Agriculture Pest Infestation: मूग, उडीद पिकांवरील किडींचे व्यवस्थापन

Moong, Urad Crop Protection: सध्या मूग, उडीद पिकांमध्ये प्रामुख्याने मावा, तुडतुडे, फुलकिडे व पांढरी माशी अशा रसशोषक किडी आणि पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. विशेषतः कळी, फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत असलेल्या पिकांमध्ये हेलिकोव्हर्पा आणि शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव आढळून येतो.
Crop Pest
Crop PestAgrowon
Published on
Updated on

डॉ. प्रज्ञा कदम, डॉ. मनोहर इंगोले

Agriculture Tips: सध्या मूग, उडीद पिकांमध्ये प्रामुख्याने मावा, तुडतुडे, फुलकिडे व पांढरी माशी अशा रसशोषक किडी आणि पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. विशेषतः कळी, फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत असलेल्या पिकांमध्ये हेलिकोव्हर्पा आणि शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव आढळून येतो.

मावा

कोवळ्या फांद्या, फुले व शेंगांवर माव्याची (प्रौढ व पिले) वसाहत आढळून येते. प्रौढ व पिले रस शोषण करतात, त्यामुळे पाने आक्रसून वेडीवाकडी झाल्याचे दिसते. रोपे सुकतात. या किडीद्वारे उत्‍सर्जित चिकट गोड पदार्थामुळे पानांवर काळ्या बुरशीची वाढ होते. प्रकाश संश्‍लेषण क्रियेत बाधा येऊन उत्पादनात मोठी घट येते.

तुडतुडे

प्रौढ व पिले हिरव्या रंगाची, पाचरीच्या आकाराची असतात. प्रौढ आणि पिले पानांच्या खालच्या बाजूला राहून पानांतील रस शोषतात. रस शोषतेवेळी त्यांच्या सोंडेतून विषारी पदार्थ पानाच्या पेशीत सोडला जातो. अशी पाने सुरुवातीला तपकिरी रंगाची होऊन कालांतराने गळून पडतात. रोपांची वाढ खुंटते.

फुलकिडे

प्रौढ काळ्या रंगाचे आणि पिले पिवळसर तपकिरी रंगाची असतात. फुलोऱ्यामध्ये फुलकिड्यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. प्रादुर्भाव जास्त झाल्यास फुलोरा गळतो. शेंगांची वाढ खुंटते. प्रादुर्भावग्रस्त शेंगामधील दाणे लहान आणि आक्रसलेले दिसतात.

Crop Pest
Sugarcane Pest Management: उसावरील पांढऱ्या माशीचे व्यवस्थापन

पांढरी माशी

पिले फिकट पिवळी रंगाची असून, प्रौढ माशीला पांढरट किंवा करड्या रंगाचे पंख असतात. त्यांच्या शरीरावर पिवळसर झाक असते. पिले व प्रौढ पानांतील रस शोषतात. त्यांच्या शरीरातून सोडलेल्या चिकट गोड पदार्थामुळे पानांवर काळ्या बुरशीची वाढ होते. परिणामी, प्रकाश संश्‍लेषण क्रियेत बाधा येते. मुगामध्ये येलो मोझॅक व्हायरस (वाय.एम.व्ही.) रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीद्वारे होतो. त्यामुळे पाने पिवळी पडून वाळतात. उत्पादनात घट येते.

एकात्मिक व्यवस्थापन

माती परीक्षणावर आधारित खतमात्रेचा वापर, विशेषतः नत्र खतांचा संतुलित वापर करावा.

वाढ संप्रेरकांचा वापर टाळावा. अन्यथा पिकाची अनावश्यक कायिक वाढ होऊन पिकात दाटी तयार होते.

रस शोषक किडीच्या व्यवस्थापनासाठी चिकट सापळे उपयुक्त ठरतात. पांढरी माशी, तुडतुडे आणि मावा या किडींसाठी पिवळ्या रंगाचे सापळे तर फुलकिड्यांच्या व्यवस्थापनासाठी निळ्या चिकट सापळ्यांचा वापर फायदेशीर आढळला आहे.

या किडींना नियंत्रणात ठेवण्यासाठी निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा ॲझाडिरॅक्टिन १००० पीपीएम २ ते ३ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

पाने खाणारी स्फिंजीड अळी

या किडीची मादी पानांच्या खालच्या बाजूस हिरवट पांढऱ्या रंगाची गोलाकार अंडी घालते. त्यातून बाहेर पडलेली अळी पाने खाण्यास सुरुवात करते. पूर्ण वाढ झालेली अळी फिकट हिरव्या रंगाची असून, त्यावर आठ पिवळे पट्टे असतात. या अळ्या अधाशीपणे झाडांवरील सर्व पाने खातात.

हेलिकोव्हर्पा अळी

पूर्ण विकसित अळी पोपटी रंगाची असते. शरीराच्या बाजूवर तुटक करड्या रेषा आढळतात. अळी लहान असताना पानावर तर पीक फुलोऱ्यावर असताना कळ्या, फुले व शेंगांवर आक्रमण करते. अळी शेंगांवर अनियमित आकाराचे छिद्र पाडून अर्धी आत व अर्धी बाहेर राहून आतील विकसित होणारे दाणे खाते.

ठिपक्याची शेंग अळी / शेंगा पोखरणारी अळी (मारुका स्पे.) पतंग करड्या रंगाचा असून मागील पंखावर पांढरे पट्टे आढळतात. मादी पतंग कळ्या, फुले व शेंगावर अंडी घालतात. अळी पांढऱ्या रंगाची असून अर्धपारदर्शक असते. तिच्या पाठीवर काळ्या रंगाच्या ठिपक्यांच्या जोड्या असतात.

Crop Pest
Crop Insect Infestation : सततच्या पावसामुळे पिकांमध्ये किडींचा प्रादुर्भाव

नुकसानीचा प्रकार

मादी पतंग कळ्या, फुले, शेंगावर अंडी घालते. अंड्यातून निघालेली अळी कळ्या, फुले व शेंगांना जाळ्यांनी चिटकवते. त्याचे एकत्रित झुपके तयार करून त्यात राहते. ही अळी फुले, पाने, व शेंगाना पोखरते. तिसऱ्या व चौथ्या अवस्थेतील अळी शेंगा पोखरून आतील दाणे खाते. अळी शेंगाच्या झुपक्यात किंवा मातीत कोषावस्थेत जाते. या किडीचा जीवनक्रम १८ ते ३५ दिवसात पूर्ण होते.

आर्थिक नुकसानीची पातळी

जिथे उडीद, मुगाचे पिके फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत, तिथे नियमितपणे पिकाचे सर्वेक्षण करावे. शेतात २० ते २५ ठिकाणी प्रति मीटर ओळीत पाहणी करावी. किडीचा प्रादुर्भाव सरासरी २ ते ३ अळ्या प्रतिमीटर ओळीच्या अंतरात दिसून आल्यास किडीने आर्थिक नुकसान पातळी गाठल्याचे समजून पीक संरक्षणाचे उपाय योजावेत.

एकात्मिक व्यवस्थापन

हेलिकोव्हर्पाच्या सर्व्हेक्षणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करावा. त्यात हेलील्युअर / हेक्झालुअर लावावे. सतत तीन दिवस प्रति कामगंध सापळ्यात ८ ते १० नर पतंग आढळल्यास योग्य उपाययोजना कराव्यात.

किडींवर उपजीविका करणारे मित्रकीटक शेतात आढळून आल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळावा.

आंतरमशागत करून पीक तणविरहित ठेवावे.

प्रादुर्भाव नुकताच सुरू झाल्याचे दिसताच निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा ॲझाडिरॅक्टिन १००० पीपीएम २ ते ३ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी.

वरील सर्व उपायांच्या अंमलबजावणीनंतरही मूग किंवा उडीद पिकामध्ये किडीने आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यास लेबल क्लेमुनसार शिफारशींतील कीटकनाशकांचा वापर आलटून पालटून करावा.

Chart
ChartAgrowon

डॉ. प्रज्ञा कदम (कीटकशास्त्र विभाग) ९९७५८९४९९५

डॉ. मनोहर इंगोले (वनस्पती रोगशास्त्र विभाग) ९४२१७५४८७८

कडधान्य संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com