Indigenous Cattle: ही ‘लक्ष्मी’ जपणार कोण?

Sahyadri Tribal Community: सह्याद्रीतील कळसूबाई-हरिश्चंद्रगड प्रदेशातील आदिवासी बांधव पिढ्यान्‌पिढ्या डांगी गोवंशाचे पालन करतात. स्थानिक आदिवासी व इतर वन निवासी समाजाचे आणि डांगी गोवंशाचे जैविक नाते आढळते. ते डांगीला ‘लक्ष्मी’ मानतात. पोळा सण, विविध उत्सवात, लोकसाहित्यात डांगीशी असणारे जैव-सांस्कृतिक नाते यांचे वर्णन मिळते.
Dangi Cattle
Dangi CattleAgrowon
Published on
Updated on

विजय सांबरे

Contribution of Tribals to Indigenous Cattle Breed: सह्याद्रीतील कळसूबाई-हरिश्चंद्रगड प्रदेशातील आदिवासी बांधव पिढ्यान्‌पिढ्या डांगी गोवंशाचे पालन करतात. अहिल्यानगर, पुणे व ठाणे या जिल्ह्यांच्या सीमारेषा जिथे भिडतात, तेथील हा भाग. कोथळे, लव्हाळी, पाचनई या हरिश्चंद्रगडाच्या घेऱ्यातील गावात भटकताना अनेक डांगी पालक भेटतात. अगदी बालपणापासून जंगलात, कडेकपारींमध्ये डांगी चारणारे, भांगलेबाबा, भांगरेकाका, तसेच हरिश्चंद्रगडाच्या गुहेत एकटेच राहून डांगी पाळणारे भांडकोळीदादा यांच्याशी डांगी गोवंश संवर्धनाच्या निमित्ताने अनेकदा भेटी होतात.

प्रत्येक वेळी डांगीविषयी, जंगलाविषयी, वाघारांविषयी भरभरून गप्पागोष्टी होतात. पण निरोप घेताना त्यांचे डोळे पान्हवतात. आम्ही उन्हपावसात ही ‘लक्ष्मी’ टिकून ठेवली. बापजाद्यांचा मान राखला. आमच्या नंतर ही ‘लक्ष्मी’ कोण जपणार...? असे बोल ऐकले की गलबलून येतं. ही डांगी पालकांची अखेरची पिढी ठरते की काय अशी भीती वाटू लागते. सह्याद्रीतील वातावरण डांगीला खूपच अनुरूप आहे. पण शाळा शिकलेल्या ‘सुशिक्षित’ (?) नवीन पिढीला गोपालन व शेतीचे आकर्षण वाटत नाही. याला जबाबदार कोण? या प्रश्नाने मन व्यथित होते.

मागील महिन्यात पशुसंवर्धन विभागाने २२ जुलै हा दिवस ‘देशी गोवंश दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला. महाराष्ट्र सरकारने देशी गायीला राज्यमातेचा दर्जा दिला आहे. पण तुम्हा-आम्हाला पवित्र वाटणारी गोमाता ज्या पशुपालक समाजाने टिकून ठेवली आहे, त्यांच्यापर्यंत हे काहीच पोहचत नाही. यात देशाची खरी संपत्ती जपणारे कुठेच नाहीत. पुढे असतात केवळ सारे हौशेनवशे...!

Dangi Cattle
Desi Cow Conservation : सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये देशी गोवंश पालनास महत्त्व

गोवंश वैविध्य व पारंपरिक व्यवस्था

आपला भारतीय उपखंड हा वैविध्यपूर्ण देशी गोवंशाची भूमी आहे. येथील भटक्या व स्थिर पशुपालक समाजाने मागील हजारो वर्षांच्या कालखंडात स्थानिक वातावरणात टिकणारा व उपजीविकेच्या अंगाने उपयुक्त असा गोवंश आणि इतर पाळीव प्राणी निर्माण केले, टिकवले व त्यांची पारंपारिक व्यवस्था उत्क्रांत केली. देशात एकूण ६१ गोवंश आहेत. महाराष्ट्रातील डांगी, कोकण गिड्डा, खिलार, गवळाऊ, लाल कंधारी, देवणी, कठाणी असे विविध गोवंश पाळणारे प्रदेशनिष्ठ समूह आहेत. आजही जैव-भौगोलिक / सांस्कृतिक पार्श्वभूमीवर स्थानिकांच्या दृष्टीने देशी गोवंशाची उपयुक्तता टिकून आहे. गोवंश केंद्री अर्थकारण जोडलेले आहे. हे गोवंश फक्त दुधासाठी नाही तर शेतीची मशागत, ओढकाम आदी उद्देशाने पाळले जातात. देशी गोवंशाची एक पारंपारिक व्यवस्था समजून घेतली तर मुख्य दहा घटक पुढे येतात. डांगी गोवंशाच्या उदाहरणातून ते समजून घेऊ.

डांगी पालक समाज

डांगी गोवंशाचे पैदासकार हे मुख्यत्वे आदिवासी महादेव कोळी, कानडी भाषिक कांडदी समाज आहे. डोंगराळ भागात (चाळीसगाव डांगाणातील रहिवाशी) वास्तव्य करणारे इतर समाजाचे शेतकरी डांगीचे कळप पाळतात.

सुलक्षणी गाय व जातिवंत वळू

शुद्ध डांगी वंश टिकवायचा असेल तर सुलक्षणी गायी व जातिवंत वळू असणे गरजेचे आहे.

लोकज्ञान व व्यवस्थापन कौशल्य

यशस्वी डांगी पालनासाठी पिढ्यान पिढ्या विकसित झालेले स्थानिकांचे पारंपरिक ज्ञान, शहाणपण व व्यवस्थापन कौशल्य महत्वाचे ठरते.

पारंपरिक व आधुनिक आरोग्य सेवा

डांगी गोवंशाच्या आरोग्य व्यवस्थापनासाठी गावातील वैदू लोक महत्वाची भूमिका बजावतात. जंगलातील औषधी वनस्पतींचा वापर (Ethno-Vet Practices) करून अनेक आजार ते बरे करतात. त्या जोडीला पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी व खासगी पशुवैद्यक पण आरोग्य सेवा देत असतात.

स्थानिक भौगोलिक परिस्थिति व सूक्ष्म हवामान

उत्तर सह्याद्रीच्या डोंगराळ भागात टिकण्याची अंगभूत क्षमता डांगी गोवंशात आहे. अति पावसाच्या प्रदेशात शेतीची मशागत फक्त डांगी बैलच करु शकतात.

शेती पद्धती

डांगी बहुल प्रदेशात मुख्यत्वे पर्जन्याधारित भात व नागली, वरई सारख्या पर्वतीय तृणधान्यांची शेती केली जाते व जोडीला रब्बी हंगामात गहू, हरभरा, वाल आदी पिके घेतात. या सर्व पिकांच्या व्यवस्थापनात डांगी बैलांचाच प्राधान्याने वापर होतो.

जैव-सांस्कृतिक वारसा

उत्तर सह्याद्रीतील स्थानिक आदिवासी व इतर वन निवासी समाजाचे आणि डांगी गोवंशाचे जैविक नाते आढळते. ते डांगीला ‘लक्ष्मी’ मानतात. पोळा सण, विविध उत्सवात, लोकसाहित्यात डांगीशी असणारे जैव-सांस्कृतिक नाते यांचे वर्णन मिळते.

Dangi Cattle
Livestock App: पशू व्यवस्थापनासाठी विविध ॲप्सचा वापर

डांगीचे आदान प्रदान

लग्न झाल्यावर मुलीला कालवड भेट (आंदण) म्हणून देतात. बहुतांशी गावात ठरावीक वर्षांनी वळूची अदलाबदल करण्याची पद्धत आहे. थोडक्यात डांगीची समुदायात होणारी देवघेव ही प्रक्रिया डांगी व्यवस्था मजबूत करण्यास हातभार लावणारी आहे.

जंगलातील चाऱ्याचे स्रोत व राखण रान

डांगी गोवंशाचे पालन-पोषण मुख्यत्वे जंगलाच्या आधारे होत असते. सह्याद्रीतील दोनशेपेक्षा अधिक वनस्पती, त्यात त्रेपन्न प्रकारचे गवते यांचा डांगीच्या आहारात समावेश असतो. ‘राखणरान’ म्हणजे गवताळ भागाचा तुकडा राखून त्यातील किमान सहा प्रकारचे वाळलेले गवत टंचाईच्या काळात वापरले जाते. ही पद्धत चारा व्यवस्थापनाच्या दृष्टीने अधिक शाश्वत मानली जाते.

जलस्रोत व देवराया

सर्व प्रकारचे जलस्रोत हे स्थिर व भटकणाऱ्या डांगींच्या कळपासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. वर्षभर वेळेवर शुद्ध पाणी मिळाले, तरच डांगी जनावरे सुदृढ निरोगी राहू शकतात. आदिवासी बांधवांनी जपलेल्या देवरायांमध्ये अनेक नदी, नाले, ओढे, झरे यांचे उगम असतात. प्राथमिक स्वरुपातील जंगलाचे संरक्षण झाले तर शाश्वत पाणी मिळेल व डांगी गोवंश टिकेल. एकूणच डांगी गोवंश व्यवस्थेत पाणी व त्याचा उगम असणारे वनपरिसंस्था व देवराया यांचे मोलाचे स्थान आहे.अशी सर्वच गोवंशाची प्रदेशनिहाय व्यवस्था आहे. योजना आखताना ही व्यवस्था प्रथम समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे.

वर्तमानातील सरकारी धोरण आणि वास्तव

मागील अनेक दशके केंद्र व राज्य सरकार देशी गोवंशासाठी विविध योजना व कार्यक्रम आखत आहे. ‘गोकुळ मिशन’ सारखा देशव्यापी कार्यक्रम गेली अकरा वर्षे सुरु आहे. माफसू, पशुवैद्यकीय महाविद्यालये, कृषी विद्यापीठे, पशुसंवर्धन विभाग, कृषी विज्ञान केंद्र या सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून त्यांची अंमलबजवणी सुरु आहे.

देशी गोवंश संवर्धनासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोग अधिनियम २०२३ च्या माध्यमातून २७ एप्रिल २०२४ रोजी महाराष्ट्र गोसेवा आयोग स्थापन करण्यात आला. गोसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर मांडलेली उद्दिष्टे खूपच व्यापक आहेत. हा आयोग राज्यातील गोवंशाचे संवर्धन, संरक्षण व कल्याण करण्यासाठी आणि त्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांचे पर्यवेक्षण करण्यासाठी स्थापन झालेला आहे. पशु प्रजनन आणि स्थानिक जातीचे संवर्धन, अनुवंशिक सुधारणा, वैरण विकास यामध्ये कार्यरत असलेल्या गोसदन, गोशाळा-पांजरपोळ, गोरक्षण इत्यादी संस्थांना उत्तेजन देणे. तसेच पशु-आरोग्य सेवांचे प्रचलन, देशी पशुंचे संवर्धन व विकास, गोवंश प्रजनन धोरणाची अंमलबजावणी, प्राणी क्लेष प्रतिबंध सोसायटी कामकाजाचा आढावा घेणे, या उद्देशाने हा आयोग कार्यरत राहील, असे म्हटले आहे.

वरील उद्दिष्टांनुरूप आयोगाचे कामकाज सुरु असल्याचे सांगितले जाते; पण पारंपरिक गोपालक शेतकरी गट अथवा गोवंश पैदासकार संस्थांना पाठबळ देण्याविषयी आयोग उदासीन आहे. या आयोगाचे कामकाज गोशाळा केंद्री होऊन बसले आहे. एकूणच गोसेवा आयोग फक्त गोशाळांमध्ये अडकला आहे, असे जाणवते. भाकड जनावरांची तस्करी रोखण्यासाठी व त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी गोशाळा ठीक आहेत. परंतु केवळ गोशाळांना प्रोत्साहन देणे म्हणजे गो-संवर्धन नव्हे.

दुसरीकडे राज्य सरकारने ‘सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना’ १७ जून २०२३ रोजी कार्यान्वित केली आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये प्रति तालुका एक गोशाळा या प्रमाणे ३२४ तालुक्यांमधील एकूण ३२४ पात्र गोशाळांना आर्थिक मदत केली जाणार आहे. वरील सर्व कार्यक्रम / योजना गोशाळांच्या माध्यमातून देशी गोवंशाचे परस्थळी संवर्धन (Ex-situ Conservation) प्रक्रियेला प्रोत्साहन देणाऱ्या आहेत.

राज्यात १९७६ सालापासून गोहत्या बंदी कायदा लागू आहे. पुढे फेब्रुवारी २०१५ मध्ये त्यात सुधारणा करून गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आला. या कायद्याचा हेतू चांगला होता; पण अनेक हितसंबंधी गटांनी गोवंशाच्या संरक्षणाच्या नावाखाली झुंडशाही चालवली आहे. गोपालक, शेतकरी, सर्व जाती-धर्माचे व्यापारी, कुरेशी, खाटिक व इतर व्यावसायिक संकटात सापडले आहेत. समाजात जातीय व धार्मिक तेढ वाढत आहे.

कृती कार्यक्रम काय असावा?

या पार्श्वभूमीवर देशी गोवंश जतन व संवर्धन करण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम आखण्याची आवश्यकता आहे. त्यात पुढील बाबींचा समावेश असावाः

दीर्घकालीन शाश्वत गोवंश संवर्धन योजना आखताना स्वस्थळी संवर्धन (In-situ Conservation) प्रक्रियेलाच प्राधान्य द्यावे.

डांगी, गवळाऊ, देवणी, कोकण कपिला यांच्या पैदासकार संघांचे बळकटीकरण होणे गरजेचे आहे.

गोवंशासंबंधी सर्व घटकांनी (सामाजिक, शासकीय व बिगर शासकीय हितसंबंधी) देशी गोवंश व त्यांची पारंपारिक व्यवस्था प्रथम समजून घेणे व त्याआधारे स्थानिक गोपालकांचे संघटन (गोवंश पालक गट, पैदासकार संघ) उभे करणे गरजेचे आहे. यात गोकुळ मिशन व महाराष्ट्र गोसेवा आयोग यांना काम करण्याची उत्तम संधी आहे.

स्थानिक गरजेनुसार गोशाळा उभारणीला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.

गोकुळ मिशन व इतर योजना राबविताना सरकारी व्यवस्थांनी आपल्या कोशातून बाहेर पडायला हवे. त्यांनी समन्वयित लोकोपयोगी योजना आखून कार्य करायला हवे. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती गरजेची आहे. पशुपालक शेतकऱ्यांनी त्यासाठी दबाव गट निर्माण करावेत.

गोवंश हत्याबंदी कायद्याचा समन्वयित व सकारात्मक वापर व्हावा. देखरेख यंत्रणा संवेदनशील व सर्वांचे हित जोपासणारी असावी.

महाराष्ट्रात तरुण गोवंश पालकांचे व्यासपीठ / नेटवर्क तयार व्हायला हवे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com