Soybean Rate  Agrowon
मुख्य बातम्या

Soybean Market : दुष्काळातही सोयाबीनचे भाव पाडण्याच्या कारस्थानाला सुरुवात?

Anil Jadhao 

Soybean Crop : सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्था सोपाने सोयाबीन पिकाची स्थिती सरासरी असल्याचा निष्कर्ष काढला. पण शेतकऱ्यांच्या मते, सोयाबीन पिकाला दुष्काळी स्थितीचा मोठा फटका बसत आहे. तसेच सोपाने मागील हंगामातील ३२ लाख टन सोयाबीन शिल्लक असल्याचेही सांगितले. सहाजिकच यावरून सोपावर टिका केली जाते.

सोपा मात्र पिकाची स्थिती तेवढी खराब नाही, असा दावा करतंय. यामुळे सोपावर टिका केली जात आहे. पण तसही मागील काही वर्षांपासून सोपाच्या अंदाजावरच शंका उपस्थित केली जात आहे. सोपाच्या मागच्या हंगामातील उत्पादनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

सोपाने मागच्या खरिपात सोयाबीनचे उत्पादन १२४ लाख टन झाल्याचे म्हटले होते. तर सध्या देशात ३२ लाख टन सोयाबीन शिल्लक असल्याचा अंदाज सोपाने दिला. पण सोपाचा हा अंदाज अनेकांना मान्य नाही. देशात सोयाबीनचा स्टाॅक आहे, पण सोपा सांगते त्या प्रमाणात तो नाही, असे अनेकांचे मत आहे.

मग सहाजिकच प्रश्न पडतो की सोपा असं का करतं? तर सोपा ही उद्योगांची संस्था असल्याने उद्योगांना स्वस्तात सोयाबीन मिळावं यासाठी दरहंगामात जास्त उत्पादनाचे अंदाज दिले जातात, असे बाजारातील अभ्यासक, काही व्यापारी आणि खुद्द काही उद्योजकही सांगतात.

आता तुम्ही आणखी म्हणालं जास्त उत्पादनाचे अंदाज दिले म्हणजे उद्योगांना काय फायदा? तर जास्त उत्पादन झाल्यास भाव वाढणार नाहीत किंवा कमी होतील या भीतीने शेतकरी आहे त्या भावात माल विकतात आणि यात फायदा सहाजिकच व्यापारी आणि उद्योगांचा होत असतो.

मागील हंगामात आम्ही सोयाबीनचे भाव ५ ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज दिला होता. यंदा पिकाची काढणी उशीरा होणार असल्याने नेमकं उत्पादन किती राहील, याचा अंदाज ऑक्टोबरच्या शेवटी येऊ शकतो. तोपर्यंत मागणी आणि पुरवठ्याचं गणितही स्पष्ट होऊ शकतं. त्यावेळी यंदाची दरपातळी काय राहू शकते, याचा अंदाज देता येईल.

पण अभ्यासकांच्या मते, शेतकऱ्यांची सुरुवातीच्या काळात गुणवत्तेचे सोयाबीन ५५०० रुपयांच्या खाली विकू नये, असा सल्ला दिला. पण आणखी एका गोष्टीकडं लक्ष ठेवा. ते म्हणजे आपलं मायबाप सरकार काय निर्णय घेतं ते. कारण मागील काही महिन्यांपासून खाद्यतेलाची आयात जोमात सुरु आहे. त्याचा दबाव बाजारावर आहेच.

पण सरकारनं यापुढं जाऊन माती खायला नको. पण सरकार काय निर्णय घेत आणि त्याचा आपल्या सोयाबीनवर काय परिणाम होऊ शकतो, याची माहिती आम्ही तुम्हाला नेहमीप्रमाणं देतच राहू.

आपला सोयाबीनचा नवा हंगाम एक ऑक्टोबरपासून सुरु होतो. म्हणजेच नवा हंगाम तोंडावर आला. पण यंदा सोयाबीनची पेरणी देशातील बहुतांशी भागात उशीरा झाली. त्यामुळं सहाजिकच सोयाबीनची काढणीही उशीराच होईल. हंगामाच्या सुरुवातीला मुद्दाम बाजारात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असतो.

शेतकरीही पहिल्या महिन्यातच मालाची काढणी झाल्याबरोबर मिळेल त्या भावात विक्री करत असतात. त्यासाठीच हा सगळा खटाटोप सुरु असतो. मग आपण काय करू शकतो? तर यंदा दुष्काळी स्थिती आहे, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे.

फक्त आपल्याकडच नाही तर देशात सगळीकडच उत्पादन घटणार आहे. त्यामुळे यंदा उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा कमीच राहील. त्यामुळे यंदा भाव पडण्याची शक्यता नाही.

सोपा ही सोयाबीनवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांची संस्था आहे. सोपाने नुकतेच एक अहवाल प्रसिध्द करत देशातील सोयाबीन पिकाची स्थिती सरासरी असल्याचे म्हटले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पिकाला फटका बसल्याचे सोपाने सांगितले.

सोपाच्या मते नुकसान असलेले जिल्हे
महाराष्ट्रात
बीड, धाराशिव, परभणी, नांदेड, अकोला, अमरावती आणि यवतमाळ

मध्य प्रदेश
मंदसौर, निमच, रतलाम, खंडवा, देवास, खरगोन आणि बडवाणी

राजस्थान
कोटा, प्रतापगड, बाराण आणि झालवर


या जिल्ह्यांमधील सोयाबीन पिकाचेही काही प्रमाणात नुकसान झाल्याचे सोपाने सांगितले.  पण मागील काही दिवसांमध्ये झालेल्या पावसाचा पिकाला फायदा झाल्याचे सोपाचे म्हणणे आहे.

देशातील सोयाबीन पिकाचे फार काही नुकसान नाही, असं सोपाला म्हणायचं. पण नेमकी पिकाची काय स्थिती आहे, हे शेतकऱ्यांना चांगलेच ठाऊक आहे. आपण सगळे दुष्काळामुळं हैरान झालो. राज्यभरातील सोयाबीन पिकाची स्थिती खराब आहे.

त्यातही मराठवाडा, नगर, नाशिक, सातारा आणि सांगली थोडक्यात मध्य महाराष्ट्रातील सोयाबीनची तर वाटच लागली. विदर्भातील सोयाबीनची उत्पादकताही किमान ३० टक्क्यांपर्यंत कमी राहू शकते, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

अनेक भागात सोयाबीनला शेंगाच लागल्या नाहीत. पीक पाण्याअभावी पीक पिवळं पडत आहे. असं असतानाही महाराष्ट्रातील केवळ काहीच जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचं नुकसान असल्याचं म्हटलंय.

केवळ महाराष्ट्रातच नाही तर मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्येही सोयाबीन पिकाची स्थिती खराब आहे. मध्य प्रदेशात आपल्याप्रमाणेच आधी दुष्काळी स्थितीचा पिकाला फटका बसला. त्यानंतर मात्र अनेक भागात जास्त पाऊस झाला.

म्हणजेच मध्य प्रदेशातील सोयाबीनला दुहेरी फटका बसला. विशेष म्हणजेच महत्वाच्या सोयाबीन उत्पादनक जिल्ह्यांमध्ये पिकाचे नुकसान जास्त आहे. राजस्थानमध्येही अतिपावसाने पिकाचे नुकसान वाढले.

म्हणजेच महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान या तिन्ही राज्यांमधील सोयाबीन पिकाचं काही खरं नाही. विशेष म्हणजे देशातील एकूण उत्पादनापैकी ९० टक्के उत्पादन याच तीन राज्यांमध्ये होते. म्हणजेच यंदा कोणत्याही संस्थेने काहीही म्हटले तरी उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी होणार हे आपल्यालाही दिसतं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT