Research On Ethanol : बटाट्याच्या सालीपासून इथेनॉल निर्मितीचा शोध देशात लागला आहे. आयआयटी वाराणशी येथील स्कूल ऑफ बायोकेमिकल्स इंजिनिअरिंगचे प्राध्यापक डॉ. अभिषेक ढोबळे व एमटेकची विद्यार्थिनी उन्नती गुप्ता यांनी हे संशोधन यशस्वी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन! हे संशोधन देशासाठी दोन अंगाने उपयुक्त ठरणारे आहे. एक तर बटाट्याच्या टाकाऊ सालीपासून इथेनॉल निर्मिती झाली तर उत्पादक तसेच प्रक्रियादारांना अतिरिक्त उत्पन्न मिळेल.
दुसरे म्हणजे आजही आपला भर हा उसाच्या मळीसह रस, साखरेपासून इथेनॉल निर्मितीवरच आहे. परंतु देशात साखरेच्या कमी उत्पादनाचा अंदाज असला की उसाचा रस, साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर मर्यादा येतात.
त्याचवेळी इथेनॉलचे इतर स्रोत मका, खराब धान्य, बांबू, पिकांचे अवशेष, शेतातील टाकाऊ पदार्थ यापासून इथेनॉल निर्मिती होत असली तरी त्यांचे प्रकल्प देशात अजून तरी (काही अपवाद वगळता) मार्गी लागले नाहीत.
या सर्वांच्या परिणामस्वरूप आपल्या गरजेइतके इथेनॉल अजूनही आपण निर्माण करू शकत नाही. अशावेळी बटाट्याच्या सालीपासून इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प देशात उभे राहिल्यास इथेनॉल उत्पादन वाढीस हातभार लागेल.
आपल्या देशात विद्यार्थ्यांच्या पातळीवर शेतकरी असो की इतर समाज घटक त्यांच्या उपयुक्ततेच्या अनुषंगाने संशोधन फारसे होत नाही, झाले तर त्याला औद्योगिक जोड दिली जात नाही. तसे बटाट्याच्या सालीपासून इथेनॉल निर्मितीबाबत होणार नाही, ही काळजी घ्यावी लागणार आहे. या संशोधनाला औद्योगिक जोड मिळाल्यास हे संशोधन क्रांतिकारी ठरू शकते, असा दावा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
त्यामुळे शासनासह प्रक्रिया उद्योजक तसेच इथेनॉल निर्मिती-वापरासंबंधित सर्व घटकांनी हे गांभीर्याने घेऊन या मूलभूत संशोधनाला उपयोजित विज्ञानाची अर्थात औद्योगिक विकासाची जोड द्यावी. असे झाले तरच कृषी विद्यापीठांपासून ते आयआयटी, आयसर अशा संस्थांमध्ये गरजेवर आधारीत संशोधनाला चालना मिळेल.
भारताची इथेनॉल उत्पादनक्षमता १६४८ कोटी लिटरची असली तरी प्रत्यक्ष मात्र त्यापेक्षा कमी (९०० ते १००० कोटी लिटर) उत्पादन होते. सध्या आपण पेट्रोलमध्ये १२ ते १३ टक्के इथेनॉल मिश्रणापर्यंत पोहोचलो आहोत. याच वर्षी आपल्याला पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट गाठायचे आहे.
त्यामुळे २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट पूर्तीसाठी आपल्याला इथेनॉल उत्पादन वाढवावेच लागेल. इथेनॉल हे पर्यावरणपूरक असल्याने याकडे भविष्यातील इंधन म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळेच पाच टक्के इथेनॉल हे डिझेलमध्ये सुद्धा मिसळता येईल का, याचीही चाचपणी देशात सुरू आहे.
डिझेलचा वार्षिक खप पेट्रोलच्या जवळपास तिप्पट आहे. पेट्रोलचा वार्षिक खप ३९०० कोटी लिटर आहे, तर डिझेलचा वार्षिक खप जवळपास ९००० कोटी लिटरचा आहे. डिझेलमध्ये पाच टक्के इथेनॉल जरी आपण मिसळू शकलो तर अतिरिक्त ५०० ते ६०० कोटी लिटर इथेनॉल आपल्याला लागेल. शिवाय पेट्रोलमध्ये देखील २० टक्क्यांऐवजी २५ टक्के इथेनॉल मिश्रण करता येईल का, याबाबतही देशात प्रयोग सुरू आहेत.
त्याचेही निष्कर्ष चांगले येत आहेत. भविष्यातील इथेनॉलची वाढती गरज पाहता आपल्याला उसाशिवाय विविध स्रोतांपासून इथेनॉल निर्मिती वाढवावी लागेल. अशावेळी बटाट्याच्या सालीपासून इथेनॉल निर्मिती या संशोधनाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याचबरोबर खराब धान्य, पिकांचे अवशेष, शेतातील टाकाऊ पदार्थ यापासून इथेनॉल निर्मितीचे प्रकल्पही देशात वाढवावे लागणार आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.