Banana Crop
Banana Crop Agrowon
संपादकीय

Summer Heat : होरपळ बागांची अन् उत्पादकांचीही

विजय सुकळकर

Climate Change : हवामान बदलामुळे जागतिक कृषी उत्पादनात १९ टक्के घट होण्याची भीती ‘नेचर’ या संशोधन पत्रिकेतील अभ्यासातून व्यक्त करण्यात आली आहे. आपल्या देशात, राज्यात अशा प्रकारच्या उत्पादन घटीला अनेक पिकांमध्ये सुरुवात देखील झाली आहे.

खानदेशात वाढत्या उष्णतामानाचा केळी पिकाला मोठा फटका बसत आहे. या भागात सुमारे ६२ हजार हेक्टरवर केळी लागवड होते, त्यांपैकी ४० हजार हेक्टरवरील बागा वाढत्या उष्णतामानाने होरपळून निघाल्या आहेत. मागील दोन-तीन वर्षांपासून केळी उत्पादकांवर सारखेच काही ना काही संकट चालूच आहेत.

मर, सिगाटोका, बंची टॉप आणि सीएमव्ही या रोगांमुळे केळी उत्पादक आधीच त्रस्त झालेले आहेत. रोग प्रादुर्भाव वाढलेल्या काही शेतकऱ्यांना बागा देखील काढून टाकाव्या लागल्या आहेत. त्यात आता तापमानवाढीचे संकटही फार मोठे आहे.

जळगाव, धुळे, नंदूरबार या जिल्ह्यांत एप्रिल-मेमध्ये ४२-४३ अंश सेल्सिअस तापमान एक-दोन दिवसांसाठी असते. परंतु मागील आठवडाभरापासून या भागातील तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या वर गेलेले आहे. हे वाढते तापमान केळी पिकांना सहन होताना दिसत नाही.

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये लावलेल्या कांदे बागांतील केळींची लहान झाडे वाढत्या उष्णतामानाने जळून जात आहेत. तर जून-जुलैमध्ये लागवड केलेल्या मृग बागांतील पक्व केळी घड वाढते तापमान, उष्ण वारे यामुळे सटकत आहेत. वाढीच्‍या अवस्थेतील केळी झाडे अन्नपाणी व्यवस्थित ग्रहण करू शकत नसल्याने त्यांची वाढ खुंटली आहे. उन्हाळा अजून दीड-दोन महिने बाकी आहे. सध्याच केळी उत्पादकांचे एक हजार कोटीहून अधिक नुकसान झाल्याचे बोलले जात असून, पुढील दीड-दोन महिन्यांत नुकसानीचा आकडा वाढणारच आहे.

यावल, शहादा या अधिक केळी लागवड असलेल्या भागांत नुकसान तुलनात्मक कमी आहे. याउलट जिथे विरळ केळी बागा आहेत, तिथे मात्र वाढत्या तापमानाने होणारे नुकसान अधिक आहे. केळी हे नगदी पीक असून, त्यावर शेतकरी एकरी सव्वा ते दीड लाख रुपये खर्च करतो.

एवढा खर्च करून बागा होरपळत असतील तर हे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आहे. अलीकडच्या काळात दिवस-रात्रीच्या तापमानात होत असलेला मोठा बदल, कडाक्याची थंडी तसेच उष्ण लाटा यामुळे देखील केळीसह इतरही अनेक पिकांचे नुकसान होत असताना अशा आपत्तीतही पाहणी-पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळायला हवी.

तापमानवाढीत केळी बागांचे नुकसान कमी करण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने उत्पादकांनी बाग व्यवस्थापनावर भर द्यायला हवा. कृषी तज्ज्ञांनी पण सध्याच्या काळात नेमकी काय काळजी घेऊन बागा वाचविता येतील, याचे काटेकोर व्यवस्थापन उत्पादकांना द्यायला हवे.

उन्हाळी हंगामात घडाच्या वजनामुळे केळी झाडे वाकतात, त्यात जोराचा वारा आला की अशी झाडे कोसळतात. अशावेळी केळी बागांना बांबूचा आधार द्यायला हवा. वादळी वारे, उष्ण वारे यांपासून केळी बागा वाचवायच्या असतील तर बागेभोवती शेवरी हे जैविक कुंपण शेतकऱ्यांनी करायलाच पाहिजे.

ज्यांनी असे कुंपण केलेले नाही त्यांनी तत्काळ बागेभोवती शेटनेट लावून घ्यावी. काढणीला आलेल्या बागेतील केळी घड सकाळी लवकर किंवा सायंकाळी ऊन कमी झाल्यावर काढून घ्यावेत. असे घड त्वरित विक्रीसाठी देखील पाठवायला हवेत. बागेतील लहान रोपे अथवा झाडांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी बागेत आच्छादनाचा वापर करायला हवा.

बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी करण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने केओलिन पावडरचा वापरही केळी उत्पादकांना करता येईल. यासह केळी बागांचे पाणी आणि अन्नद्रव्ये व्यवस्थापन अगदी काटेकोरपणे करून केवळ बागाचा वाचविता येणार नाहीत, तर त्यापासून चांगले उत्पादनदेखील मिळू शकते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT