Kolhapur News: जागतिक पातळीवर २०२४-२५ चा साखर हंगाम कमी उत्पादनाचा गेला असला, तरी येणाऱ्या गळीत हंगामात (२०२५-२६) जगात साखर उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. त्या संदर्भात जागतिक पातळीवरील अनेक संस्थांनी भाष्य केले आहे. मात्र उत्पादन वाढणार असल्याने साखरेला चांगला दर मिळण्यासाठी झगडावे लागण्याची शक्यता आहे.
अमेरिकेच्या कृषी विभागानेही (यूएसडीए) साखर उत्पादन वाढण्याच्या संकेताला पुष्टी दिली आहे. जगातील प्रमुख साखर उत्पादक देश असलेल्या ब्राझील व भारतामध्येच साखर उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. यूएसडीएच्या अंदाजानुसार जगात २०२५-२६ मध्ये १८९० लाख टन साखर तयार होऊ शकते. यामध्ये ब्राझीलचे उत्पादन सर्वाधिक म्हणजे ४४० लाख टनांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.
‘डाटाग्रो’ या संस्थेने, ब्राझीलमध्ये दक्षिण मध्य भागात साखर उत्पादन ६ टक्क्यांनी वाढून ४२० लाख टनांपर्यंत पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला आहे, तर सिझरनिकोने हा अंदाज ४३० लाख टनांचा दिला आहे.
क्रिसिलच्या अहवालानुसार, २०२५-२६ मध्ये भारताचे एकूण साखर उत्पादन १५ टक्क्यांनी वाढून सुमारे ३५० टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ‘इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ने (इस्मा) २०२४-२५ च्या हंगामातील पाच वर्षांतील नीचांकी २९०.५ लाख टनांच्या तुलनेत २०२५-२६ मध्ये उत्पादनात लक्षणीय वाढीचा अंदाज व्यक्त केला. थायलंडचे २०२५-२६ मधील साखर उत्पादन २ टक्क्यांनी वाढून १०० लाख टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. चीनमध्ये उत्पादन ५ लाख टनांनी वाढून ११० लाख टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
४० लाख टन साखर इथेनॉलकडे वळवण्याची शक्यता
ब्राझीलमध्ये उसापासून साखर आणि इथेनॉल तयार होते. मात्र या हंगामात इथेनॉलचे प्रमाण वाढून साखरेचा वाटा थोडा कमी असण्याची शक्यता आहे. भारत व ब्राझील, इथेनॉल उत्पादनावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. भारतात २०२५ मध्ये अंदाजे ३५ लाख टन साखर इथेनॉलसाठी वळवण्यात आली होती. २०२६ मध्ये हे प्रमाण ४० लाख टनांवर जाण्याची शक्यता आहे. सरकारच्या इथेनॉल मिश्रणाच्या उद्दिष्टांमुळे साखर कारखान्यांना इथेनॉल उत्पादनाकडे वळण्यास प्रोत्साहन मिळत आहे.
साखरेच्या किमतीवर दबाव शक्य
साखरेच्या वाढीव उत्पादनामुळे ४१० लाख टन अतिरिक्त साखर तयार होईल. ही साखर गेल्या वर्षीपेक्षा साडेसात टक्क्यांनी जास्त आहे. जादा उत्पादनाचा अंदाज पाहिल्यास साखरेला जगातील सर्वच बाजारपेठांमध्ये दरासाठी संघर्ष करावा लागेल, अशी स्थिती निर्माण होऊ शकते. जादा पुरवठा व अतिरिक्त साठ्याच्या अंदाजामुळे जागातिक बाजारात आतापासून दरात चढ-उतार होत आहे. प्रत्यक्षात ज्या वेळी मोठ्या प्रमाणात साखर जागतिक बाजारपेठेत येईल, त्या वेळी किमती स्थिर ठेवण्याचे आव्हान उद्योगापुढे असेल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.