Lumpy Skin Disease : ‘लम्पी’ आजारावर वेळेवर उपचार आवश्यक

लम्पी स्कीन आजाराचा प्रसार प्रामुख्याने डास, गोचीड, माश्या या चावणाऱ्या कीटकांमार्फत होतो. बाधित जनावराच्या त्वचेवर गाठी येतात. जनावरांमध्ये आजाराची लक्षणे आढळून आल्यास पशुवैद्यकांशी संपर्क साधून त्वरित उपचार करावेत.
Lumpy Skin Disease
Lumpy Skin DiseaseAgrowon

लम्पी (Lumpy Skin Disease) हा जनावरांमधील विषाणूजन्य त्वचा आजार (Animal Skin Disease) आहे. याचा प्रादुर्भाव गायी, म्हशींमध्ये आढळून येतो. मात्र शेळ्यांमध्ये आढळत नाही. याची तीव्रता संकरित गायींमध्ये अधिक प्रमाणात असते. सर्व वयोगटातील जनावरांमध्ये प्रादुर्भाव (Lumpy Skin Outbreak) आढळतो. प्रौढ जनावरांच्या तुलनेत लहान वासरांमध्ये अधिक प्रमाणात आढळ दिसतो. या आजारामध्ये मरतुकीचे प्रमाण कमी असले तरीही आर्थिकदृष्ट्या जास्त नुकसान होते. कारण, दूध उत्पादनात घट येते. जनावर अशक्त होते. काही वेळा गर्भपात होण्याची शक्यतादेखील असते. जनावराची त्वचा कायमस्वरूपी खराब होऊन जनावर विकृत दिसते. त्यामुळे जनावरांचे बाजारमूल्य घटते.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’मुळे जिल्ह्यात दोन जनावरांचा मृत्यू

लक्षणे

बाधित जनावर साधारण २ ते ५ आठवडे आजाराची कोणतीही बाह्य लक्षणे दाखवत नाही. यालाच आजाराचा ‘सुप्त काळ’ म्हणतात.

जनावरास प्रथम तीव्र स्वरूपाचा ताप येतो. त्यानंतर डोळ्यांतून पाणी, नाकातून स्राव सुरू होतो. लसिका ग्रंथींना सूज येते. भूक व तहान मंदावते.

डोके, मान, पाय, छाती, पाठ, मायांग, कास इ. भागावरील त्वचेवर हळूहळू १ ते ५ सेंमी व्यासाच्या गाठी येतात. काही वेळा तोंडात, नाकात व डोळ्यात व्रण येतात.

तोंडातील व्रणामुळे जनावरास चारा चघळण्यास व रवंथ करण्यास त्रास होतो.

डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येऊन पापण्या एकमेकांना चिकटून दृष्टी बाधित होते.

जनावरास फुफ्फुसदाह, कासदाह देखील होतो. श्‍वसनास अडथळा आल्यामुळे किंवा फुफ्फुसाच्या दाहामुळे मृत्यू होऊ शकतो.

पायावर सूज आल्याने जनावर लंगडते.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin Disease: नऊ तालुक्यांत जनावरांचे आठवडी बाजार बंद

प्रसार

प्रसार मुख्यत्वे करून चावणाऱ्या कीटक जसे माशा, डास, गोचीड, कीटक, चिलटे इ.मार्फत होतो.

निरोगी जनावर बाधित जनावराच्या संपर्कात आल्यानंतर प्रसार होतो.

बाधित जनावराच्या अश्रूमध्ये नाकातील स्रावामध्ये, वीर्यामध्ये रोगाचे विषाणू आढळून येतात. हे विषाणू पाणी किंवा चाऱ्यामध्ये मिसळल्यानंतर देखील प्रसार होतो.

उष्ण व दमट वातावरणात चावणाऱ्या कीटकांची वाढ झपाट्याने होतो. याच काळात प्रादुर्भाव वाढतो.

बाधित नराचा संयोग मादीसोबत झाल्यानंतर वीर्यातील विषाणूंमुळे मादीत रोगाचे संक्रमण होऊ शकते. त्यामुळे बाधित गाभण जनावराच्या जन्माला येणाऱ्या वासरास रोगाचे संक्रमण होते. दूध पिणाऱ्या वासरास बाधित गायीच्या दुधातून किंवा सडावरील जखमेतील स्रावातून बाधा होऊ शकते.

उपचार

आजाराची लक्षणे दाखविणाऱ्या जनावरास तत्काळ पशुतज्ज्ञाकडून उपचार करून घ्यावेत.

जनावरास ज्वरनाशक, सूज कमी करणारे व वेदनाशामक औषध टोचून घ्यावे.

जिवाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिजैविकांचा वापर करावा.

प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी उपचार करावेत.

जनावरांच्या शरीरावर झालेल्या जखमा २ टक्के पोटॅशिअम परमॅंगनेटच्या पाण्याने धुऊन त्यावर बोरोग्लिसरीन लावावे.

लसीकरण

प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण करून घ्यावे (उदा. कमी तीव्रतेची लम्पी त्वचा रोगाची जिवंत लस, मेंढी किंवा शेळीमधील देवी रोगाची लस). लसीकरण पशुवैद्यकाकडून करून घ्यावे.

उपाययोजना

गोठा नेहमी हवेशीर आणि स्वच्छ ठेवावा. यामुळे कीटकांचा प्रादुर्भाव वाढणार नाही.

गोठ्यात डास, माश्या आदींचा शिरकाव होऊ नये यासाठी सुके शेण जाळून धूर करावा. गोठ्यात निलगिरी तेल, कापूर, करंज तेल, गवती चहाची पाने यांच्या द्रावणाची पाण्यात मिसळून फवारणी करावी.

जनावराच्या शरीरास कडुनिंबाचे तेल लावल्यास डास, माशी चावत नाही.

आजारी व निरोगी जनावरे वेगवेगळी ठेवावी. बाधित व निरोगी जनावरांना एकत्र चारा-पाणी किंवा चरायला सोडू नये.

बाधित जनावरांचा गोठा, संपर्कात आलेली भांडी तसेच इतर

साहित्य सोडिअम हायपोक्लोराइडच्या द्रावणाने निर्जंतुकीकरण करावीत.

- डॉ. सागर जाधव, ९००४३६१७८४,

(पशुधन विकास अधिकारी, बाचणी, जि. कोल्हापूर)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com