महाराष्ट्र राज्याच्या अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून जनावरांमध्ये लम्पी स्कीन या आजाराचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Disease Outbreak Maharashtra) वाढत आहे. या आजारामध्ये अधूनमधून जनावरे मृत (Animal Died Due To Lumpy) होत असल्याच्याही बातम्या येत आहेत. राज्यात सध्या १३ जिल्ह्यांतील १२८ गावांत १०६६ जनावरे लम्पी स्कीनने बाधित (Lumpy Affected Animal) झालेले असून आत्तापर्यंत १७ जनावरे मृत पावले आहेत. राज्यात बाधित जनावरांचा आकडा कमी असला तरी दररोज एक-दोन नव्या जिल्ह्यांत हा आजार आपले पाय पसरत आहे. मार्च- २०२० मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील शिरोंचा येथे पहिल्यांदा लम्पी स्कीन आजाराची जनावरामध्ये लागण झाली. त्यानंतर हा आजार राज्यभर झपाट्याने पसरतोय.
२०२०-२१ मध्ये राज्यात २६ जिल्ह्यांत दोन लाख ६८ हजार अशा सर्वाधिक केसेस लम्पी स्कीन आजाराच्या होत्या. २०२१-२२ मध्ये रोगप्रसार कमी होऊन बाधित जनावरांचा आकडा ३९ हजारांवर आला. या दोन्ही वर्षांच्या तुलनेत यावर्षी (२०२२-२३) बाधित जनावरांची संख्या खूपच कमी (१०६६) असली तरी मृतांचा आकडा वाढतोय. २०२०-२१ मध्ये जवळपास पावणे तीन लाख जनावरे बाधित असली तरी त्यात मृतांचा आकडा १८ होता. आता एक हजार बाधित जनावरांमध्ये १७ जनावरे मृत पावली आहेत. शिवाय महाराष्ट्र राज्याला सोडून १० राज्यांत हा आजार पसरला आहे. राजस्थान, गुजरात, पंजाब आदी राज्यांत लम्पी स्कीन हा आजार थैमान घालत असून जनावरे मरण्याचे प्रमाणही तिकडे अधिक आहे, ही खरी चिंतेची बाब आहे. गंभीर बाब म्हणजे हा आजार वाढत असताना यासाठीचे कार्यदल राज्यात प्रभावी काम करताना दिसत नाही.
लम्पी स्कीन आपल्यासाठी आता नवीन राहिला नाही. पशुवैद्यक या आजाराबाबत जाणून आहेत. या आजाराची नोंद आणि निदानही लवकर होतेय. त्यामुळे त्वरित उपाययोजना करता येत आहेत. असे असले तरी हा आजार राज्यात बळावू नये यासाठी सर्वांनी काळजी घ्यायला हवी. लम्पी स्कीन हा जनावरांमधील विषाणूजन्य आजार असून याचा प्रसार डास, चावणाऱ्या माश्या, गोचीड आदी कीटकांमार्फत होतो. पशुसंवर्धन विभागाला या आजाराबाबत जनजागृती वाढवावी लागेल. आजाराची लागण, प्रसाराची कारणे आणि प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाय हे पशुपालकांपर्यंत पोहोचवावे लागतील.
याबाबत केवळ माहिती पत्रके काढून, पोस्टर्स लावून चालणार नाही तर पशुपालकांसोबतचा संवाद वाढवावा लागेल. शेतकऱ्यांनी सध्या तरी आपल्या गोठ्यात नवीन जनावर आणू नये तसेच गोठ्यातील जनावर विकू नये. शिवाय नवीन व्यक्तीला गोठ्यावर येऊ देऊ नये आणि आपणही कोणाच्या गोठ्यावर जाऊ नये. प्रशासकीय पातळीवर बाधित क्षेत्रातील जनावरांचे बाजार बंद करणे, हाही रोगाचा प्रसार कमी करण्यासाठीचा चांगला पर्याय आहे. संसर्गजन्य रोगाचा प्रसार मग तो मानवामध्ये असो की जनावरांमध्ये सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करणे गरजेचे असते.
आता लम्पी स्कीन आजारामध्ये पशुसंवर्धन, कृषी, ग्रामविकास, महसूल अशा सर्व विभागांनी एकत्रित काम करायला पाहिजेत. लम्पी स्कीन आजाराबाबत पशुवैद्यकीय महाविद्यालयांतील तज्ज्ञांचे गट स्थापन केले असले तरी त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन पशुसंवर्धन विभागाने घ्यायला हवे. आजार प्रसारास कारणीभूत कीटक निर्मूलन मोहीम बाधित क्षेत्राबरोबर राज्यभर राबवायला पाहिजेत. याबाबतच्या लसीकरणाचा वेग आणि व्याप्तीही वाढवावी लागेल. राज्यात सध्या ६०१ गावांत दीड लाख जनावरांचे लसीकरण झाले आहे. सध्या बाधित क्षेत्राच्या पाच किलोमीटर क्षेत्रात लसीकरण केले जाते. अगोदर बाधित जिल्ह्यांतील आणि त्यानंतर राज्यातील सर्व जनावरांचे लसीकरण झाले पाहिजेत. महत्त्वाचे म्हणजे लम्पी स्कीनबाबत स्थापन केलेल्या कार्यदलाने त्वरित ‘ॲक्शन मोड’वर यायला पाहिजेत. बाधित भागांत त्वरित विशेष पथक पाठवून आजार नियंत्रणात आणण्याबरोबर नवीन भागात लम्पी स्कीन पसरणार नाही, याची खबरदारी पण कार्यदलाने घेतली पाहिजेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.