Home Industry: नाचणी, भाजीपाल्याच्या पापडांची चव न्यारी

Economic Support: सदावरवाडी येथील विद्या मुकुंद तावडे यांनी महिलांच्या संघटनेत गृह उद्योग उभारून ग्रामीण महिलांना नवे आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून दिले आहे. बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन नाचणी, पालक, टोमॅटो आणि साबुदाणा पापड निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येत आहे.
Successful Home Industry
Successful Home IndustryAgrowon
Published on
Updated on

Women Empowerment Programs Kolhapur: सदावरवाडी (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथील विद्या मुकुंद तावडे यांनी महिलांच्या संघटनाबरोबर गृह उद्योगाची उभारणी करुन महिलांना आर्थिक आधार दिला आहे. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन नाचणीसोबतच पालक, टोमॅटो, मेथी आणि साबुदाणा पापड निर्मितीमधून महिलांना आर्थिक उत्पन्नाचे साधन मिळवून दिले आहे.अनेक संकटावर मात करत विद्याताईंनी ग्रामीण महिलांना सर्व पातळीवर आधार देण्याचे काम केले आहे.

सदावरवाडी (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) या दुर्गम गावशिवारात विद्या मुकुंद तावडे रहातात. शिक्षण संपल्यानंतर विवाह आणि लवकर वैधव्य अशा परिस्थितीत त्या मुलासह माहेरी आल्या. केवळ दहावी शिकलेल्या विद्याताईंपुढे मुलाला वाढविण्याचे आव्हान होतेच, त्याचबरोबरीने जगण्यासाठी उत्पन्नाचे कायम स्वरूपी साधन निर्मितीचे ध्येय समोर होते. लहानपणापासूनच आरोग्य आणि अन्य समस्यांमुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण झाले होते, यातच पती निधनानंतर अडचणीत भर पडली.

यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी समाजसेवेमध्ये काम सुरू केले. महिला राजसत्ता आंदोलन या संघटनेच्या त्या सदस्य झाल्या. यानंतर त्यांचे आयुष्य बदलले. महिलांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांनी दहा तालुक्यात दारूबंदी चळवळ उभारली. विधवा प्रथा स्वतःपासून बंद केली. या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी १०४७ विधवांना पेन्शन आणि अन्य लाभ मिळवून दिले. सामाजिक कामाची दखल घेऊन अनेक संघटनांनी त्यांना प्रोत्साहन दिले. २००८ मध्ये त्यांनी कृषी विभागाच्या वतीने ‘आत्मा’च्या अशासकीय सदस्यपदाची संधी मिळाली. यातून त्यांना बचत गटाची चळवळ उभी केली.

Successful Home Industry
Agriculture Success Story : बिराजदार यांचा झाला देशपातळीवर सन्मान

हे करत असताना उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न त्यांनी जिद्दीने पूर्ण केले. पुण्यातून एमएसडब्लू पदवी मिळविली. शिक्षण पूर्ण करत असतानाच गावातील महिलांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन दिले. पंधरा वर्षांपूर्वी विद्याताईंनी चंदगड तालुक्यातील वेगवेगळ्या भागांत तब्बल २५० महिला बचत गटांची स्थापना केली. या गटांच्या माध्यमातून सुमारे तीन हजार महिला एकत्र आल्या. संघटनेसोबतच महिलांना विविध उद्योगांसाठी राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत सुमारे तीन कोटींची कर्जे त्यांनी मिळवून दिली. महत्त्वाचे म्हणजे या महिला बचत गटांनी हे कर्ज फेडले. या अनुभवातून ग्रामीण भागातील महिलांना एकत्र येऊन व्यवसाय करण्याची जाणीव झाली. या संघटित शक्तीमधून विद्याताईंनी बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन विद्याराज पापड गृह उद्योगाची पायाभरणी केली.

प्रक्रिया उद्योगाला सुरुवात

कृषी विभागाच्या ‘आत्मा’ योजनेत अशासकीय सदस्य म्हणून काम करताना विद्याताईंना विविध उद्योगांतील संधींची माहिती मिळाली. त्यावेळी नाचणीवर आधारित प्रक्रिया उद्योग हा आपल्या भागात चांगला चालेल, अशी कल्पना त्यांच्या मनात आली. बचत गटांच्या माध्यमातून त्यांचा होतकरू महिलांशी संपर्क होता. चर्चा केल्यानंतर सर्वांचे एकमत झाले. उद्योग सुरू करताना जागा, भांडवल, साधनसामग्री अशा अनेक अडचणी आल्या. २०१७ मध्ये त्यांनी गावातील महिलांना एकत्र करून बचत गट सुरू केला.

त्यांच्यासोबत महिलांना पापड, मसाले, विविध खाद्यपदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण दिले. सुरुवातीला उत्पादनांची विक्री करणे हे एक मोठे आव्हान होते. पण विद्याताईंनी हार मानली नाही. त्यांनी विविध प्रदर्शनांमध्ये स्टॉल लावले, उत्पादनांची गुणवत्ता टिकवून ठेवली.हळूहळू त्यांच्या उत्पादनांना ग्राहकांकडून थेट मागणी वाढू लागली. प्रक्रिया उद्योगासाठी नाचणी, वजनकाटा आणि आवश्यक साहित्य खरेदी करण्यात आले. पाटणे फाटा येथे भाडेतत्वावर मध्यवर्ती ठिकाणी घर घेण्यात आले.

पहिल्या टप्यांत गॅस सिलिंडर मिळवायला दोन महिने लागले. स्वयंचलित यंत्रांचा पर्याय महाग असल्याने मनुष्यबळावर आधारित यंत्रणांची खरेदी केली. यासाठी प्रशिक्षणाची सोय केली. उद्योगाला सुरुवात होतानाच कोरोनाची साथ सुरू झाली आणि प्रक्रिया उद्योग सुमारे अडीच वर्षे बंद राहिला. मात्र महिलांच्या जिद्दीमुळे पुन्हा उद्योगाला गती मिळाली. यासाठी तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी भाग्यश्री पवार, तालुका कृषी अधिकारी आर. बी. गायकवाड यांचे सहकार्य लाभले.

Successful Home Industry
Success Story: शेती,पर्यावरणाला दिशा देणाऱ्या योगेश्वरी चौधरी

विविध चवीच्या पापडांची निर्मिती

प्रक्रिया उद्योगाबाबत विद्याताई म्हणाल्या की, विद्याराज पापड गृह उद्योग या फर्मच्या माध्यमातून नाचणी, पालक, टोमॅटो, मेथी आणि साबुदाणा अशा विविध चवीच्या पापडांची निर्मिती केली जाते. सध्या अत्याधुनिक वाळवणी यंत्र नसल्याने उन्हाळ्याच्या काळात पापड निर्मितीचे उत्पादन सुरू राहते; हिवाळा आणि पावसाळ्यात पुरेशा सूर्यप्रकाशाचा अभाव असल्यामुळे पापड उत्पादन थांबते. दररोज सुमारे २५ किलो पापड निर्मिती होते. स्वादानुसार पापड उत्पादनाचा खर्च बदलतो. पापडांची विक्री तालुक्यातील छोटे किराणा दुकानदार, छोटे बाजार तसेच शहरातील मोठ्या दुकानांच्यामध्ये होते. आकर्षक रंगसंगतीमुळे ग्राहकांची या पापडांना चांगली मागणी आहे. विविध खाद्य महोत्सवात स्टॉल लावून ग्राहकांपर्यंत दर्जेदार पापड पोहोचवले जातात.

वर्षभर विक्री

पापड निर्मिती व्यवसाय केवळ तीन महिन्यांचा असला तरी या कालावधीत जास्तीत जास्त पापड तयार करुन ठेवले जातात. वेगवेगळ्या चवीचे पापड वजनानुसार पॅकींग करुन ठेवले जातात. स्थानिक मॅाल मध्ये गटाच्या माध्यमातून पापड पोहोच केले जातात. विवाह व अन्य समारंभासाठी ग्राहक स्वतः येऊन आवश्यक पापडांची खरेदी करतात. बचत गटांच्या महोत्सवामध्येही स्टॉलच्या माध्यमातून सहभाग घेतला जातो. नाचणी पापड २५० रुपये, तांदूळ पापड २०० रुपये, टोमॅटो २३० रुपये, मेथी पापड २२० रुपये, साबुदाणा पापड १८० रुपये प्रति किलो दराने विक्री होते.

याचबरोबरीने नाचणी सत्त्व, नाचणी लाडू, नाचणी बिस्किट निर्मितीचे काम सुरू आहे. सध्या या व्यवसायातून माफक नफा होतो. उद्योगाच्या वाढीसाठी नजीकच्या औद्योगिक वसाहतीतील जागा मिळवण्यासाठी धडपड सुरू ठेवली आहे. पण संबंधित यंत्रणांकडून सकारात्मक प्रतिसाद नसल्याने हा उद्योग वाढविण्यास अडचणी आल्या आहेत, तरीदेखील महिलांच्या साथीने यातून मार्ग काढण्याचे नियोजन विद्याताई करत आहेत. प्रक्रिया उद्योगातील कार्याबद्दल विद्याताईंचा पुरस्कारांनी गौरव झाला आहे.

शेतकऱ्यांकडून खरेदी

चंदगड शिवारातील नाचणीला खास चव आहे. येथील शेतकरी नाचणीच्या पारंपरिक जातींची लागवड करतात. अनेक शेतकरी नाचणीसाठी रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खते तसेच दशपर्णी अर्काचा वापर करतात. यामुळे नाचणीची गुणवत्ता टिकून राहण्यास मदत होते. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम, लोह, तंतूमय घटक आणि प्रथिने आहेत. यामुळे हाडांच्या आरोग्यासाठी आणि एकूणच शरीराच्या पोषणासाठी नाचणी फायदेशीर आहे. चंदगड येथील पारंपरिक पद्धतीने पिकवलेली नाचणी तिच्या उच्च पौष्टिक मूल्यासाठी ओळखली जाते.

या वैशिष्ट्यांनी युक्त नाचणीच्या पापड निर्मितीकडे विद्याताईंचे लक्ष आहे. गुणवत्तापूर्ण पद्धतीने पापड बनविले जातात. नाचणी पॅालिश करणे, मोड काढणे, सुकवून दळणे, टरफले काढणी आदी सर्व बाबी हाताने केल्या जातात. या प्रक्रिया उद्योगात पाच महिला कार्यरत आहेत. स्थानिक शेतकऱ्यांकडून बाजारभावाप्रमाणे दर देवून नाचणी खरेदी होते. दरवर्षी एक टन नाचणी खरेदी केली जाते. यामुळे शेतकऱ्यांनाही या उद्योगाचा चांगला आधार मिळाला आहे.

महिला पतसंस्थेचा आधार

महिलांना आर्थिक मदत मिळावी यासाठी विद्याताईंनी आपली महिला बिगर शेती सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या सुमारे एक हजार महिला सभासद आहेत. महिलांना त्यांच्या आर्थिक कुवतीनुसार दहा ते पन्नास हजार रुपयांचे कर्ज दिले जाते. दोन सभासद महिलांचा जामीन घेऊन हे कर्ज दिले जाते. सोयीनुसार महिन्याला हप्त्याची रक्कम ठरवून घेतली जाते. यामुळे शेती, विविध कार्यक्रम, परिसरातील विविध गावांतील महिलांकडून चालविण्यात येणाऱ्या छोट्या उद्योगांनी भांडवल सहजपणे उपलब्ध होत आहे. विद्याताईंनी गृह उद्योगाबरोबर महिलांनाही आर्थिकदृष्ट्या सक्षम केले आहे. याच बरोबरीने महिला चळवळीच्या माध्यमातून समुपदेशन करुन त्यांनी शेकडो संसारही वाचविले आहेत.

- विद्या तावडे ९४२०१३६७०३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com