Dragon Fruit Farming : दर्जेदार ड्रॅगन फ्रूट उत्पादनासाठी शेडनेटचा वापर

Dragon Fruit Management : शेडनेटच्या वापरामुळे ड्रॅगन फ्रूट फळांची गुणवता आणि उत्पादनात ४० ते ७० टक्के सुधारणा होते. सनबर्नच्या प्रभावी नियंत्रणासाठी आणि दर्जेदार फळांच्या सुधारित उत्पादनासाठी ५० टक्के काळ्या, पांढऱ्या आणि हिरव्या शेडनेटची संस्थेने शिफारस केली आहे.
Dragon Fruit
Dragon FruitAgrowon

विजयसिंह काकडे, अमोल पाटील

Dragon Fruit Production : प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या अर्धशुष्क व उष्ण दमट प्रदेशात ड्रॅगन फ्रूटची लागवड मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

या भागात उन्हाळ्यामध्ये तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त जाते, त्यामुळे सनबर्नची समस्या दिसून येते. उच्च तापमानाच्या ताणामुळे ड्रॅगन फ्रूटमध्ये होणारी सनबर्नची इजा टाळण्यासाठी शेडनेट (Shed Net) तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा ठरतो.

ड्रॅगन फ्रूटमधील क्रॅसुलेसीयन (Crassulacean) अम्ल चयापचय स्वरूपामुळे, इतर वनस्पतींच्या तुलनेत, पर्णरंध्रे दिवसा बंद असतात, त्यामुळे अनेक उत्पादकांना सनबर्नची समस्या उद्‍भवते. यामध्ये फांद्या (क्लेडोड) पिवळसर पडतात. याचे प्रमाण जास्त झाल्यावर पाने सडतात. यामुळे पानामधील हरितलवके कमी होतात, रोगांचे प्रमाण वाढते, शाखीय वाढीस अडथळा येतो, फळांचे उत्पादन (Phal Utpadan) आणि गुणवत्ता कमी होते.

काही शेतकरी पीक व्यवस्थापनासाठी बागेतील पाण्याचे प्रमाण कमी करतात. काही जण बागेमध्ये हिरव्या (५० टक्के) शेडनेटचे आच्छादन करतात किंवा झाडांवर केओलिन (५ ते १० टक्के) फवारतात. केओलिन सूर्यप्रकाश परावर्तित करून संरक्षण देते, परंतु शेडनेटमुळे आवश्यक सूक्ष्म हवामानात बदल होऊन वनस्पतींच्या वाढीसाठी होणारे फायदे मिळत नाहीत.

Dragon Fruit
Dragon Fruit : रामेश्वर आंबा संशोधन उपकेद्र प्रक्षेत्रावर ड्रॅगनफ्रूट लागवडीचा प्रयोग

सुधारित तंत्रज्ञान

संस्थेच्या प्रक्षेत्रावर २०२२-२३ मध्ये शेडनेटच्या माध्यमातून सनबर्न व्यवस्थापन तंत्र विकसित करण्यात आले. परिणामकारकतेच्या आधारे ५० टक्के तीव्रतेच्या काळ्या, पांढऱ्या आणि हिरव्या शेडनेटची शिफारस केली आहे.

बागेत शेडनेट बसविण्यासाठी १० मीटर अंतरावर ८ ते १० मीटर उंचीचे आरसीसी पोल किंवा लोखंडी पोल बसवून त्यावर २ मी ‘टी’ बार बसवावेत. उन्हाळ्यामध्ये (एप्रिल-मे) २ मीटर रुंदीचे शेडनेट झाडांच्यावर साधारण ०.७५ मी उंचीवर बांधावे. फांद्या शेडनेटला स्पर्श करणार नाहीत याची काळजी घ्यावी.

पावसाळ्याच्या सुरुवातीस किंवा एखादा पाऊस पडल्यानंतर किंवा तापमान कमी होण्यास सुरुवात झाल्यानंतर बागेतील शेडनेट काढून टाकावे.

तंत्रज्ञानाची कार्यक्षमता

शेडनेट प्रकाशाची तीव्रता ५० टक्के आणि तापमान अंदाजे ५ ते ६ अंश सेल्सिअसने कमी करण्यात प्रभावी ठरते, परिणामी सनबर्न आणि रोगाचा प्रादुर्भाव यामध्ये अनुक्रमे, ९० टक्के आणि ३५ टक्क्यांपर्यंत घट होते.

शेडनेटमुळे प्रकाशसंश्लेषण (Photosynthesis) प्रक्रिया सुधारते, ज्यामुळे वनस्पती उन्हाळ्यात सुद्धा अन्न तयार करण्याची प्रक्रिया अखंडित ठेवतात. सावलीखाली सुधारित सूक्ष्म-हवामान बदलामुळे कमीत कमी १५ दिवस अगोदर फुलधारणा होते. याव्यतिरिक्त फलदायी क्लॅडोड्स (फांद्याचे) प्रमाण वाढते, कळी गळण्याचे प्रमाण कमी होते आणि फुलधारणा अधिक होते.

Dragon Fruit
Dragon Fruit Farming : दुष्काळी स्थितीत ड्रॅगन फ्रूट ठरतेय आश्‍वासक पर्याय

शेडनेटच्या वापरामुळे फळांच्या गुणवत्तेत आणि उत्पादनात ४० ते ७० टक्के अधिक सुधारणा होते. सनबर्नच्या प्रभावी नियंत्रणासाठी आणि दर्जेदार फळांच्या सुधारित उत्पादनासाठी ५० टक्के काळ्या, पांढऱ्या आणि हिरव्या शेडनेटची शिफारस करण्यात आली आहे.

शेडनेटमुळे लवकर फुलधारणा, वनस्पती संरक्षण रसायनांवरील कमी अवलंबित्व, वाढीव आर्द्रता टिकवून ठेवणे आणि सुधारित फळांच्या गुणवत्तेसह अधिक फळधारणा, यामुळे शेडनेटसाठी सुरुवातीची गुंतवणूक योग्य ठरते.

प्रभाव आणि प्रसार

चर्चासत्र, कार्यशाळा आणि समाज माध्यमातून या तंत्रज्ञानाचा प्रसार केला जात आहे. काही शेतकऱ्यांनी हिरव्या शेडनेटचा (५० टक्के) स्वीकार केला असला, तरी काळ्या-पांढऱ्या शेडनेटचा समावेश करून अजून फायदा घेता येऊ शकतो. शेतकऱ्यांना शेडनेटचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.

या तंत्रज्ञानामध्ये प्रारंभिक गुंतवणूक अधिक असूनही, सकारात्मक परिणाम असे सूचित करतात, की खर्च करण्याची तयारी असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये शेडनेटचा अवलंब करण्याची तयारी आहे. त्यामुळे या पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात अवलंब करण्यासाठी आणि शेतकऱ्यांवरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी सरकारी अनुदानाचाही विचार केला जाऊ शकतो.

विजयसिंह काकडे, ७३८७३५९४२६

(राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com