Kolhapur News : यंदाच्या गाळप हंगामात कमी साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त होत आहे. हा अंदाज खरा ठरल्यास राज्यातील साखर कारखान्यांना आपल्या गाळपाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी धडपड करावी लागेल, अशी चिन्हे आहेत. विशेष करून ज्या कारखान्यांनी गेल्या दोन वर्षांत गाळप क्षमता वाढविली अशा कारखान्यांना यंदा कमी गाळप क्षमतेने हंगाम चालवावा लागणार आहे. याचा विपरित परिणाम कारखान्यांच्या आर्थिक ताळेबंदावरही होणार आहे.
राज्याची दैनिक गाळप क्षमता ८ लाख ८२ हजार ५५० टन आहे. गेल्या दोन वर्षांत विशेष करून पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नामवंत साखर कारखान्यांनी कारखान्याचा फायदा वाढविण्यासाठी गाळप क्षमतेत वाढ केली. राज्यात नवे साखर कारखाने सुरू होण्याचा वेग कमी असला तरी अनेक मोठ्या साखर कारखान्यांनी गाळप क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केले. यामुळे अनेक भागात नवा कारखाना उभारल्यासारखीच स्थिती आहे.
गेल्या वर्षाचा अपवाद वगळता गेल्या काही वर्षांत सातत्याने उसाची तोड लवकर होत नव्हती. गेल्या वर्षीपासून मात्र गाळप क्षमतेत वाढ झाली. परंतु उसाची उपलब्धता तेवढ्या प्रमाणात झाली नाही. यामुळे गेल्या वर्षी अनेक कारखाने हंगामाच्या मध्यानंतर कमी गाळप क्षमतेने चालू लागले. हंगामाच्या शेवटी तर ही समस्या अधिक प्रमाणात भेडसावली. वाढीव गाळप क्षमता केलेल्या कारखान्यांचा हिशेब चुकला. त्याचा सर्वदूर परिणाम कारखान्यांच्या बॅलन्स शीटवरही झाला.
यंदा तर ही समस्या पहिल्या हंगामापासूनच भेडसावेल अशी शक्यता आहे. ऊस पट्ट्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. पावसाळी हवामान पंधरा दिवसही टिकले नाही. कोल्हापूर, सांगली सारख्या ऊस उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या पट्ट्यात केवळ पंधरा दिवसच पाणी द्यावे लागले नाही.
सध्या या भागातही कडक ऊन असल्याने उस उत्पादक उपलब्ध स्रोताद्वारे उसाला पाणी देत आहेत. नैसर्गिक हवामान अनुकूल नसल्याने उसाची वाढही अपेक्षित झालेली नाही. यामुळे उत्पादनात घट निश्चित मानली जात आहे. राज्याच्या अन्य भागातही अपवाद वगळता अशीच परिस्थिती आहे.
लागवड झालेल्या १४ लाख ३७ हजार हेक्टरमधून सुमारे ९५० लाख टन ऊस गाळपास उपलब्ध होईल, अशी शक्यता आहे. राज्याची गाळप क्षमता प्रतिदिन ९ लाखांपर्यंत अपेक्षित धरल्यास कारखाने तीन ते सव्वा तीन महिनेच चालतील, एवढाच ऊस उपलब्ध होणार आहे. ऊस हंगामात किमान पाच महिने (१५० दिवस) कारखाने चालणे गरजेचे आहे, अन्यथा कारखान्यांच्या व्यवस्थापन खर्चात वाढ होणार आहे. याचा फटका कारखान्यांना बसू शकतो. अनेक शेतकरी उसाची नीट वाढ होत नसल्याने रोपवाटिकांना बियाण्यांसाठी देत आहेत. यंदा याचे प्रमाणही वाढल्याने याचा थेट फटका कारखान्यांना बसण्याची शक्यता आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.