Indian Agriculture : सक्षमतेने पेला शेतीचा ‘गोवर्धन’

Article by Suresh Kodilkar : जुनी बलुतेदारी काळाच्या ओघात नष्ट झाली. नव्या बलुतेदारीत आपलेपणाची भावना व्यावसायिकतेत बदलली. त्यामुळे आज शेतीनामक गोवर्धन पर्वत उचलणे कष्टदायक झाले आहे. गावगाडारूपी जगन्नाथाचा रथ ओढणे कठीण झाले आहे.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon

सुरेश कोडीतकर

Difficulties in Agriculture :
शेती आणि शेतीपूरक व्यवसाय हा एकमेकांत गुंफलेला विषय आहे. शेतीतून अनेक व्यवसायाची क्षेत्रे खुली होतात. पूर्वी आपल्याकडे बलुतेदारी पद्धत होती. त्याशिवाय इतर कुशल, अकुशल कामे लोक करत असत. कुंभार, लोहार, सुतार, चांभार, ढोर, खाटीक, अडतदार, गुळवे, माळी, वैदू, कैकाडी, गोपाळ, मेंढपाळ, गिरिजन, गवळी, लोणारी, पाथरवट, कोष्टी, शिंपी, वखारवाले वगैरे. या सर्वांच्या साह्याने शेती पिकत, फुलत होती. गाव जगत होता आणि गाडा चालत होता. मोट, नाडा, पाभर, दावं, कासरा, आसूड, उतरंड, मुसक्या, घुंगुरमाळ, नाल, जाते, नांगर/औत, शिकाळं, कावड, रांजण, बैलगाडी, खुरपं, विळा, चूल, काटवट, चरवी, देवळी, खुंटी आणि खुंटा या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत.

आजही त्यांचे मोल वादातीत आहे. पूर्वीची ही परस्पर पूरक ग्रामीण समाज जीवन पद्धती म्हणजे जुनी बलुतेदारी आहे. आजची नवीन शेती आणि शेतीपूरक व्यवसाय पद्धती ही नवीन बलुतेदारी आहे, असे आपण म्हणू शकतो. पूर्वी समाज हा ‘एकमेकां साह्य करू’ या पद्धतीने काम करत होता. इर्जिक हे त्याचे रूप होते. त्यात काम, मदत, उदरनिर्वाह या गरजा भागल्या जात होत्या. उत्पन्न हा आधार होता. पोटापुरते पिकवणे आणि आरोग्य संपन्न समाधानी जगणे त्या काळी घडून येत होते. शेतकरी आत्महत्या हा शब्द त्या काळी नव्हता.

गाव आणि शहर हा एक स्वतंत्र विषय आधीपासून होता. तथापि, ज्या क्षणी गावाने शहर अंगावर ओढवून घेतले, त्या क्षणी श्रम नाहीसे होऊन व्यावसायिकता आली. गावपण नाहीसे होऊन शहरांची कृत्रिमता आली. समृद्ध आणि पोषक बलुतेदारी नाहीशी होऊन, धंदेवाईकपणा आला. सिंचन झाले आणि ऊस कारखानदारी आली. सूत गिरण्या आल्या. आता तर जमिनी कसून पिकविण्यापेक्षा विकून अथवा भाड्याने देऊन पैसे कमावण्याचा धंदेवाईकपणा आला. रासायनिक खते आणि कीटकनाशके यांनी हवा आणि जमीन प्रदूषित केल्या.

Indian Agriculture
Agriculture Industry : शेतीस उद्योगाचा दर्जा देण्यास शासन प्रयत्नशील

जुनी बलुतेदारी काळाच्या ओघात नष्ट झाली. पण खेडी शहरं अंगीकारताना नवी बलुतेदारी म्हणावी अशा सक्षमतेने उभी राहिली नाही. जुना पद्धतीत एकमेकाला साह्य करण्याची जी भावना होती ती नव्या बलुतेदारीत व्यावसायिकतेत बदलली. त्यामुळे आज शेतीनामक गोवर्धन पर्वत उचलणे कष्टसाध्य झाले आहे. गावगाडारूपी जगन्नाथाचा रथ ओढणे अवघड झाले आहे.

खरा भारत खेड्यांमध्ये वसतो. गावगाड्यात त्याचे सहचर्य अस्तित्व दिसून येते. त्यात आपलेपणा आहे. त्यात माती, पाणी, गुरेढोरादी हे मुके सगेसोयरे, झाडेझुडपे जपणे हा संस्कार आहे. दुर्दैवाने हे लोप पावून शेती उघडी पडू लागली आहे. शेतीमध्ये अन्न, उत्पन्न, पूरक रोजगार, निसर्ग हे सर्व जपण्याची क्षमता आहे. पण श्रम संस्कार दुर्मीळ झाले आहेत. बिन कष्टात श्रीमंत होण्याचा अट्टहास प्लॉटिंग करणे आणि विक्रीचा धंदा दारात घेऊन आला आहे.

अशाने शेती उजाड, पडीक, कमी पिकाऊ होऊन ती कसणे हे एक आव्हान झाले आहे. लहरी निसर्ग, पाऊस आणि बाजारभावाची अनिश्‍चितता, यामुळे शेतकरी मेटाकुटीस आलेला असताना शेतीचा गोवर्धन उचलणे यापुढे होणार कसे? गावाकडून शहराकडे होणारे स्थलांतर थांबत नसताना आणि शेतीत हक्काचे राबणारे मनुष्यबळ कमी होत असताना गाव, शेती आणि समाजहा जगन्नाथाचा रथ जणू थांबला आहे. शहरी जीवन शैलीचे आकर्षण गावखेड्याला माती आणि मुळांपासून तोडत आहे.

सडा, सारवण, गोठा, मळा, खळं यापासून दूर होऊन कसे चालेल?या सर्व गोष्टी पुन्हा जुळून आणण्यासाठी आपल्याला निसर्गकेंद्रित जीवनशैली अंगीकारावी लागेल. शेती हा गोवर्धन पर्वत आहे. गावगाडा हा जगन्नाथाचा रथ आहे. दोन्हींकडे आधुनिक काळातल्या नव्या बलुतेदारांचा मेळ आणि समन्वय जुळून यायला हवा. आता शेतीपूरक व्यवसाय, शेतीजन्य खाद्य उत्पादने यांची बाजारात गरज आहे. सध्या आरोग्याकडे जागरूकपणे पाहिले जात असताना आणि जगभर मिलेट, अर्थात तृणधान्ये वर्ष साजरे होत असताना सेंद्रिय शेती आणि गावरान उत्पादने यांना वाढती मागणी आहे. तृणधान्य अर्थात ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राजगिरा यांना पंतप्रधानांनी ‘श्रीअन्न’ असे संबोधले आहे. ृ

Indian Agriculture
Women Empowerment : चाळीस महिलांची १० दिवसांत पावणेदोन लाखांची कमाई

यावरूनच या उत्पादनांचे महत्त्व आपल्या लक्षात येऊ शकेल. काकवी, सेंद्रिय गूळ, तृणधान्याचे विविध कच्चे पदार्थ हे हमखास पैसे मिळवून देणारे उद्योग आहेत. नव्या काळात नवे बलुतेदार उदयास आले आहेत. त्यांचे आणि शेतीचे एकमेकांना संधान साधून देणे सोपे आहे. बदलत्या काळाशी जुळवून घेणे हे आज शेती आणि पूरक व्यवसायासाठी आवश्यक झाले आहे. गरजा आणि त्यांची पूर्तता यांचा संयोग घडवून आणून दोन पैसे कमावणे हे उद्दिष्ट्य डोळ्यापुढे ठेवून काम केले तर शेतकरी बांधवांची क्रयशक्ती टिकून राहील.

त्याला सावकारापुढे हात पसरावे लागणार नाही. आत्महत्येचा विचार त्याला स्पर्श करणार नाही.डेअरी, मिठाई दुकान, चिकन आणि मटण सेंटर, अंडी पुरवठा आणि चामड्याचे व्यवसाय आणि लोकर उत्पादने जसे घोंगडी आणि वाकळ, लाकडी घाण्याचे तेल, साळ कांडून तांदूळ पुरवठा करणे, कडबाकुट्टी पुरवठा करणे, कोंबडी खाद्य अथवा गुरांसाठी पौष्टिक चारा पुरवठा, ज्यूस अथवा स्नॅक्स सेंटर, हॉटेलांना ताज्या फळांचा पुरवठा, कडधान्यांची थेट ग्राहकांना विक्री, पंचतारांकित हॉटेल्स, धार्मिक स्थळे, मंगल कार्यालयांना आकर्षक आणि ताज्या फुलांचा पुरवठा, उसाचा रसवंतिगृहाला पुरवठा अथवा गुऱ्हाळाद्वारे गूळ निर्मिती, फक्त कांदा, बटाटा, लसूण, आले यांची पुरवठा साखळी विकसित करणे, शेती उपकरणे, साहित्य, यंत्रसामग्री, बी-बियाणे, कीडनाशके, खते पुरवठा, पुरुष आणि महिला मजुरांचा पुरवठा तसेच या सर्व वाहतुकीसाठी वाहन आणि चालक उपलब्ध करून देणे, मजूर पुरवणे ही सर्व कामे रोजगार आणि उत्पन्न मिळवून देणारी आहेत.

गरज आहे चौकस आणि डोळस होण्याची!शेती हा गोवर्धन पर्वत आहे आणि त्याला या सर्वांनी टेकू दिला तर सगळ्यांचेच भले होणार आहे. शेती संस्था आणि उत्पादन कंपन्या स्थापन होत असताना सर्व सुविधा एका गोवर्धनाखाली एकत्रित झाल्या तर शेतकरी, पुरवठादार आणि ग्राहक यांचे शोधकार्य थांबेल. वेळ, ऊर्जा, निधी यांची बचत होईल. परिणामी, उत्पन्न वाढेल. गोवर्धन पेलणे, जगन्नाथाचा रथ ओढणे आणि नवे बलुतेदार हा समभूज त्रिकोण काळाची नवी आव्हाने पेलण्यास सक्षम आहे. त्यात अमर्याद वाव आहे. त्याचा शोध नवी पिढी घेईल याची खात्री आहे.

(लेखक शेतीचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com