Water Management : कालव्याऐवजी पाइपने शेतापर्यंत आणले पाणी

Agriculture News : पाणी वापर संस्थेचा गुरुत्वाकर्षणावर आधारित प्रकल्प; वीज वापर शून्य; सूक्ष्म सिंचनामुळे पाण्यातही बचत
Water
WaterAgrowon
Published on
Updated on

Irrigation Management : ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ ही परिस्थिती धरण परिसरातील अनेक गावांमध्ये दिसून येते. कालव्याद्वारे धरणाचा फायदा फारच कमी लोकांपर्यंत पोहोचतो. उर्वरित शेतकऱ्यांना पुन्हा भूजलाच्या पाण्यावरच सिंचनासाठी अवलंबून राहावे लागते. मात्र वरुड येथील ११ गावांतील शेतकऱ्यांनी एकत्रित प्रयत्नांतून सहकारी तत्त्वावर आधारित पाणी वापर संस्था तयार करून यावर चांगला मार्ग काढला आहे.


अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुका हा संत्र्याचे आगार मानला जातो. तालुक्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६०० मि.मी. आहे. पुरेसा पाऊस, फार चांगला नाही की कमी. शेतीसाठी भूजलाचा वापर हाच मुख्य पर्याय होता. मात्र सिंचनासाठी पाणी वापर वाढत गेला. बोअरवेलच्या संख्या आणि खोली वाढत गेली. तसेच हजार फूट खोलवर जाऊनही बोअरवेलला पुरेसे पाणी मिळेना. जवळच चुडामणी नदीवर नागाठाणा लघुपाटबंधारे प्रकल्प उभारण्यात आला. या धरणामुळे पाणी उपलब्ध झाले होते. या धरणाचे पाणी नदीत पुढे बांधलेल्या सात कोल्हापुरी बंधाऱ्यामध्ये अडवले जाई.

पहिली काही वर्षे तरी या पाण्याचा उपयोग नदीकाठावरील ५९ लाभार्थ्यांना व त्यांच्या ३५ हेक्टर क्षेत्राला होत असे. यातून मुरलेल्या पाण्याचा पाझर काही अंतरापर्यंत विहीर व बोअरवेलचे पाणी वाढवायचा. पण पुढे पुढे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या पाण्यात वाटेकरी १४० पर्यंत, तर क्षेत्र १४१ हेक्टरपर्यंत वाढले. परिणामी, पाणी लवकर संपू लागले. त्यामुळे विहिरी मार्च - एप्रिल महिन्यांतच कोरड्या होऊ लागल्या. पाण्याच्या उपलब्धतेमुळे वाढलेल्या बऱ्याच संत्र्यांच्या बागा पाण्याअभावी जळू लागल्या.

या गोष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांमध्ये डॉ. विजय देशमुख हेही होते. खरेतर त्यांचे वरुड येथे हॉस्पिटल असून, वैद्यकीय व्यवसायात आहे. पण त्यांना शेतीमध्येही खूप रस. पण त्यांनाही पाणीटंचाईची झळ बसायला लागल्यानंतर त्यावर त्यांचा अभ्यास सुरू झाला. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली आणि एक उपाय शोधला. तो आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही सांगून, त्यांनाही आपल्यासोबत घेतले. पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सांघिक ताकदीची गरज होती. त्यामुळे त्यांनी एकमताच्या शेतकऱ्यांचा गट बांधला.

सर्वांनी मिळून २००६ मध्ये डॉ. शरद पाणी वापर ठिबक सिंचन सहकारी संस्था मर्या. ही संस्था स्थापन केली. या पाणी वापर संस्थेद्वारे लाभधारकांनी दोन खूप महत्त्वाचे निर्णय घेतले. आणि सर्वांनी त्याची अंमलबजावणीही सुरू केली. १) धरणातून पाइपलाइन टाकून थेट शेतापर्यंत पाणी आणले. २) या सर्व लाभधारकांनी शेताला ठिबक सिंचनानेच पाणी देणे सुरू केले. या दोन्ही निर्णयांमुळे पाण्याचे निचऱ्याद्वारे होणे नुकसान व अपव्यय कमी झाला.

Water
Water Management : पाणी व्यवस्थापनात संयुक्त सहभाग गरजेचाच

२००६ मध्ये या योजनेचा खर्च एक कोटी पंधरा लाख रुपये आला होता. धरणापासून जवळच्या पहिल्या गावच्या शेतकऱ्यांना हेक्टरी २१ हजार रुपये, तर शेवटच्या गावातील शेतकऱ्यांना ५२ हजार रुपये आला होता. ही रक्कम शेतकऱ्यांनी कर्जरूपात उभी केली होती. संकल्पना उत्तम असल्याने बँकांनीही त्यांना सहकार्य केले होते.

...असा आहे प्रकल्प
धरणातून पाइपने पाणी आणण्याच्या या प्रकल्पात डॉ. देशमुख यांनी पिंपळदरा, पिंपळसेना, तिवसा, वाई बुद्रुक, वाई अंतरखेल, वरुड भाग एक, वरुड भाग दोन, शेंदूरजना, घाट दायवाडी, टेंभुर्खेडा या अकरा गावांतील एकूण १६० शेतकरी जोडले आहेत. या प्रकल्पामुळे सगळ्यांच्या एकत्रित ४५० एकर संत्रा बागेला बारा महिने खात्रीशीर पाणी उपलब्ध होत आहे. यात दोन समांतर पाइपलाइन केलेल्या असून, एक आठ कि.मी. लांब, तर दुसरी बारा कि.मी. लांबीची आहे.

धरणातून येणारे पाणी उताराने म्हणजेच गुरुत्वाकर्षणाने अकरा गावांत येते. जलसंपदा विभागाकडून मीटरनेच मोजून पाणी मिळते. प्रत्येक गावात एक आउटलेट आहे. यासाठी वीज लागत नाही. त्यातही आणखी एक जमेची बाजू म्हणजे ठिबक सिंचनासाठी पाइप आणि लॅटरल्समध्ये जो पाण्याचा दाब आवश्यक असतो, तो ही नैसर्गिकरीत्याच इथे मिळतो आहे.

Water
Water Management : गाळ अन् वाळू पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे

प्रत्येक आउटलेटला एक मीटर बसवले आहे. रोटेशनद्वारे प्रत्येक शेतकऱ्याला आठवड्यातून एकदा पाणी मोजून पाणी मिळते. वार्षिक तीन ते चार हजार रुपये प्रति हेक्टर इतकी पाणी पट्टी शेतकऱ्यांना भरावी लागते. हे सर्व शेतकरी शक्य त्या मार्गाने पाणी बचत आणि पाण्याचे पुनर्भरण यावर भर देत आहेत.

या प्रकल्पाचा सगळ्यात पहिला फायदा म्हणजे लोड शेडिंग व इतर कारणास्तव विजेच्या अनियमितपणाने पूर्वी असलेली सिंचनातील अनियमितता दूर झाली. विजेमध्ये व त्यावरील खर्चातही बचत झाली. कारण पूर्वी सर्व बागांना विहिरीतून उपसून पाणी दिले जात होते. त्या वेळी सर्वांचे मिळून सहा महिन्यांचे लाइट बिल २५ लाख रुपयांपर्यंत होत असे.

ते सर्व लाइट बिल वाचले. या संपूर्ण प्रकल्पात सूक्ष्म सिंचनामध्ये पाणी व्यवस्थित गाळून जावे, यासाठी चार सॅण्ड फिल्टर बसवले आहेत. दर काही काळानंतर हे फिल्टरमध्ये अडकलेला गाळ काढून टाकावा लागतो. त्याची सफाई स्वयंचलित मशिनने संगणकाद्वारे केली जाते. ही यंत्रणा चालविण्यासाठी आवश्यक ती वीज सोलर पॅनेलद्वारे मिळवली जाते.

पुनर्भरणासाठीही उपयोग ः
वर्षभर सामान्यतः ही सर्व यंत्रणा केवळ शेती आणि फळबागांना पाणी देण्यासाठीच वापरली जाते. मात्र पावसाळ्यात धरण भरल्यावर जास्त वाढत असलेले पाणी (ओव्हर फ्लो) शेतकरी आपल्या विहिरी, बोअरवेल्स, शेततळी आणि गावतळी भरण्यासाठी वापरतात. यामुळे भूजलामध्येही पाण्याचे मोठ्या प्रमाणात पुनर्भरण शक्य होते. याचा फायदा लाभधारकाबरोबरच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही होतो. पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांनाही मोठ्या प्रमाणात लाभ होतो.

सिंचन क्षेत्र व उत्पन्नात वाढ ः
ही पाणी वापर संस्था स्थापण्यापूर्वी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामुळे भिजणारे क्षेत्र कमाल दोनशे एकर होते. तर शेतकऱ्यांची संख्या ५९ होती. पाणी वापर संस्थेची स्थापन आणि पाइपलाइन योजनेमुळे लाभक्षेत्र दुपटीपेक्षा अधिक वाढून ४५० एकर झाले. सोबतच पावसाळ्यातील विहीर, बंधारे, शेततळी आणि बोअरवेल यांचे पुनर्भरण केले जात असल्यामुळे भूजल पातळीत वाढ झाली आहे.

या वाढलेल्या भूजल पातळीचा फायदा मिळणारे क्षेत्र हे पंधराशे हेक्टरच्या आसपास आहे. प्रकल्प सुरू होऊन आता पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ झाला असला तरी ही पद्धती व यंत्रणा यशस्वीरीत्या सुरू आहे.

या भागातील मुख्य पीक संत्रे असून, सर्व लाभधारकांकडे संत्रा बागा आहेत. संत्रा बाग लागवडीनंतर फळांचा पहिला हंगाम पाच वर्षांनी सुरू होतो. मात्र या दरम्यानच्या काळात आंतरपिके घेतली जातात. संत्र्याची मुख्यतः वर्षातून दोनदा फलधारणा होते. पहिला मृग बहर हा पावसाळ्याच्या पाण्यावर अवलंबून घेतला जातो. तर डिसेंबर येत असलेला दुसरा आंबिया बहर सिंचनाच्या पाण्यावर घेतला जातो. पूर्वी पाण्याची कमतरता भासत असल्यामुळे शेतकरी सामान्यतः मृग बहरच धरला जात असे.

मात्र आता या प्रकल्पामुळे सिंचनाच्या पाण्याची शाश्‍वतता मिळाली आहे. परिणामी, येथील शेतकरी दोन्ही बहर घेऊ लागले आहेत. सुरुवातीच्या काळात आंतरपीक आणि दोन बहरांचे संत्र्यापासूनचे हमखास उत्पादन यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात अडीच पट इतकी भरघोस वाढ झाली आहे. उत्तम बागेसोबतच पाणी व खतांच्या व्यवस्थापनाचे महत्त्व आता शेतकऱ्यांना पटले आहे. त्यामुळे या गावांमध्ये कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि चर्चासत्रांचे आयोजन नियमित केले जाते. त्याचाही फायदा शेतकऱ्यांना होत आहे.

यशाचाही विस्तार
या प्रकल्पातील शिस्त आणि काटेकोर अंमलबजावणी पाहून जलसंपदा विभागाने डॉ. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली ४ हजार हेक्टर क्षेत्रावर नवीन योजनाही गेल्या वर्षीच सुरू केली आहे. त्या योजनेमध्ये वीस पाणी वापर संस्थांची स्थापना करण्यात आली आहे. या योजनेचा सर्व खर्च जलसंपदा विभागच करणार असल्याने शेतकऱ्यांवर भार पडणार नाही.
- डॉ. विजय देशमुख, ७६२०१ १७०७९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com