Maize Army Worm Agrowon
संपादकीय

Maize Army Worm Pest : वेळीच परतवा ‘लष्करी’ हल्ला

Team Agrowon

Maize Pest Control : जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण खानदेशात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. वेळीच उपाय न केल्यास नुकसानीची पातळी ५० टक्क्यांवर जाऊन समस्या अधिक गंभीर बनू शकते.

असे असले तरी कृषी विभागाला या परिस्थितीचे काहीही गांभीर्य दिसत नाही. खरे तर अत्यंत घातक अशा या किडीकडे सुरुवातीपासून सर्वांचेच दुर्लक्ष होतेय. २०१६ मध्ये ही कीड प्रथमतः नायजेरियात आढळून आली. त्यानंतर आफ्रिका खंडात या किडीने चांगलाच धुमाकूळ घातला.

आफ्रिका खंडातून ही कीड आशिया खंडात सर्वप्रथम भारतात दाखल झाली. भारतात कर्नाटक, तेलंगणा असा प्रवास करीत अमेरिकन लष्करी अळी २०१८ दरम्यान आपल्या राज्यात आली. त्यामुळे प्रथमतः आपल्या देशातील क्वारंटाइन विभागाला या किडीचा देशात प्रवेश रोखता आला नाही.

त्यानंतर केंद्रीय तसेच राज्यांच्या कृषी विभागासह एकूणच कीड व्यवस्थापन यंत्रणा या किडीचा देशात प्रसार-प्रचार थांबू शकली नाही. २०१९ आणि २०२० या दोन्ही वर्षांत राज्यात या किडीचा उद्रेक पाहावयास मिळाला.

त्या वेळी या किडीची ओळख तसेच नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांमध्ये तात्पुरती जाणीव जागृती करण्यात आली. मागील दोन वर्षांत राज्यात प्रादुर्भाव थोडा कमी असल्याने सर्वांनाच या किडीचा विसर पडला होता.

या वर्षी पुन्हा एकदा मका पट्ट्यात अमेरिकन लष्करी अळीने हल्ला केला आहे. सुमारे पाच वर्षांपूर्वी राज्यात दाखल झालेल्या या किडीबाबत शेतकऱ्यांना अजून पुरेशी माहिती नाही आणि कृषी यंत्रणा हलायला तयार नाही, हा सर्व प्रकार अतिगंभीर म्हणावा लागेल.

अमेरिकन लष्करी अळीमुळे होणारे नुकसान नियंत्रणासाठी येणारा खर्च पाहता या किडीस नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करावे, अशा मागणी प्रादुर्भावग्रस्त भागातील शेतकरी करीत असून ती रास्तच आहे. खरीप हंगामात पाऊस पडून उघडल्यावर प्रामुख्याने मका पिकावर या किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो.

मागील काही दिवसांपासूनच्या सततच्या पावसाने मका पिकात आंतरमशागतीची (डवरणी, खुरपणी) कामे झाले नाहीत. त्यामुळे मक्याची वाढ खुंटून त्यात तणांचा प्रादुर्भाव वाढला आहे. लष्करी अळीच्या प्रादुर्भावास हे अत्यंत पोषक वातावरण मानले जाते. अमेरिकन लष्करी अळी ही बहुभक्षी कीड आहे. या किडीचे आवडीचे खाद्य मका असले, तरी जवळपास ८० पिकांवर ही कीड आपली उपजीविका भागवू शकते.

यात प्रामुख्याने अन्नधान्ये तसेच नगदी पिकांचा समावेश असल्याने देशाला अन्नसुरक्षेबरोबर पशू-पक्षी खाद्यपुरवठा, तसेच साखर, कापड असे उद्योगही धोक्यात येऊ शकतात. असे असताना गल्ली ते दिल्ली अशा सर्वच स्तरांवर या किडीबाबत अजूनही सर्वच जण बेसावध आहेत.

आताही आपल्याकडे दोन-चार रासायनिक कीडनाशके सोडली, तर या किडीच्या नियंत्रणासाठी फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. प्रथमतः या किडीची ओळख, लक्षणे आणि प्रतिबंधात्मक तसेच नियंत्रणात्मक उपायांबाबत जनजागृतीची मोहीम राज्यभर राबवायला पाहिजे. अनेक देशांत या किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचे अनुभव चांगले असताना आपल्याकडे सुद्धा याच पद्धतीवर भर द्यावा लागेल.

अमेरिकन लष्करी अळीसाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन देताना सर्वसामान्य अळीवर्गीय किडींसाठीच्या उपाययोजना शेतकऱ्यांवर थोपवू नयेत.

या किडीच्या एकात्मिक व्यवस्थापनात पीक फेरपालट, सापळा पिके, मित्र किडी, कामगंध सापळ्यांतील ल्यूर तसेच वनस्पतिजन्य-जैविक-रासायनिक कीडनाशके या सर्वांवर नव्याने संशोधनात्मक काम होणे गरजेचे आहे.

सामूहिक नियंत्रणाचेच या किडीचे प्रभावी नियंत्रण होते, हेही शेतकऱ्यांना सांगावे लागेल. असे झाले तरच अमेरिकन लष्करी अळीचा पिकांवरील हल्ला आपल्याला रोखता येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT