Amravati News: आले दर दबावात आल्याने उत्पादकांची चिंता वाढली आहे. यातील बहुतांश शेतकऱ्यांनी तर दहा हजार रुपये क्विंटल दराने आले (अद्रक) बेणे खरेदी केले होते. मात्र आता ३००० ते ३५०० रुपये क्विंटलवर दर आल्याने उत्पादन खर्चाच्या भरपाईचा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. अमरावती बाजारात आले आवक ११० क्विंटलवर असून, सध्या ३५०० ते ४००० रुपये असा दर मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांना आले पिकातून चांगला परतावा मिळाला. त्यामुळे या पिकाखालील क्षेत्रात सातत्याने वाढ नोंदविण्यात आली. बुलडाणासह अमरावती जिल्ह्यात हे पीक घेतले जाते. सरासरी दहा हजार रुपये क्विंटलचा दर याला मिळाला. लागवड क्षेत्र वाढीसाठी हे एक कारण होते. यंदा मात्र या पिकाने शेतकऱ्यांची चांगलीच निराशा केल्याचे चित्र आहे. दहा हजार रुपयांवरून दर थेट ३५०० ते ४००० रुपयांवर आले आहेत. परिणामी, महागड्या खरेदी केलेल्या बेण्यावरील खर्चाची भरपाई देखील अनेकांना शक्य होत नाही, अशी स्थिती आहे.
शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ महिने कालावधीचे हे पीक आहे. जून महिन्यात लागवड होते. त्यानंतर फेब्रुवारीपासून काढणीस केली जाते. सध्या अमरावतीत ११० क्विंटल आवक होत त्याला ३५०० ते ४००० रुपयांचा दर मिळत आहे. परंतु नागपूरच्या कळमना बाजार समितीत दर आणखी दबावात असून, १५०० ते २००० रुपयांनी यापूर्वी व्यवहार झाले. सद्यःस्थितीत आले दर १५०० ते २५०० रुपयांवर आले आहेत. नागपूरच्या कळमना बाजार समितीमधील आवक अमरावतीच्या तुलनेत अधिक असून ८४० क्विंटल इतकी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
दहा हजार रुपये क्विंटल रुपयांवर असलेले दर आता दबावात आले आहेत. गेल्या वर्षापर्यंत आले दरात तेजी होती. त्यामुळे दहा हजार रुपये क्विंटलने एक एकर लागवडीसाठी आठ क्विंटल बेणे घेण्यात आले. एकरी ४० क्विंटलची उत्पादकता झाली. सध्या दर तीन हजार रुपयांवर आले आहेत. त्यामुळे बेण्याचा खर्चही निघणे अवघड आहे.मयूर देशमुख, आले उत्पादक शेतकरी, काजळी, ता. चांदूरबाजार, अमरावती
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.