Farmer Marriage Agrowon
संपादकीय

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

विजय सुकळकर

अमोल पगार हा नाशिक जिल्ह्यातील मुखेड गावचा उच्चशिक्षित तरुण. अमोलने ठरविले असते तर शहरात बऱ्यापैकी पगाराची नोकरी नक्की मिळाली असती. परंतु शहराचा मार्ग न धरता गावातच फळबागेची उत्कृष्ट शेती तो करीत आहे.

दुसरीकडे निकिता ही पदवीधर मुलगी. मुंबईत वाढलेली. तिला मोठ्या शहरातून विवाहासाठी अनेक स्थळे आली होती. चांगली नोकरी, बंगला, गाडी असलेली स्थळेही त्यात होती. परंतु ‘शेतकरी नवराच हवा’ असा निकिताचा हट्ट. लेकीचा हा हट्ट वडिलांनी पूर्ण केला.

अमोल आणि निकिताचे नुकतेच लग्न पार पडले. आज आपण पाहतोय हवामान बदलाच्या काळात शेतीतील जोखीम खूपच वाढली. वाढत्या नैसर्गिक आपत्तीने उत्पन्नाची हमी नाही. शेतीही दिवसेंदिवस खूपच कष्टदायक आणि खर्चीक पण होत चालली आहे. शेतीमालास मिळणाऱ्या अत्यंत कमी दराने शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरत नाही.

शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह देखील भागत नाही म्हणून उत्पन्नाचा दुसरा एखादा पर्याय मिळाल्यास अनेक शेतकरी शेती सोडायला तयार आहेत. तोट्याची शेती करण्याऐवजी शहरात जाऊन खाजगी कंपनीत मिळेल ते काम करण्याकडे तरुणाईचा कल वाढतोय. शेतकरी मुलाला लग्नासाठी मुलीच भेटत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात खासकरून शेतकऱ्यांच्या मुलांची लग्ने रखडली आहेत. हेही एक कारण तरुणाई शेतीकडे पाठ फिरविण्यामागे आहे.

अनेक कारणांनी शेतीचे घटते उत्पादन, सातत्याने वाढत जाणारी लोकसंख्या यामुळे भविष्यात देशाच्या अन्नसुरक्षेला धोका पोहोचू शकतो. अन्न उत्पादन हे कोणत्या कारखान्यात नाही तर शेतातच होणार आहे. अशावेळी शेतीतून उत्पादन वाढविणे अपेक्षित असताना शेतकरी, त्यांची पुढील पिढी शेतीकडे पाठ फिरवीत असतील तर ते उचित ठरणार नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांची लग्नच जमत नसल्याने मोठी सामाजिक समस्या निर्माण होत आहे. गावोगाव २५ ते ४५ या वयोगटातील अनेक मुले लग्नापासून वंचित आहेत.

यातील अनेक मुले पदवीधर तर काही उच्चविद्याविभूषित आहेत. शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने आज बेरोजगारीचा कळस आपण गाठला आहे. शिक्षणातून कौशल्यविकास झाला नसल्याने हे युवक कोणता व्यवसाय देखील करू शकत नाहीत. गावोगावचे असे सुशिक्षित, बेरोजगार, अविवाहित तरुण नैराश्यातून व्यसनाधीनतेकडे वळत आहेत. शेती किफायतशीर ठरू लागली, शेतीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागला, आरोग्य-शिक्षण यावर खर्च करता आला तर शेतीला प्रतिष्ठा लाभेल, हा विचार करून केंद्र-राज्य शासनाने आपली ध्येयधोरणे आखली पाहिजेत.

शेतकऱ्यांच्या मुलांनीही पारंपरिक शेतीऐवजी आधुनिकतेची कास धरली, नवी पीकपद्धती, लागवड पद्धत अवलंबिली शेतीतून हमखास उत्पादन मिळू शकते. शिवाय उत्पादित शेतीमाल विक्रीसाठी मध्यस्थ, व्यापाऱ्याच्या भरवशावर न बसता स्वतः थेट विक्री केली तर चांगला दर मिळून हाती चार पैसे पडतात. याशिवाय शेतीला पूरक व्यवसाय, शेतीमाल प्रक्रिया उद्योगाची जोड दिली तर उत्पन्नाचा शाश्वत स्रोत निर्माण होऊ शकतो.

असे झाल्यास उपवर मुली शेतकरी मुलांसोबत लग्न करायला तयार होतील. उपवर मुलींनी सुद्धा शहरातील झगमगाट, तेथील भ्रामक चंगळवादाच्या मोहजालाच्या मागे न लागता गावात चांगला कमावता शेतकरी मुलगा असेल तर त्याच्याशी लग्न करायला हरकत नसावी. निकिताला शेतीतील फारसे काही कळत नसले तरी तिला शेतीची आवड आहे. शुद्ध हवा, ताजा, सेंद्रिय भाजीपाला शेतीत मिळत असल्याने ती आनंदाने शेती करायला तयार आहे. निकीतासारखा विचार उपवर मुलींनी केला तर अनेक अविवाहित शेतकरी पुत्रांचे लग्न जुळतील. समाज स्वास्थ्यासाठी हेच उचित ठरणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT