
Sangli News : ‘टेंभू’, ‘ताकारी’, ‘म्हैसाळ’, आरफळ सिंचन योजनांचे पाणी शिवारात फिरू लागल्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीत विविध प्रयोग सुरू केले. शेतकऱ्यांचा फळ लागवडीकडे कल वाढला आहे.
सतरा प्रकारच्या फळबागांचे क्षेत्र गतीने वाढत असून आतापर्यंत ४३ हजार ६९७ हेक्टर म्हणजे १ लाख ९ हजार एकरांहून अधिक झाले आहे. जत तालुक्यात सर्वाधिक फळबाग क्षेत्र आहे.
जिल्ह्यात कृष्णा, वारणा नद्यांच्या काठावरील ऊस शेतीवर शेतीचे अर्थकारण अवलंबून होते. टेंभू, म्हैसाळ योजनेसह तासगाव, मिरज पूर्व भाग, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यात द्राक्ष क्षेत्र विस्तारले आहे. आटपाडीत त्या तुलनेत डाळिंब क्षेत्रही विस्तारले. गेल्या चार-पाच वर्षांत मात्र जिल्ह्याच्या सर्वच भागांत फळबागांमध्ये वैविध्य यायला लागले आहे.
एकीकडे ड्रॅगन फ्रूटसारखे फळ स्थिरावले. समवेत बोर, सीताफळ, आंबा, चिकू बागांचे क्षेत्र वाढत निघाले. आता हे क्षेत्र ४३ हजार हेक्टरचा टप्पा पार करून पुढे गेले आहे. सर्वच तालुक्यांमध्ये फळ पिकांचे क्षेत्र वाढताना दिसते आहे.
त्यात मिरज तालुक्यात ७ हजार १३, वाळवा तालुक्यात १४१६, शिराळ्यात १५२, तासगाव १० हजार, खानापूर १३७३, पलूस १६६५, कडेगाव ३६०, आटपाडी ५ हजार ९१४ , जत तालुक्यात सर्वाधिक ११ हजार १०५, कवठेमहांकाळला ४ हजार ६९३ हेक्टर क्षेत्र आहे.
गेल्या काही दिवसापासून दुष्काळी भागासह अन्य तालुक्यात आंबा लागवड करण्यासाठी शेतकरी पुढे आले असल्याचे चित्र आहे. पेरू, सीताफळ यांची लागवड होत आहे.
पीक व क्षेत्र (हेक्टरमध्ये)
द्राक्ष ३० हजार ८५३
डाळिंब ८ हजार ११३
आंबा १ हजार ९०८
चिकू २६६
पेरू ५७०
केळी ६४९
पपई २१९
सीताफळ ५४९
बोर १२०
नारळ १२७
लिंबू ११६
आवळा २४
ड्रॅगन फ्रूट १६३
‘‘सिंचन योजनांचे पाणी ठिबकद्वारे वापरून फळबागा पिकविणे निश्चितच लाभदायी ठरते. त्यामुळे द्राक्ष, डाळिंबासह शेतकरी आता विविध फळपिके घेत आहेत. पांढरा जांभूळ, अंजीर अशी पिकेही घेतली गेली आहेत. हा प्रयोग कौतुकास्पद आहे. जिल्ह्यातील शेतकरी धाडस करतोय. त्याच्या पाठीशी कृषी विभाग नेहमी आहे.’’
विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.