Water Management  Agrowon
संपादकीय

Water Management : पाणी व्यवस्थापनामध्ये हवा वृक्षांचा सहभाग

Team Agrowon

पाणी संरक्षण आणि व्यवस्थापन यामध्ये वृक्षांचा सहभाग आहे काय? असल्यास कसा आणि किती, हा प्रश्‍न जलतज्ज्ञांबरोबरच शेतकरी, पर्यावरणवादी आणि अभ्यासू मंडळींनाही पडलेला असतो. या प्रश्‍नाचे उत्तर सकारात्मक असले तरी याला नकारात्मकतेचे अनेक कंगोरे आहेत. कारण वृक्ष अजूनही आम्हाला समजलेलाच नाही. त्यामुळेच प्रसिद्धीसाठी वृक्षारोपण करण्याऐवजी जिथे त्यांची खरोखरच गरज आहे, अशा ठिकाणी वृक्षांची लागवड केली पाहिजे.
ए क प्रगत शेतकरी मला म्हणाला, ‘‘आमच्या शेताच्या चारही बांधांवर भरगच्च वृक्ष होते. माझे आजोबा, पणजोबा खऱ्या अर्थाने सेंद्रिय पद्धतीने पारंपरिक पिके घेत. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे घरात आनंद, सुख होते; पण हातात पैसा नव्हता. खाऊन पिऊन आनंदी असलेल्या घरात पैशाची नड लागली तरच उसनवारी होत असे. मी कृषी पदवीधर झालो. संकरित पिके, नगदी पिकांचे महत्त्व मला कळाले. घरातून प्रचंड विरोध असूनही बांधावरचे बहुतांश वृक्ष काढून टाकले. आज मी १५ एकर जमिनीवर कापूस, सोयाबीन घेतो. ठिबकवर ऊसही आहे. बांधावर वृक्ष राहिले नसले तरी एका तुकड्यात मोसंबी आहे. वृक्षाखालील सर्व शेती लागवडीखाली आल्याने क्षेत्र वाढले. जुन्या खणमातीच्या घराचा बंगला झाला. दारात दोनचाकी, चारचाकी आहेत. कुठे अडले माझे वृक्षावाचून? विहिरीत पाणी नसले तरी दोन बोअर आजही पाणी देतात. बँकेत माझी पत आहे.’’

त्यांचे सर्व ऐकून घेतले. हळूहळू त्यांच्या आजोबांशी बोलणे सुरू केले. मग मात्र एकेक आणखी सत्य बाहेर येत गेले. दोन बोअरची जागा पाच बोअरने घेतली होती. निर्मळ बांधाबरोबरच विहिरीने तळ गाठला होता. सर्व पारंपरिक पिके लयास गेली होती, भूगर्भात पाणी राहिले नव्हते. सर्व काही शेततळ्यावर अवलंबून होते. बंगला, वाहने दारात असली तरी डोक्यावर बँकेचे मोठे कर्जही आहे. शेतामधील मोर, पोपट, चिमण्या, साळुंक्या, भारद्वाज पक्षी हरवून गेले. कीटकनाशक आणि रासायनिक खतांचा कायम दर्प असलेल्या त्या तीन नगदी पिकांच्या शेतात घरामधील कुणीही फिरकत नव्हते. आजोबा सांगत होते, ‘‘बांधावरच्या वृक्ष श्रीमंतीमुळे आमच्या वावरामधील ओल बारमाही कधीच हटत नव्हती. विहिरीस कायम पाणी असे. आमचे सर्व कुटुंब कायम शेतातच असे. बांधावरची सावली, माठामधील थंड पाणी आणि चटणी- भाकर ही आमची खरी श्रीमंती होती.’’ आजोबांच्या सांगण्याला विज्ञानापेक्षा अनुभवांची जास्त साथ होती.
आज विज्ञानाने पाणी व्यवस्थापन आणि त्याच्या संरक्षणामध्ये वृक्षांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. स्वातंत्रपूर्व काळात भारतात ५० टक्के जंगल होते. पाऊस ऋतू, नक्षत्राप्रमाणे पडत होता. सर्व नद्या भरून वाहत होत्या. भूगर्भात मुबलक पाणी होते. आज स्वातंत्र्याच्या अमृतकाळात जंगल २० टक्केसुद्धा नाही. हातावर मोजण्याइतपत अपवाद वगळता सर्व नद्या आटल्या आहेत. भूगर्भातील पाणी खोल गेले आहे. जंगल कमी होणे आणि पाणी आटणे याचा कुठे तरी संबंध आहे, हे सिद्ध करण्यासाठी अजून वेगळा पुरावा कोणता?

जगामधील सर्व वाहत्या नद्यांचा उगम एक तर बर्फामधून होतो अथवा घनदाट वृक्षराजीमधून. आज बर्फामधून उगम पावलेल्या ब्रह्मपुत्रा, गंगा अशा नद्या वेगाने वाहत आहेत. मात्र पर्वतराजी, दरी, घळीमधून वृक्ष सान्निध्यात उगम पावणाऱ्या नद्या उगमापासूनच संकटात सापडलेल्या आहेत. अशा प्रत्येक नदीचा उगम शाश्‍वत करण्यासाठी येथे स्थानिक वृक्षाची जंगले असणे गरजेचे असते. उगमाजवळ जेवढे वृक्ष जास्त तेवढी नदी सक्षमपणे वाहते. पूर्वी पाणी व्यवस्थापन हे गाव आणि शहर परिसरात वाहणाऱ्या नद्यांशी जोडलेले असे. नद्यांच्या दोन्ही तीरांवर बऱ्यापैकी वृक्ष असत. पूर नियंत्रण, वाळूनिर्मिती, जैवविविधता संवर्धन आणि परिसर कायम शीतल ठेवून नद्यांना बारमाही वाहते ठेवण्यात वृक्षांचा फार मोठा सहभाग होता. वृक्ष भूगर्भातील पाणी उचलतो, त्यातील जेमतेम एक टक्काच त्याच्या वाढीसाठी वापरतो. उरलेले ९९ टक्के पुन्हा निसर्गास परत करतो. प्रशांत महासागरात मॉन्सूनच्या ढगांची निर्मिती होते. हे  पाण्याने भरलेले ढग अंदमानमध्ये येतात आणि तेथील उंच वृक्षांना आडून मनमुराद कोसळतात. पुन्हा त्यांचा प्रवास समुद्रमार्गे लंकेकडे सुरू होतो, तेथेही पश्‍चिम घाटामुळे तो कोसळत राहतो. समुद्राचे घेतलेले पाणी वृक्षांना आडून जमिनीवर पडते. तेथे ते मुरते. वृक्ष हेच पाणी उचलतात आणि वातावरणामध्ये पुन्हा ढग निर्मितीसाठी देतात. श्रीलंकेत भरपूर पाऊस पडण्यामागे तेथील घनदाट जंगल आणि त्यामुळे निर्माण झालेली आर्द्रता आहे. मॉन्सूनचे ढग केरळमध्ये येतात, तेथे त्यांना पुन्हा पश्‍चिम घाटाचीच मदत होते. पूर्वी केरळमध्येही बऱ्यापैकी घनदाट जंगल होते. त्या काळी अफाट पाऊस पडत असे. आपला कोकणही यास अपवाद नाही. कोकणामधील प. घाटाचे अनेक पिढ्यांना सांभाळलेले स्थानिक वृक्षांनी समृद्ध असलेले डोंगर आज काजू, आंब्याच्या बागांमध्ये परावर्तित झाले आहेत. येथील सर्व लहान मोठ्या नद्या डोंगर दऱ्यांमधून उगमापासूनच मोठे मोठे दगड धोंडे घेऊन वेगाने खाली उतरत आहेत. या मोठमोठ्या दगड-धोंड्यांमुळे नदी पात्रे बदलत आहेत. वृक्षांचे मित्र असलेले हे घटक आज वृक्षाविना सैरभैर झाले आहेत. नदीमधील वाळूनिर्मिती थांबण्याचे हे सुद्धा एक मुख्य कारण आहे. नदीला शांत आणि कायम वाहते ठेवावयाचे असेल तर सर्वप्रथम तिचा उगम वृक्ष लागवडीने समृद्ध करणे गरजेचे आहे. थोडक्यात, ‘आग सोमेश्‍वरी, बंब रामेश्‍वरी’ अशी आजची परिस्थिती आहे. पात्रामधील वाळू नदीला बारमाही वाहती ठेवते तर तिच्या काठावरील वृक्ष तिला जिवंत ठेवतात. नदी फक्त वाहती असून चालणार नाही तर ती जिवंत असणे हे सुद्धा तेवढेच गरजेचे असते.

बांधावर हवेत स्थानिक वृक्ष

शेतीमधील पाणी व्यवस्थापनाचा संबंध बांधावरील वृक्षांशी आहे. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या बांधावर स्थानिक वृक्ष लावले पाहिजेत. या वृक्षांच्या शीतल सावलीमुळे थोड्या पावसाने अधिक थंडावा निर्माण होतो. आर्द्रता टिकून राहते. बांधावरील वृक्षामुळे शेतावरून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यापासून मातीच्या कणांचे संरक्षण होते. सावलीमुळे शेकडो सूक्ष्म मातीच्या कणात साठलेले पाणी टिकून राहते. ओलाव्यामुळे उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढून शेती अधिक उपजाऊ होते. आज महाराष्ट्रामध्ये घोंघावणाऱ्या दुष्काळी वातावरणामागे निसर्गाची आपण माणसांनी उसवून टाकलेली वीण हेच कारण आहे. प्रत्येकाने चिंतन केले पाहिजे. आज पावसापेक्षाही धरणाच्या पाण्यावर अधिक विसंबू लागलो आहोत. पण पावसाशिवाय धरणात तरी पाणी येणार कुठून? डोंगर उतारावर झाडे नसली तरी ही धरणे वाहत येणाऱ्या गाळांनी लवकर भरून जाणार आहेत. धरण परिसर वृक्षांनी श्रीमंत असेल तर आपणास या जलाशयाचा मृतसाठा कधीही दिसणार नाही.

वृक्षारोपण नक्की कशासाठी?
मध्य प्रदेशमध्ये नर्मदाकाठी आज लाखो वृक्ष लावलेले आहेत, ते तिच्या या सन्मानासाठीच! वृक्षारोपण कुठे करावे? याचे सर्वसाधारण सरकारी उत्तर ‘जागा मिळेल तिथे’ असू शकते. पण खरे उत्तर आहे, जिथे त्यांची सर्वाधिक गरज आहे तिथे! झाडांची सर्वाधिक गरज आहे, ती नदी, जलाशयाकाठी. गाव परिसरातील नदी आता कोरडी पडली असली तरी तिच्या दोन्ही काठांवर हजारो देशी वृक्षांची लागवड केली पाहिजे. परिसरामधील डोंगरउतार, टेकड्या या सर्वप्रथम वृक्षांनी फुलून गेल्या पाहिजेत. नदीचा उगम, तिचे दोन्ही काठ आणि डोंगरावरील वृक्षलागवड यांचा पाणी व्यवस्थापनाशी सरळ संबंध पोहोचतो. आज आपल्या वृक्षारोपणाच्या चालणाऱ्या मोहिमा गावात, गावाबाहेर, रस्त्याच्या दुतर्फा, शैक्षणिक संस्था, शासकीय, गैरशासकीय कार्यालयांचे परिसर अशा दिखाऊ चालतात. त्याचा पाणी व्यवस्थापनाशी काडीचाही संबंध नसतो. उलट या झाडांच्या वाढीसाठी आपल्याला पाण्याची सोय करावी लागते. प्रसिद्धी, छायाचित्रे आणि पारितोषिकांचा पाऊस पडत असला तरी खरा पाऊस दूर जात आहे, भूगर्भातील जल अजून खोल जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Procurement Center : मका, सोयाबीन किमान आधारभूत खरेदी केंद्रे सुरू करावीत

Rabi Season 2024 : शेतात गाळ, माती, शेणखत टाकण्यास वेग

Solapur DPDC Meeting : ‘जिल्हा वार्षिक’मधील कामांची निविदा प्रक्रिया त्वरित राबवा

Grape Farming : ग्राहक मागणीभिमुख द्राक्ष उत्पादन, विपणन काळाची गरज

Kasuri Methi Market: जास्त उत्पादन देणारी कसुरी मेथीची शेती कशी कराल ?

SCROLL FOR NEXT