Indian Agriculture Agrowon
संपादकीय

Indian Agriculture : शेती करायची कशी?

विजय सुकळकर

Agriculture Damage Due To Natural Calamity : पूर्वी आपल्याकडे पोळ्यानंतर आता पाऊस कमी होणार, दिवाळीनंतर हिवाळा सुरू होऊन चांगली थंडी पडणार, होळीनंतर उन्हाळा भासायला लागणार, असे हवामानाविषयीचे ठोकताळे होते. आपल्या देशातील बऱ्याचशा सणांचा ऋतूंशी असा संबंध आहे.

वसंत ऋतू म्हटले की वैशाख वणवा, वर्षा म्हटले की धोधो पावसाचा वर्षाव, शरदाचं चांदणं, हेमंत ऋतूतील अंगावर शिरशिरी आणणारी थंडी आणि शिशिरातील पानगळ, ऋतू आणि त्यातील असे हे हवामान आपल्या चांगलेच अंगवळणी पडलेले होते.

आपल्याकडे तर कोणत्या नक्षत्रांत शेतीची कोणती कामे करणे लाभदायक असते, या विषयीचे पण शेतकऱ्यांचे काही अनुमान आहेत. हे नुसते अनुमान नाहीत त्यास शास्त्रीय कारणांची पण जोड आहे. जसे की मृगात पेरणी झाली म्हणजे ती साधली (हंगाम चांगला येणार) असे म्हटले जायचे. ‘पडतील स्वाती तर पिकतील मोती’ अशी तर म्हणचं आपल्याकडे प्रचलित आहे. भारत देशात वर्षांतील बारा महिन्यांची ऋतूनुसार विभागणी देखील करण्यात आली आहे.

जून ते सप्टेंबर पावसाळा, ऑक्टोबर-नोव्हेंबर हा संक्रमण काळ, डिसेंबर ते फेब्रुवारी हिवाळा, तर मार्च ते मे उन्हाळा अशी ती विभागणी आहे. परंतु मागील काही वर्षांपासून या ऋतुचक्रात मोठा बदल झाला आहे.ऋतुचक्रातील बदलानुसार शेतातील पीक पद्धती तसेच नक्षत्रातील बदलानुसार शेती कामांत बदल केला नसल्यामुळे नुकसान प्रचंड वाढले आहे.

ऋतू संक्रमण काळातून आपण नुकताच हिवाळ्यात प्रवेश केला आहे. परंतु संक्रमण काळात (ऑक्टोबर-नोव्हेंबर) निरभ्र आकाश, स्वच्छ सूर्यप्रकाश त्याचबरोबर शरदाचं चांदणं आपल्याला पाहावयास मिळालेच नाही.

संक्रमण काळात सतत ढगाळ हवामान, वादळी पाऊस आणि गारपिटीने खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान केले आहे. तत्पूर्वी पावसाळ्यात पाऊस कमी पडल्याने पुढे दुष्काळाचे संकट आहेच. या कमी पाऊसमानाने खरिपातील जवळपास सर्वच पिकांची उत्पादकता घटली आहे. आता डिसेंबर ते फेब्रुवारी या हिवाळ्याच्या काळात थंडीचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अरबी समुद्र असो की बंगालचा उपसागर यात सातत्याने कमी दाबाचे पट्टे तसेच चक्राकार वाऱ्याच्या स्थिती निर्माण होत असल्याने मॉन्सूनोत्तर वादळी पाऊस, गारपिटीचे प्रमाण वाढले आहे. मागील दशकभराचा विचार केला असता अवर्षण, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तींनी शेती उध्वस्त करण्याचे काम केले आहे.

अत्यंत विपरीत अशा हवामान परिस्थितीत शेती करायची कशी, असा सवाल देशभरातील शेतकरी विचारीत असताना याबाबत अजून कुणाला काहीही गांभीर्य दिसत नाही. वर्ल्डकप हातात येता येता निसटल्याचं दुःख सगळ्या देशाला झालं, परंतु वादळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याचं दुःख शेतकऱ्यांशिवाय कोणालाही झालेले दिसत नाही. मुळातच शेती जोखीमयुक्त आहे. त्यात बदलत्या हवामान काळात वाढलेल्या नैसर्गिक आपत्तींनी ती अधिकच जोखमीची केली आहे.

आपल्या येथील पीक पद्धतीत मोठे बदल आवश्यक आहेत. कमी तसेच अधिक पाऊसमानाने हंगामनिहाय काही पिकांना ‘ब्रेक’ लागलेला असताना त्यांना पर्यायी पिके मिळत नाहीत. खरीप तसेच रब्बी हंगामातील पीक पेरणीच्या वेळापत्रकात मोठा बदल अपेक्षित असताना या दिशेने संशोधन होत नाही.

अतिवृष्टी, अनावृष्टीत अनुक्रमे तग धरणाऱ्या, ताण सहन करणाऱ्या पिकांच्या जाती शेतकऱ्यांना मिळत नाहीत. शासन आणि संशोधन पातळीवरही या बदलत्या हवामानाबाबत फारसे काही काम चालू नाही. हवामान बदलाविषयी जागतिक पातळीवर परिषदा, चर्चासत्रे होतात. परंतु त्यातही यावर शाश्वत उपायांऐवजी थातूरमातूर उपायांवर चर्चा होते. एकमेकांवर दोषारोप करण्यातच अनेक देश धन्यता मानतात. हे असेच चालू राहिले तर आगामी काळात शेतीत कोणीही टिकणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT