Orange Fruit Agrowon
संपादकीय

Orange Fruit Fall : फळगळ आख्यान

विजय सुकळकर

Issue of Orange Fruit Fall : विदर्भात संत्र्याचे सव्वा लाख हेक्टर क्षेत्र आहे. यातील अमरावती विभागातील एक लाख हेक्टरपैकी उत्पादनक्षम ६५ हजार हेक्टर तर नागपूर विभागातील २५ हजार हेक्टरपैकी १० हजार हेक्टर क्षेत्राचे संत्रा फळगळतीने मोठे नुकसान झाले आहे. अमरावती, नागपूर पट्ट्यात मागील चार वर्षांपासून संत्रा फळगळीची समस्या वाढली आहे. संत्रा फळगळतीच्या समस्येने उत्पादक त्रस्त झाले असून, काही शेतकऱ्यांनी फळगळतीला कंटाळून बागा काढून टाकल्या आहेत. वर्ष २०२२ मध्ये संत्रा फळगळतीमुळे ५०० कोटींचा फटका उत्पादकांना बसला आहे.

फळगळीचे हे सत्र २०२३ आणि २०२४ मध्ये देखील सुरूच आहे. मुळात बदलत्या हवामान काळात संत्र्यासह मोसंबी, लिंबू या फळपिकांचे बहर व्यवस्थापन फारच जिकिरीचे ठरतेय. त्यात वाढत्या नैसर्गिक आपत्तींनी संत्रा उत्पादन घटत आहे. संत्र्याला मागील काही वर्षांपासून दरही कमीच मिळतोय. त्यातच वाढत्या फळगळतीने थेट नुकसान होत असल्याने संत्रा उत्पादक हवालदिल झाले आहेत.

संत्रा फळगळीची कारणे अनेक आहेत. संक्रमित लागवड साहित्य, असंतुलित पोषण, सलग उघडीप व त्यानंतर पाऊस, पावसाची झड, कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव, वादळी वारे, गारपीट आदी कारणांमुळे संत्रा फळगळ होते. त्यामुळे फळगळ वाढली असता नेमक्या कोणत्या कारणाने ती होत आहे, अथवा झाली आहे, हे तज्ज्ञांच्याही लक्षात येत नाही.

त्यामुळे निश्‍चित उपाययोजनेसंदर्भात त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळत नाही. मृग बहारातील फळांची गळ ही नैसर्गिक असते. या काळात फुलधारणा मोठ्या प्रमाणात होऊन त्यातील दोन-तीन टक्के फुलांपासूनच फळ उत्पादन मिळते. बाकी सर्व फळे गळून जातात. असा हा फळगळीचा एकंदरीतच मोठा गुंता आहे.

इतर पिकांच्या नुकसानीप्रमाणे संत्रा फळगळीचे पाहणी-पंचनामे होतात. शासन मदतीची घोषणा करते. त्यातून काहींना मदत मिळते, तर अनेक वंचितच राहतात. नुकसानीच्या प्रमाणात मिळणारी मदत तुटपुंजी असते. संत्रा उत्पादकांना विमा संरक्षण देण्यात आले असले तरी विमा परताव्याच्या ट्रिगरमध्ये फळगळीचा निकष नाही. त्यामुळे विमाधारक शेतकरी सुद्धा भरपाईपासून वंचितच राहतात.

संत्रा फळगळीच्या बाबतीत अनेकदा संशोधक तसेच कृषी विभागाकडून साधी दखलदेखील घेतली जात नाही, असा उत्पादकांचा अनुभव आहे. काही वेळा केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्रे यांतील तज्ज्ञ प्रत्यक्ष बांधावर जाऊन उपाय सुचवितात, परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. उपाय योजनांमध्ये देखील पीक पोषणासह कीड-रोग नियंत्रणावर भर असल्याने उत्पादक गोंधळून जातात.

२०२२ मध्ये तर फळगळ नियंत्रणासाठी संशोधन संस्था तसेच कृषी विभागाकडून शिफारस होत नाही, अशा तक्रारी वाढलेल्या असताना कृषी विभागाने ३० हून अधिक प्रशिक्षित कृषी पर्यवेक्षकांच्या माध्यमातून उपाय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी टास्क फोर्स गठीत करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्याचेही अपेक्षित परिणाम दिसत नाहीत. संत्रा फळगळीची कारणे अनेक असली तरी नेमकी कशामुळे फळगळ होत आहे, हे वेळोवेळी स्पष्ट झाले पाहिजेत.

यासाठी संशोधकांनी संशोधन वाढवायला हवे. विशेष म्हणजे फळगळ होत असताना नेमका उपाय उत्पादकांना सुचवायला हवा. त्या उपायांची परिसरातील सर्व संत्रा उत्पादकांकडून प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न वाढवायला हवेत. संत्रा फळगळीसाठी प्रतिबंधक उपाययोजना बहर व्यवस्थापनातच उत्पादकांना सांगायला हव्यात. संत्रा उत्पादकांनी सुद्धा आपल्या बागेचे अन्नद्रव्य, कीड-रोग व्यवस्थापन अगदी योग्य पद्धतीने तज्ज्ञांच्या सल्ल्याने करायला हवे. बाराही महिने संत्रा बाग स्वच्छ राहील, ही काळजी घेतली पाहिजे. पक्व फळांची गळ होत असताना पडलेली फळे प्रक्रियेसाठी वापरता येतील का, यावरही काम झाले पाहिजे. असे झाल्यास संत्रा फळगळ कमी होऊन उत्पादकांचे आर्थिक नुकसानही कमी होऊ शकते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कापसाच्या भावात चढ उतार सुरुच; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत ज्वारीचे दर?

Ghatkhed KVK : घातखेड ‘केव्हीके’चे तंत्रज्ञान विस्तारात मोठे योगदान

Chana Cultivation : हरभऱ्याच्या भरघोस उत्पादनासाठी महत्वाच्या तीन गोष्टी

Agriculture Award : सात जणांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

Agro Business : तरुणांनी कृषिपूरक व्यवसायाकडे वळावे

SCROLL FOR NEXT