Indian Agriculture : सद्विचारांचे सोने लुटूया!

Kharif Season : जगण्या-मरण्याचे प्रश्न गंभीर होत असताना आपल्या राजकीय नेतृत्वाने आपल्यापुढे धरलेला आरसा हे मूळ प्रश्न सोडून भलतेच काही तरी दाखवतो आहे आणि खेदाची बाब म्हणजे समाज म्हणून आपण त्याला फशी पडतो आहे.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon
Published on
Updated on

Rabi Season : ‘दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा’ किंवा ‘साधू संत येती घरा तोचि दिवाळी दसरा’ अशा सुभाषितांनी मराठी भाषा नटलेली आहे. संस्कृतीचे संचितच कोणतीही भाषा व्यक्त करीत असते. मराठी त्याला अपवाद नाही. भारत कृषीप्रधान देश असल्याने सगळ्याच देशी भाषांमध्ये शेती संस्कृतीचे वैभव भरभरून लुटलेले दिसते. शेती, ग्रामीण जीवन, सण, व्रतवैकल्ये, आरोग्य या साऱ्यांच्या सांस्कृतिक धाग्यांचे गोफ आपल्या आयुष्यात मनोहारी रंग भरतात.

आपले सारे जीवन त्याच्या भोवती फिरत राहते. दसऱ्याचाही त्याला अपवाद नाही. हा विजयाचा सण, आनंदाचा सण. खरिपाच्या राशी शेतकऱ्याच्या घरात येत असतानाच कष्टावलेल्या जीवाला दिलासा देणारा दसरा त्याच्या आयुष्यात येतो.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यंदाचा खरीप हंगाम तसा यथातथाच ठरला. मोसमी पावसाच्या खंडाचा आणि घटीचा मोठा फटका केवळ शेतीलाच नाही तर अवघ्या ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येलाही बसला आहे. चाऱ्याच्या आणि पाण्याच्या टंचाईचा फटका पशूपालनालाही बसणार आहे. अपुऱ्या पावसामुळे जे काही उगवून हाताशी आले आहे त्याची काढणी सुरू झाली आहे. विशेषतः कापूस आणि सोयाबीन या नगदी पिकांचा पेरा आपल्याकडे मोठा म्हणजे सुमारे ९० लाख हेक्टरांवर असतो. काढणीचा हंगाम सुरू झाला का दर पडतात हा नेहमीचा अनुभव. मागणी - पुरवठ्याच्या सूत्राबरोबरच आणखीही काही बाजारी शक्ती अशावेळी सक्रिय होतात. त्यामुळे शेतकऱ्याला अपेक्षित फायदा कधीच मिळत नाही.

दुसरीकडे शेतकऱ्याचा सारा माल विकून झाल्यावर या शेतमालाचे दर वाढू लागतात. शेतकऱ्याला मात्र कष्ट करूनही हाताशी फार काही उरत नाही. बहुतेकांच्या वाट्याला तर केवळ कर्ज आणि त्याचे व्याज उरते. यंदाही कापूस, सोयाबीनचा नरमीत सुरू झालेला बाजार तेच सांगतो आहे. यावर उफराट्या सरकारी धोरणांनी तोरण चढवले आहे. कांदा निर्यातशुल्कवाढ, डाळींवरील साठा मर्यादा, साखरेच्या निर्यातीवरील निर्बंध या माध्यमातून केवळ ग्राहकांचे हित सांभाळताना शेतकऱ्याची आणि शेतीची माती होते आहे, हे आपल्या धोरणकर्यांच्या लक्षात येत नाही असे नाही. पण शेतकरी संघटित नसल्याने त्याच्या लुटीचा कार्यक्रम वर्षानुवर्षे सुरू आहे. तो रोखण्यासाठी शेतकऱ्यांनाच पावले उचलावी लागतील. गावगन्ना पुढारी येऊन फक्त आश्वासने देतील, प्रश्न मात्र संघर्षाशिवाय सुटणार नाही, याची खूणगाठ शेतकऱ्याने बांधून ठेवावी.

Indian Agriculture
Indian Agriculture : शेतकरीहिताचे कायदे हवेतच

दुसरीकडे महाराष्ट्राचाच नव्हे तर अवघ्या देशाचा अवकाश सामाजिक, धार्मिक विद्वेषाने भारला आहे. जगण्या-मरण्याचे प्रश्न गंभीर होत असताना आपल्या राजकीय नेतृत्वाने आपल्यापुढे धरलेला आरसा हे मूळ प्रश्न सोडून भलतेच काही तरी दाखवतो आहे आणि खेदाची बाब म्हणजे समाज म्हणून आपण त्याला फशी पडतो आहे. ‘हे विश्वची माझे घर’ असा संदेश देणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या या महाराष्ट्रात संकुचितपणाची बिजे जाणून बुजून पेरली जात आहेत. त्यामुळे सामाजिक सौहार्दाला तडा जातो आहे, मना-मनांत भेद तयार होत आहेत. आपला आणि विरोधातला, अमक्या गटाचा आणि तमक्या गटाचा अशी आपली विभागणी होते आहे.

त्याची फिकीर न करता आपण आपल्या संकुचित अस्मिता जोपासतो आहे. हे सारे समाज म्हणून आपली अवनती दाखवणारे याचे भानही कोणाला उरलेले नाही. हे सारे थांबवूया! आपला शेजारी-पाजारी कोणत्याही जाती-धर्माचा असला तरी केवळ भारतीय म्हणूनच त्याच्याकडे पाहिले पाहिजे. जातीय-धार्मिक विद्वेष गाडून टाकून बंधुतेची बिजे रोवली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना स्वातंत्र्याबरोबच समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करते हे विसरता कामा नये. आज दसऱ्याच्या निमित्ताने मनातली सारी किल्मिषे, जळमटे झटकून टाकूया आणि सद्वविचारांचेच सोने लुटूया!

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com