिक दर याचा फटका देशांतर्गत तसेच विदेशी बाजाराला देखील बसतोय. उत्पादकता वाढीबरोबर भाजीपाल्याच्या बियाण्यातही उच्च पोषणमूल्ययुक्त जातीच्या बियाण्याची जगभरातून मागणी वाढतेय. अशावेळी उत्पादकता वाढीबरोबर अधिक पोषणमूल्ययुक्त भाजीपाला बियाणे उत्पादनावर भारतीय कंपन्यांनी भर द्यायला हवा.
बदलत्या हवामान काळात ताण सहनशील वाणे भाजीपाल्यात देखील द्यावे लागतील. उत्पादकतेत वाढ, कीड-रोगप्रतिकारक, उच्च पोषणमूल्य आणि ताण सहनशील एवढे गुणधर्म एकाच जातीच्या बियाण्यात उतरवायचे असतील, तर भाजीपाल्यात देखील ‘जीएम’ला (जनुकीय बदल) पर्याय दिसत नाही.
जागतिक बाजारपेठेशी आपल्याला स्पर्धा करायची असेल तर भाजीपाल्यामध्ये जीएम जातीला परवानगी मिळायलाच हवी, याचा केंद्र सरकारने विचार करायला हवा. भाजीपाल्यात जीएमला परवानगी देताना त्याचे मानवी आरोग्य, पर्यावरण आणि जैवविविधता याला काही धोका तर नाही ना, याची खात्री मात्र करावी लागेल.
गुणवत्तापूर्ण बियाणे संशोधन आणि उत्पादन हे खर्चीक आणि वेळखाऊ काम आहे. यासाठी पायाभूत तसेच अत्याधुनिक सुविधांवर मोठी गुंतवणूक करावी लागते. अशावेळी कंपन्यांना सेवासुविधांसाठी अनुदान तसेच काही करांमध्ये सवलत देण्याबाबत सुद्धा केंद्र-राज्य सरकार पातळीवर विचार झाला पाहिजे.
देशात विभागनिहाय भाजीपाला उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना शेटनेटसह बियाणे खरेदी, पीक व्यवस्थापन याकरिता प्रोत्साहनपर अनुदान द्यायला पाहिजे. शेतकऱ्यांनी सुद्धा एकत्र येऊन विभागनिहाय उत्पादित भाजीपाल्याचे क्लस्टर तयार करायला हवेत. असे केल्याने भाजीपाल्याचे क्षेत्र वाढून देशांतर्गत बियाण्याची मागणीदेखील वाढू शकते.
हे करीत असताना आपल्या भाजीपाला बियाण्यासाठी जगभरातील नवनव्या बाजारपेठांचा शोध घ्यायला हवा. अशा बाजारपेठांत आपले भाजीपाला बियाणे पोहोचेल, हे देखील पाहायला हवे. असे झाल्यान देशात भाजीपाला बियाणे उद्योगात नवी क्रांती घडेल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.