
Kolhapur News : केंद्र सरकारने देशातील साखर कारखान्यांना जुलै महिन्यासाठी २२ लाख टन साखरेचा कोटा विक्रीसाठी दिला आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत हा कोटा एक लाख टन कमी आहे. गेल्या वर्षी देशात साखरेचे उत्पादन कमी झाले. या पार्श्वभूमीवर पुढील हंगामापर्यंत जादा साखर विक्री होऊन साखरेची टंचाई निर्माण होवू नये, यासाठी केंद्राने प्रत्येक महिन्यात साखरेचे कोटे गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी दिले असल्याचे चित्र आहे.
कमी विक्री कोटा दिल्याने जुलै महिन्यात साखरेच्या दरात काहीशी वाढ अपेक्षित असल्याचा आशावाद साखर उद्योगाला आहे. बाजारात स्थिरता राखण्यासाठी आणि पुरवठा नियंत्रित करण्यासाठी कोटा कमी केल्याचे खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
जूनच्या तुलनेत महाराष्ट्र, कर्नाटकचे साखर कोटे घटविले
पुढील हंगाम सुरू होईपर्यंत बाजारात साखर पुरेशी उपलब्ध व्हावी यासाठी केंद्राची चाललेली कसरत कोटा वाटपावेळी दिसून येते. देशातील आघाडीच्या साखर उत्पादनातील राज्यांचा कोटा कमी करण्यात आला आहे. यंदा सर्वाधिक साखर उत्पादन करणाऱ्या उत्तर प्रदेशचा साखर कोटा जूनच्या तुलनेत सुमारे सव्वाचार टक्क्यांनी घटविला आहे. जूनमध्ये ९ लाख ४७ हजार ५०९ टन साखर कोटा उत्तर प्रदेशला मिळाला होता.
जुलैमध्ये यात घट करताना तो ९ लाख ७ हजार ५४५ टनांपर्यंत खाली आणला आहे. महाराष्ट्रासाठी जूनमध्ये ६ लाख ८१ हजार ८७८ टनांचा कोटा होता. त्यात तीन टक्क्यांची घट करत तो कोटा ६ लाख ६२ हजार टनांपर्यंत आणला आहे.
तशी घट कमी असली तरी या राज्यातून जास्त साखर विक्री होवू नये याची खबरदारी केंद्राने कोटा वितरण करताना घेतली आहे. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या कर्नाटकचा कोटा २ लाख ६९ हजार ४७३ वरून २ लाख ४२ हजार १५५ लाख टनांवर आणला आहे. अन्य प्रत्येक राज्याचे कोटे १ टक्क्यापासून १० टक्क्यांपर्यंत घटविले आहे.
जुलैमध्ये साखर पुरवठा घटणार
जूलैमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत २ लाख टनांची घट आली आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचा पुरवठा आठ टक्क्यांनी घटणार आहे. यामुळे बाजारात साखरेच्या किमतीत चढ-उतार होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात सरासरी मागणी कमी असते, विशेषतः कोल्ड ड्रिंक, आइस्क्रीम, मिठाई उत्पादन कंपन्यांकडून मागणी थंडावते.
जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून रक्षाबंधन, गणेशोत्सवाच्या दरम्यान साखरेची मागणी वाढायला सुरुवात होते. यामुळे या वाढीव दराचा फायदा घेण्यासाठी व्यापारी जुलैमध्येच साखरेची खरेदी करण्याची शक्यता आहे. यामुळे जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून खरेदी वाढून दरात थोडीशी तरी वाढ अपेक्षित असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांचे म्हणणे आहे.
देशाअंतर्गत बाजाराची स्थिती
जून महिन्याच्या सुरुवातीला देशाअंतर्गत साखरेचे दर स्थिर होते. मात्र, जुलै २०२५ साठीचा मासिक कोटा कमी करण्यात आल्यामुळे स्पॉट मार्केटमध्ये किमतींमध्ये वाढ दिसून आली आहे. काही बाजारपेठांमध्ये साखरेच्या दरात क्विंटलला ५० ते ७० रुपयांची वाढ दिसून येत आहे.
सध्याचे साखरेचे राज्यनिहाय आकारमानानुसार दर (क्विंटलमध्ये, रुपये)
राज्य---एम ३०---एस ३०
महाराष्ट्र---३८७०-३९१०---३७७०-३८१०
उत्तर प्रदेश---३९५०-४००० - -
कर्नाटक -- ३९५० ते ३९६०
गुजरात---३८११ - ३८४१---३७७५ - ३८०१
तमिळनाडू---४१०० -४२५०---४०१० - ४१७५
मध्य प्रदेश---३९३०-३९४५---३८६०-३८७५
पंजाब---३९८० - ४०९० --
ऑक्टोबर २०२४ ते जुलै २०२५ अखेर साखर कोट्याची स्थिती (लाख टन)
महिना---विक्री कोटा
ऑक्टोबर---२५.५०
नोव्हेंबर---२२.००
डिसेंबर---२२.००
जानेवारी---२२.५०
फेब्रुवारी---२२.५०
मार्च---२३.००
एप्रिल---२३.५०
मे---२३.५०
जून---२३.००
जुलै---२२.००
असा आहे येणाऱ्या हंगामाचा अंदाज
२०२४-२५ च्या हंगामामध्ये साखर उत्पादन अपेक्षित पातळीपेक्षा कमी राहिल्यामुळे, देशाअंतर्गत पुरवठा मागणीपेक्षा किंचित कमी असण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाने म्हटले आहे की, २०२४-२५ हंगामाच्या अखेरीस सुमारे ४० लाख टन साखरेचा साठा अपेक्षित आहे. जो २०२५-२६ च्या सुरुवातीच्या मागणीसाठी पुरेसा असेल. २०२५-२६ हंगामात साखरेचे उत्पादन १५-२५ टक्क्यांनी वाढून सुमारे ३५० लाख टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दीर्घकाळात दर स्थिर राहण्यास मदत होईल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.