Indian Agriculture: सर्वसामान्यांच्या केवळ चर्चेत असल्यासारखे वाटणारे ‘एआय’, अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान हळूहळू कळत न कळत त्यांचे जीवनमान व्यापत आहे. मानव आतापर्यंत काळाबरोबर चालत आल्यानेच अनेक संकटांवर मात करीत त्याची प्रगती झाली. औद्योगिक क्रांतीला (मशिनचा वापर) तीनशे वर्षे होऊन गेली आहेत. शेतीचे यांत्रिकीकरण तसेच काटेकोर शेती (प्रिसिजन फार्मिंग) ही औद्योगिक क्रांतीचीच देण आहे. यामुळे शेतीचे उत्पादन वाढले, शेतीमालाचा दर्जाही सुधारला आहे. परंतु काटेकोर शेतीच्याही मर्यादा आता पुढे येत आहेत, शिवाय त्यातील अडचणीही वाढत आहेत.
अशावेळी एआय तंत्रज्ञानाचा शेतीत वापर काळाची गरज म्हणूनच आपल्याला स्वीकारावे लागणार आहे. बारामती येथे एआय ऊस शेताचा पथदर्शक प्रकल्प यशस्वी झाला आहे. या प्रयोगाचा राज्यभर विस्तार करण्याच्या हालचाली देखील सुरू आहेत. एवढेच नव्हे तर एआयच्या वापराने खर्चात बचत आणि उत्पादनात वाढ हेही या प्रयोगातून सिद्ध झाले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रात एआय वापरासाठी ५०० कोटींची तरतूद देखील करण्यात आली आहे. आता त्याही पुढील टप्पा म्हणजे राज्यात सर्वच पिकांसाठी येत्या खरीप हंगामापासून एआयचा वापर करण्यात येईल, असे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी स्पष्ट केले आहे, त्याचे स्वागतच करायला हवे.
शेतीत एआयच्या वापरासंबंधी केंद्र सरकारशी सामंजस्य करार केला जाणार आहे. कृषी विभागाच्या विस्तार संकेतस्थळावरून ‘आयव्हीआरएस’ तंत्राने शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे असे त्याचे स्वरूप आहे. पुढे एक ॲप विकसित करून सर्व माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. जीपीओतून संकलित केलेल्या माहितीचे विश्लेषण करून शेतकऱ्यांना सल्लेही दिले जाणार आहेत.
मुळात माहिती संकलनाच्या बाबत कृषी विभाग खूपच मागे आहे. चुकीच्या माहितीवरील त्यांच्या अनेक योजना यापूर्वी फसल्या आहेत. एआय तर पूर्णपणे माहिती संकलन आणि त्याच्या विश्लेषणावर चालते. जेवढी माहिती अधिक आणि अचूक तेवढे प्रभावशाली एआयचे काम, याउलट माहितीची चुकीची असेल तर त्याचे तसेच विश्लेषण करून शेतकऱ्यांना चुकीचा सल्ला दिला जाऊ शकतो. हे लक्षात घेऊन अचूक डाटा संकलनावर कृषी विभागाने काम करायला हवे. जमिनीच्या मशागतीपासून ते शेतीमाल बाजारपेठेत पाठविण्यापर्यंतची माहिती एआयच्या माध्यमातून देण्याचे राज्य सरकार कृषी विभागाचे नियोजन आहे.
अशावेळी केवळ माहिती संकलन आणि त्याचे विश्लेषण एवढ्यावरच अवलंबून न राहता, त्याला संशोधनाची जोड देखील द्यायला हवी. हवामान बदल, कीड-रोगांसह तणांचा वाढता प्रादुर्भाव, त्यामुळे कीडनाशके, तणनाशके यांचा वाढता वापर, अन्नपदार्थांत वाढते रसायन अंश, अन्नद्रव्य व्यवस्थापनातील चुकांमुळे मातीचा बिघडत चाललेला पोत, पाणी आणि मजूरटंचाई, घटते उत्पादन आणि दर्जा, वाढलेला उत्पादन खर्च, काढणीपश्चात सेवासुविधांचा अभाव, शेतीमालाचे अस्थिर बाजारभाव या समस्या राज्यातील शेतकऱ्यांसमोर आहेत.
अशावेळी या सर्व समस्यांचे समाधान एआयला संशोधनाची जोड देऊनच शोधावे लागणार आहे. याकरिता कृषी विद्यापीठांनी पुढाकार घेऊन पीकनिहाय एआयचा वापर कुठे, कसा करता येईल, यावर काम करायला हवे. शिवाय राज्यातील शेतकऱ्यांची जमीन धारणा कमी आहे, त्यांची आर्थिक परिस्थिती देखील बिकट आहे. अशा शेतकऱ्यांना उपयुक्त आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांना परवडणारे हे तंत्रज्ञान असावे. असे झाले तर शेती क्षेत्रात एआय क्रांती घडवेल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.