Dragon Fruit Agrowon
संपादकीय

Dragon Fruit : बहुगुणी ड्रॅगन फ्रूट

Dragon Fruit Farming : दुष्काळी पट्ट्यासाठी ड्रॅगन फ्रूट एक चांगला पर्याय ठरत असताना विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या दुष्काळी, कोरडवाहू भागात देखील हे फळपीक पोहोचायला हवे.

विजय सुकळकर

Dragon Fruit Production : ड्रॅगन फ्रूट हे मागील दशकभरात राज्यात पीक पद्धतीत रुजलेले फळपीक! मागील वर्षभरात राज्यात ड्रॅगन फ्रूटचे ५०० ते ६०० एकर क्षेत्र वाढले असून, आता सुमारे साडेआठ हजार हेक्टरवर क्षेत्र गेले आहे. २०१३-१४ मध्ये हे पीक राज्यात घेण्यास सुरुवात झाली. २०१८ मध्ये केवळ ४० एकरांवर ड्रॅगन फ्रूटची लागवड होती.

त्यानंतर मात्र क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. या वर्षीचा ड्रॅगन फ्रूटचा हंगाम सुरू झाला असून, उन्हाळ्यातील अति उष्ण तापमान वगळता या पिकास पोषक वातावरण लाभल्याने बागा चांगल्या बहरल्या आहेत. या वर्षी ड्रॅगन फ्रूटला दरही चांगला (१०० ते १२० रुपये प्रतिकिलो) मिळतोय. विशेष म्हणजे आपल्या राज्यासह केरळ, तमिळनाडूमधून ड्रॅगन फ्रूटला मागणी वाढत असल्याने हा दर टिकून राहील, असा अंदाज उत्पादकांनी व्यक्त केला आहे, ही जमेची बाजू म्हणावी लागेल.

राज्यात ड्रॅगन फ्रूटची लागवड प्रामुख्याने सांगली, सातारा, पुणे, नगर, सोलापूर, नाशिक या जिल्ह्यांत वाढत आहे. हा खरे तर द्राक्ष, डाळिंब पट्टा आहे. परंतु मागील काही वर्षांतील वाढत्या नैसर्गिक आपत्तींमुळे द्राक्ष आणि डाळिंबाचे नुकसान होऊन उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याने शेतकऱ्यांचा कल ड्रॅगन फ्रूटकडे वाढतोय.

कमीत कमी पाण्यात खडकाळ जमिनीत ड्रॅगन फ्रूट चांगले येते. दुष्काळी पट्ट्यासाठी ड्रॅगन फ्रूट एक चांगला पर्याय ठरत असताना विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या दुष्काळी, कोरडवाहू भागात पण हे फळपिक पोहोचायला हवे.

राज्यात ड्रॅगन फ्रूटची लागवड वाढत असताना खात्रीशीर, दर्जेदार रोपांसाठी एकही शासनमान्य रोपवाटिका नाही. त्यामुळे ड्रॅगन फ्रूटची लागवड करताना काही शेतकऱ्यांची फसवणूक होते. हे टाळण्यासाठी राज्यात किमान एक तरी शासन मान्यताप्राप्त रोपवाटिका असायला पाहिजे. ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी एकरी पाच लाखाहून अधिक खर्च येतो. त्या तुलनेत अनुदान मात्र एकरी एक लाख ६० हजारच मिळते.

ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी डीबीटीद्वारे अनेक शेतकरी अर्ज करतात. परंतु त्यातील काही शेतकऱ्यांनाच लागवड अनुदान मंजूर होते. ड्रॅगन फ्रूटची लागवड करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला अनुदानाचा लाभ मिळायला हवा. ड्रॅगन फ्रूट हे पोषणमूल्ययुक्त, आरोग्यदायी फळपीक आहे. त्यात कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह आणि भरपूर जीवनसत्त्वे आहेत. ड्रॅगन फ्रूट सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास हातभार लागतो.

शिवाय रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहत असल्याने हृदयविकाराचा धोका संभवत नाही. ड्रॅगन फ्रूटमुळे रक्तातील हिमोग्लोबीन वाढते. डेंगी, मलेरिया, चिकुनगुनिया यांसारख्या आजारांत कमी झालेल्या पेशी वाढविण्याचे काम हे फळ करते. बहुगुणी अशा ड्रॅगन फ्रूट खाण्याबाबत अजूनही म्हणावे तसे प्रबोधन ग्राहकांमध्ये झाले नाही. ड्रॅगन फ्रूटची उपयुक्तता सर्वदूर पसरल्यास बाजारात उठाव वाढून दरही चांगले मिळतील.

ड्रॅगन फ्रूटचा हंगाम जून ते नोव्हेंबर असला तरी राज्यात बाजारात एकदाच फळांची आवक वाढून दर खाली येतात. अशावेळी टप्प्याटप्प्याने फळे बाजारात येण्यासाठी बहर नियोजनात काही बदल करता येईल का, यावर संशोधन झाले पाहिजेत. फळांची टिकवण क्षमता वाढविण्याच्या दिशेने सुद्धा प्रयत्न व्हायला हवेत.

ड्रॅगन फ्रूटची फळे एक-दीड महिना आपण टिकवून ठेवू शकलो, तर बाजारातील आवकेवर आळा बसून दर नियंत्रणात राहतील. याकरिता बंगळूर येथील ‘आयआयएचआर’सह इतरही संशोधन संस्थांत उत्पादक पाठपुरावा करीत आहेत.

त्यात केंद्र तसेच राज्य शासनाने देखील लक्ष घालायला हवे. शिवाय फळाची साठवणूक करण्यासाठी लागवड अधिक असलेल्या जिल्ह्यात कोल्ड स्टोअरेज उभे करायला हवेत. ड्रॅगन फ्रूटवर प्रक्रिया आणि ताज्या फळांसह प्रक्रियायुक्त पदार्थ निर्यातीवरही राज्यात व्यापक काम झाले पाहिजेत. असे झाले तरच ड्रॅगन फ्रूट उत्पादकांसाठी वरदान ठरेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT