Poultry : चिकनचे दर का सुधारले ?

Team Agrowon

उत्तर भारतातील हरियाणा (Haryana) , दिल्लीतील (Delhi) व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रातील पोल्ट्री व्यावसायिकांकडून (Poultry Industry) पोल्ट्री पक्ष्यांची खरेदी केली. परिणामी महाराष्ट्रातील चिकनच्या प्रतिकिलो दरात सुधारणा झाली आहे. चिकनचे दर ५० वरून ८० रुपयांवर पोहोचले आहेत.

राज्यातील अडचणीतील पोल्ट्री व्यावसायिकांसाठी हा मोठा आधार ठरला आहे. मात्र पक्ष्यांच्या उत्पादकता खर्च (Production Cost) आणि दरात आजही १५ रुपयांची तूट व्यावसायिकांना सहन करावी लागत आहे.

राज्यात यापूर्वी १३ ते १५ हजार पोल्ट्री व्यावसायिक होते. पशुखाद्यात सातत्याने होणाऱ्या वाढीच्या परिणामी ही संख्या कमी झाली. राज्यात पोल्ट्री व्यावसायिकांची संख्या ६ ते ७ हजारांपर्यंत खाली आली आहे.

सध्या बहुतांश शेतकरी कंपन्यांकडून करारावर हा शेतीपूरक व्यवसाय करण्यावर भर दिला जात आहे. त्यातच श्रावण महिन्यात मागणीत झालेल्या घटीचा फटका या व्यवसायाला बसला आहे. त्यामुळे चिकनचे दर गेल्या महिन्यापर्यंत ५० रुपये किलोपर्यंत खाली आले होते.

चिकनचा प्रति किलो खर्च ९० रुपये आहे; मात्र दर निम्म्यावर आल्याने ही तूट कशी भरून काढावी या विवंचनेने पोल्ट्री व्यावसायिकांना ग्रासले होते. दरम्यान हरियाणा, दिल्ली भागात ७८ रुपये किलोचा दर आहे. महाराष्ट्रात २८ रुपयांच्या फरकाने पक्षी मिळत असल्याने त्या भागातील व्यापाऱ्यांनी या भागातून ५० रुपये किलोने खरेदी केली.

त्यामुळे सद्या पोल्ट्री व्यावसायिकांकडे पक्ष्यांची उपलब्धता कमी आहे तर काहींनी विक्रीनंतर १० हजार पक्ष्याची क्षमता असताना २ ते ३ हजार इतक्‍या कमी संख्येने शेडमध्ये नव्याने पक्षी आणले आहेत. या साऱ्याच्या परिणामी बाजारात आता मांसल कोंबड्यांची उपलब्धता कमी झाल्याने दरात तेजी आली असून हे दर ८० रुपयांवर पोहोचले आहेत.

मांसल कोंबड्यांचा सध्याचा उत्पादन खर्च ९० रुपये प्रतिकिलो आहे. त्यामध्ये पशुखाद्याच्या दरात सातत्याने होणारी वाढ हे मुख्य कारण ठरले आहे. मका चार महिन्यांआधी १७ रुपये किलो होता तो वाढून आता २६ रुपये ५० पैसे किलोवर पोहोचला आहे

हेही पाहा