Poultry  Agrowon
संपादकीय

Poultry : परसातील कुक्कुटपालन कधी होणार ‘ओक्के’

व्यावसायिक कुक्कुटपालनाच्या तुलनेत परसातील कुक्कुटपालनाचा वेग खूप मंदावलेला आहे, किंबहुना याकडे संबंधितांनी लक्षच दिले नाही. शेतकरी कुंटुंबाला चांगला आर्थिक स्रोत आणि शेतीला खत देणाऱ्या या व्यवसायाकडे दुर्लक्ष करणे आपल्याला परवडणार नाही.

डॉ. व्यंकटराव घोरपडे  

परसातील कुक्कुटपालन (Backyard Poultry Farming) हा खरेतर राज्यातील महिला वर्गाला मुख्य प्रवाहात आणणारा आणि कुटुंबासह गाव, तालुका, जिल्ह्यातील एका मोठ्या वर्गाची सामुदायिक उद्योग क्षमता विकसित करणारा व्यवसाय आहे. एकूणच परसातील कुक्कुटपालन (Poultry Farming) हा पारंपरिक व्यवसाय अनेक वर्षापासून देशात, राज्यात केला जातो. कमी खर्चात चांगला नफा देणारा असा हा व्यवसाय घरातील महिला, वृद्ध स्त्री- पुरुष, अगदी दिव्यांग मंडळीसुद्धा करू शकतात. आतापर्यंत फक्त रात्रीचा निवारा, नैसर्गिक अंडी उबवणूक, अल्प उत्पादन, स्थानिक बाजारपेठ आणि कमीत कमी आरोग्य सुविधा यावरच हा व्यवसाय अवलंबून होता, किंबहुना आजही आहे. याउलट देशातील, राज्यातील एकूणच व्यावसायिक कुक्कुटपालन तज्ज्ञ आणि भांडवलदार मंडळीमुळे प्रगती, विकास, संशोधन होऊन एका मोठ्या उद्योगाचे स्वरूप धारण केले आहे.

देशात व्यावसायिक कुक्कुटपालनातून जवळपास ७५ टक्के अंडी निर्माण होतात, उर्वरित २५ टक्के उत्पादन हे या परसातील कुक्कुटपालन जे असंघटित आहे त्याद्वारे निर्माण होतात. २० व्या पशुगणनेनुसार देशातील एकूण कुक्कुट पक्षी संख्या ८५१.८१ दशलक्ष आहे. त्यांपैकी ३१७.०७ दशलक्ष पक्षी हे परसातील कुक्कुटपालनातून येतात. या पूर्वीच्या १९ व्या पशुगणनेच्या तुलनेत ही वाढ ४५.८ टक्के आहे याचा अर्थच सर्व काही दर्शवतो. इंटिग्रेटेड सर्वे स्कीम २०१९-२० च्या अहवालानुसार राज्यातील कुक्कुट पक्षी संख्या ही २.४७ कोटी असून, अंडी उत्पादन ६६७ कोटी आहे, पैकी देशी कोंबड्यांचे अंडी उत्पादन हे १२० कोटी आहे.

परसातील कुक्कुटपालन हा सुद्धा व्यवसाय म्हणून पुढे यायला हवा होता. व्यावसायिक कुक्कुटपालनाच्या तुलनेत याचा वेग खूप मंदावलेला आहे, किंबहुना याकडे संबंधितांनी फार लक्ष दिले आहे असे जाणवत नाही. याद्वारे कुटुंबाला आर्थिक स्रोत, चांगले खत मिळू शकते. व्यावसायिक कुक्कुटपालनातून निर्मित उत्पादनापेक्षा जादा पैसे यातून निर्मित मांस व अंड्यांना मिळू शकतात. सुरुवातीचे कमी भांडवल, घरादारांसाठी पौष्टिक आहार देणारा असा हा व्यवसाय येणाऱ्या काळातील संसर्गजन्य आजाराचे वाढते प्रमाण आणि प्रत्येक व्यक्तीची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी याकडे सर्वांनी, संबंधितांनी जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवे याबाबत दुमत असण्याचे कारण नाही.

व्यावसायिक कुक्कुटपालनाच्या तुलनेत कमी मजूर, कमी भांडवल, कमी उत्पादन खर्च, उत्पादित अंडी आणि मांस यांचा उत्कृष्ट स्वाद आणि दर्जा, कमीत कमी पशुवैद्यकीय सेवा, कमी बाह्य स्रोतांवर अवलंबून राहणं यासह कमीत कमी जोखीम आणि सर्वांत महत्त्वाचे अल्प अत्यल्पभूधारक पशुपालक त्यांचे कुटुंबीय यांचा सहभाग वाढवून त्यांना मुख्य प्रवाहात आणता येते. या सर्व बाबी एखादे शासकीय धोरण ठरवताना महत्त्वाच्या ठरत असताना देखील या व्यवसायास राजाश्रय मिळाला नाही. याबाबतीत धोरणकर्त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष देणे अनिवार्य आहे. आतापर्यंत या व्यवसायात संपूर्ण देशी पक्षी वापरला जात होता. अशा पक्ष्यांची वाढ कमी होती, कमी वजनाची अंडी, अंड्यावर येण्यासाठी लागणारा जादा वेळ, लहान अंडी आणि कमी उत्पादन त्याचप्रमाणे खुडूक बसण्याचा कालावधी यामुळे आणि वाढत चाललेल्या व्यावसायिकतेमुळे थोडे दुर्लक्ष नक्कीच झाले.

देशातील ‘भारतीय कृषी अनुसंधान परिषदे’अंतर्गत कुक्कुट अनुसंधान निर्देशालय हैदराबाद खाली असणाऱ्या ‘अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प’ (AICRP) व कुक्कुट बीज प्रकल्प (PSP) या प्रत्येकी १२ अशा निरनिराळ्या २४ राज्यांतील संस्थानी पुढाकार घेऊन स्थानिक विशिष्ट कोंबड्यांच्या वाणांचा विकास करणे, ग्रामीण शुद्ध जाती तसेच अंड्यावरील पक्षी व मांसल पक्ष्यांचे संवर्धन, सुधारणा व मूल्यमापन करत देशातील ग्रामीण भागात, आदिवासी भागात कुक्कुटपालन आणि उद्योजकता विकासास चालना दिली. राज्यातील देशी पक्ष्यांत सुधारणा घडवून ग्रामीण कुक्कुटपालनासाठी देशी सुधारित संकरित पक्षाचे वाण निर्माण करून त्या त्या राज्यात वितरित केले व परसातील कुक्कुटपालनात सुधारणा करून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले. उत्पन्नवाढीमुळे लोकांचा प्रतिसाद देखील वाढला. या सुधारित पक्ष्यांमुळे मोठ्या प्रमाणात रोगापासून होणारे नुकसान टळले. वार्षिक मृत्युदर कमी झाला, वजन वाढ झाली त्याचबरोबर जादा वजनाचे अंड्याचे वार्षिक उत्पादनदेखील वाढले. पर्यायाने मग संबंधित राज्यांनी प्रोत्साहन देऊन परसातील कुक्कुटपालनाला चालना दिली.

राज्यात अशा प्रकारच्या अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प व कुक्कुट बीज प्रकल्प आपण कार्यान्वित करू शकलो नाही तसा प्रस्ताव आपण भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत कुक्कुट अनुसंधान निर्देशालय, हैदराबाद यांच्याकडे सादर केला नाही ही वस्तुस्थिती आहे. याबाबतची स्पष्ट नाराजी संचालक, डीपीआर हैद्राबाद यांनी ब्लू क्रॉस वेल्फेअर फाउंडेशन सांगली व शेकरू टीव्ही यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वेबीनारमध्ये व्यक्त केली होती. अजूनही संबंधितांनी याबाबत विचार करावा आणि एक चांगला प्रस्ताव सादर करून राज्यातील वातावरणात रुळणारा आणि सर्वसमावेशक पक्षी निर्माण करण्यासाठी संशोधनात्मक पाऊल उचलले तर निश्‍चितपणे परसातील कुक्कुटपालन व्यवसायास चालना मिळेल.

पशू संवर्धन विभागाचे राज्यात एकूण चार मध्यवर्ती अंडी उबवणूक केंद्र कार्यान्वित आहेत. त्यामध्ये पुणे (स्थापना १९२५) औरंगाबाद (१९६२) कोल्हापूर (१९४६) नागपूर (१९४४) व विभागीय स्तरावर एकूण १५ सधन कुक्कुट विकास गट कार्यान्वित आहेत. प्रत्येक प्रक्षेत्र व गटाच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. तथापि, याद्वारे महाराष्ट्रात सुधारित जातीच्या कुक्कुट पक्ष्यांचे, उगवणुकीची अंड्यांचे, एक दिवसाच्या मिश्र पिलांचे वाटप त्याचबरोबर शेतकरी, महिला गट, सुशिक्षित बेरोजगार युवक, महाविद्यालयीन विद्यार्थी यांना ८, १५, आणि ३० दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. सध्या प्रशिक्षणाची सोय फक्त पुणे आणि कोल्हापूर येथील प्रक्षेत्रावर उपलब्ध आहे. सोबतच वेगवेगळ्या सेवाभावी संस्था, पशुवैद्यकीय महाविद्यालये येथे देखील प्रशिक्षण आयोजित करत असतात. त्याचा देखील फार मोठा चांगला परिणाम या व्यवसाय वृद्धीसाठी होताना दिसतो. तथापि या प्रशिक्षणाचा कालावधी व आनुषंगिक इतर बाबी याबाबत बदल होणे अपेक्षित आहे.

तसेच त्याचे आयोजन गावपातळीवर तालुका पातळीवर नियमित होणे आवश्यक आहे. नियमित प्रशिक्षणामुळे व्यावसायिक दृष्टिकोनामध्ये वाढ होईल, बचत गट स्वतः पुढे येतील पशुपालक उत्पादक कंपन्यांची स्थापना होईल. चांगली विक्री व्यवस्था निर्माण करतील. आधुनिकीकरणाची कास धरून ‘हॅपी हेन कन्सेप्ट' या नवीन येऊ घातलेल्या संकल्पनेत उतरून कुक्कुट पक्ष्यांची संख्या वाढवून खर्च कमी, उत्पादन जास्त घेऊन आपल्या उत्पादनात भर टाकतील. प्रशिक्षणामुळे नियमित खाद्य, दैनंदिन व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन याचा दर्जा सुधारेल आणि उत्पादन वाढवून उत्पन्न वाढेल. तसेच लसीकरणाबाबत गैरसमजुती दूर होतील. अशा परिस्थितीत या व्यवसायात कुक्कुट पक्ष्यांची संख्या वाढली तर पशुसखी, पशुमित्र यांच्या माध्यमातून सेवा सुविधा पुरवता येतील व येणाऱ्या काळात निश्चितपणे राज्यात एक चांगले चित्र निर्माण होऊन ग्रामीण विकासात सर्वांचे योगदान वाढेल.

(लेखक पशू संवर्धन विभागाचे सेवानिवृत्त सहायक आयुक्त आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT