
कृष्णा जोमेगावकर
Rural Progress: नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांमध्ये ग्रामीण व शहरी भागात सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी एमएसडब्ल्यूपर्यंत शिक्षण झालेल्या रमेश अमरसिंग राठोड यांनी १९९६ मध्ये वनश्री सामाजिक, सांस्कृतिक व ग्रामीण विकास संस्थेची स्थापना केली. ग्रामीण व शहरी भागांतील लोकांचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी संस्था गेल्या वीस वर्षांपासून रचनात्मक विकास क्षेत्रात कार्यरत आहे. महिला सबलीकरण कार्यक्रम अंतर्गत स्वयंसहायता बचत गट स्थापन व सशक्तीकरण करण्यात आले.
समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून गरजूंना सल्ला व मार्गदर्शन देण्यात येते. संस्थेमार्फत अंतर्गत बचत गटांसाठी मालकी हक्क वाटप व आर्थिक मदत, ग्रामीण महिला उद्योजक पतसंस्थेसाठी नवीन शाखा स्थापना आणि बळकटीकरण, महिलांना मार्गदर्शन व लघू कंपन्यांची स्थापना व संचालन, बचत गट, शाश्वती बचत समूहांबाबत काम केले जाते. विविध शिबिरांचे नियोजन, अभ्यास दौरा, संयुक्त देवता समूह, महिला दिन महोत्सव इत्यादी उपक्रम संस्थेतर्फे राबवले जातात.
स्वयंसाह्यता बचत गट निर्मिती
संस्थेअंतर्गत महिला सबलीकरणासाठी गावांतील महिलांना एकत्रित करून संघ बांधण्यात आला आहे. महिला स्वयंसाह्यता समूहाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील भोकर, हदगाव, हिमायतनगर, उमरी, किनवट, नांदेड तालुक्यांतील विविध भागांमध्ये १,२५४ स्वयंसाह्यता गटांची नोंदणी झाली आहे. महिलांना बचत गटांच्या माध्यमातून एकत्रित आणून त्यांना वेगवेगळ्या टप्प्यांवर प्रशिक्षण देण्यात येते. २०१९-२० या आर्थिक वर्षामध्ये महिला सबलीकरण अंतर्गत ३२५ महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली. संस्थेअंतर्गत गेल्या वीस वर्षांमध्ये सहा तालुक्यांत विविध बॅंकांच्या मदतीने महिलांना आर्थिक साह्य करण्यात आले आहे.
लघू उद्योग उभारणीस चालना
भोकर, हदगाव, हिमायतनगर तालुक्यातील महिला बचत गटांना सावकारी कर्जातून मुक्त करण्यासाठी व त्यांना व्यवसायाच्यादृष्टीने गरजांची पूर्तता आणि त्यांना लघू उद्योग उभारण्यासाठी २०१९ पासून नाबार्ड फायनांन्शियल सर्व्हिसेस सोबत करार केला आहे. या संस्थेच्या माध्यमातून महिला बचत गटांना वेगवेगळ्या स्तरावर प्रशिक्षण दिले जाते. बचत गटांना गावात जाऊन कमी व्याज दराने कर्ज दिले जाते. चालू आर्थिक वर्षांमध्ये भोकर, हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील ६५ गावांतील २०१ बचत गटांना ६ कोटी ७८ लाख रुपये कर्जाच्या स्वरूपात पुरवठा करण्यात आला आहे. व्याज कमी, गावात येऊन कर्ज देणे आणि कर्ज परतफेड फक्त मासिक आहे. यामुळे महिलांनी बचत गटांमधून घेतलेले कर्ज हे मुलांचे शिक्षण, शेती व छोटे उद्योग व्यवसायासाठी वापरले जाते. महिलांनी या कर्जाची वेळेत परतफेड केली आहे.
सेवा केंद्रांची स्थापना
वनश्री संस्थेतर्फे नांदेड जिल्ह्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे, तसेच लघू उद्योगांना चालना मिळावी यासाठी धनसंपदा महिला अर्बन को-ऑप. सो. लि.तर्फे कार्यक्षेत्रामध्ये पाच सेवा केंद्रांची स्थापना करण्यात आली. यातून लोकांना आर्थिक साह्य केले जाते. यामध्ये दैनिक पिग्मी, आर्थिक बचत गट, सोनेतारण, व्यवसाय कर्ज, वाहन कर्ज, संयुक्त देयता समूह कर्ज, घर दुरुस्ती कर्ज, पगार तारण कर्ज, मुदत, छोटे लघू उद्योगांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
माहेर महासंघाची स्थापना
वनश्री ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून १२५ बचत गटांमध्ये १५०० सभासदांचा सहभाग आहे. या माध्यमातून सामाजिक, आर्थिक व राजकीय स्तरावर महिलांचे मनोबल वाढवण्यासाठी संस्थेने माहेर महासंघाची स्थापना केली आहे.
आधार समुपदेशन केंद्र
महाराष्ट्र राज्य महिला आयोगामार्फत जिल्हा परिषद नांदेड, पंचायत समिती, भोकर यांच्या संयुक्त विद्यमाने वनश्री संस्थेच्या माध्यमातून आधार समुपदेशन केंद्र बारा वर्षांपासून कार्यरत आहे. हे समुपदेशन केंद्र चालवत असताना आलेले प्रकरण व्यक्तिगत पातळीवर हाताळले जाते. सगळ्या गोष्टी गुपित ठेवल्या जातात. समुपदेशन केंद्राची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी वेळोवेळी जनजागृती कार्यक्रम जिल्हा परिषद कार्यालय, तहसील कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालय, विविध पोलिस ठाणे, तसेच महिला व बालकल्याण विभाग, महिला निवारण केंद्र इत्यादी कार्यालयाशी समन्वय साधून आयोजित केला जातो. जिल्ह्यातील ५ तालुक्यांत महिला समुपदेशन केंद्र कार्यरत आहेत.
संयुक्त देयता समूह
वनश्री संस्थेच्या वतीने जेएलजी संयुक्त देयता समूह प्रकल्प हाती घेतला आहे. प्रकल्पामध्ये संस्थेच्या माध्यमातून ५० जेएलजी संयुक्त देयता समूहांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. संस्थेचे मुख्य कार्य महिला सबलीकरण हे आहे. या कार्यामध्ये एसएचजी बचतगट हे माध्यम होते. पण बदलत्या काळानुसार छोटा गट बनवून आर्थिक व्यवहार आणि व्यवसाय करण्याचे वातावरण निर्माण होत आहे.
महा श्रमदानाचे आयोजन
पाणी फाउंडेशन अंतर्गत भोकर तालुक्यामधील काही गावांमध्ये श्रमदानातून पाणी पातळी वाढवणे, गाव स्वच्छ सुंदर व गावाचा विकास हा कार्यक्रम चालू आहे. यामध्ये गावकऱ्यांचा चांगला सहभाग आहे. संस्थेकडून संबंधित गावातील बचत गटांची समिती स्थापन करून त्या गावातील महिलांचा सहभाग वाढविला आहे. १ मे २०१९ रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त पांडुरणा गावशिवारामध्ये संस्थेचे कर्मचारी आणि गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात श्रमदान केले होते. त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.
स्वयंरोजगार
स्वयंसाह्यता बचत गटाच्या माध्यमातून महिला उद्योजक गटांना शेळी पालन, दूध व्यवसाय, अन्न प्रक्रिया, सोयाबीन प्रक्रिया, फॅशन डिझायनिंग, बेकरी उत्पादने, टेलरिंग, बॅग मेकिंग बाबत प्रशिक्षण दिले जाते. महिलांना स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी प्रेरित करून बँकेसोबत जोडले जाते. विविध प्रकारच्या व्यवसायातून ३२५ महिलांना स्वयंपूर्ण करण्याचे कार्य संस्थेने केले आहे.
शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी व विकास
वनश्री संस्थेच्या वतीने नांदेड, हिंगोली, परभणी, यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनीसाठी जनजागृती कार्यक्रम चालू आहे. यांपैकी नांदेड, हिंगोली जिल्हामध्ये केंद्र शासन, नाबार्ड यांचे मार्गदर्शक तत्त्व आणि आर्थिकसाह्याने नांदेड जिल्ह्यांतर्गत भोकर, हदगाव, हिमायतनगर, नांदेड या तालुक्यात पाच शेतकरी उत्पादक कंपन्या आणि हिंगोली जिल्ह्यातील वसमत व कळनुरी तालुक्यामध्ये तीन शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करून नोंदणी करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आठ कंपन्यांचे मिळून २००० शेअर्स देण्यात आले आहेत. कंपनीचे कागदपत्रे अद्ययावत करणे, पोर्टलवर माहिती भरणे, वार्षिक अहवाल निर्मिती तसेच कंपनीचे संचालक व सीईओ यांना प्रशिक्षित केले जाते. याबरोबरीने मासिक आठवडा बैठक घेणे, कृषी सेवा केंद्र उघडणे, कंपनीसाठी विविध प्रकारचे ट्रेड लायसेन्स, शासनाच्या विविध योजनांचे कंपनीशी अद्ययावत माहिती देणे इत्यादी कार्य संस्थेच्या वतीने करण्यात येते.
- रमेश राठोड ९४०३३२३२१०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.