Onion Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Market : निर्यातबंदीतही होतेय परदेशांत कांदा तस्करी

Onion Export Ban : निर्यातबंदीमुळे दराअभावी शेतकऱ्यांच्या कष्टाची माती झाली आहे. अशा बिकट स्थितीतही बांगलादेश, नेपाळ, मलेशिया, श्रीलंका व आखाती देशात कांद्याची छुप्या मार्गाने तस्करी होत आहे.

मुकूंद पिंगळे

Nashik News : निर्यातबंदीमुळे दराअभावी शेतकऱ्यांच्या कष्टाची माती झाली आहे. अशा बिकट स्थितीतही बांगलादेश, नेपाळ, मलेशिया, श्रीलंका व आखाती देशात कांद्याची छुप्या मार्गाने तस्करी होत आहे. ही तस्करी शेतकऱ्यांच्या मुळावर आली आहे. केंद्र सरकार शेतकरी आणि ग्राहक हिताच्या वारंवार गोष्टी सांगत असताना कुणाच्या आशीर्वादाने कांद्याची तस्करी होत आहे, हा प्रश्‍न आहे.

केंद्र सरकारने ८ डिसेंबरपासून निर्यातबंदीची अंमलबजावणी सुरू केली. मात्र असे असताना नाशिक जिल्ह्यातून कांद्याची तस्करी सुरू आहे. गेल्या १५ दिवसांपासून दबक्या आवाजात याबाबत चर्चा होती. विविध मार्गाने लपवून कांदा पाठविला जात आहे. याबाबतचे व्हिडिओ व छायाचित्र ‘ॲग्रोवन’च्या हाती लागले असून तस्करीचे बिंग फुटले आहे.

सीमा भागातून काही केंद्रीय यंत्रणांच्या वरदहस्ताने कांदा पुढे बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ व मलेशियात जात आहे. यापूर्वी निर्यातदार १५ ते २० हजार रुपयांपर्यंत नफा मिळवीत होते. मात्र या तस्करीतून १० ते १५ लाखांपर्यंतचा परतावा मिळत असल्याने तस्कर मालामाल होत आहेत.

प्रामुख्याने पिंपळगाव बसवंत, लासलगाव, मुंगसे (मालेगाव) व उमराणे या ठिकाणी हे कामकाज होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. शेतकऱ्याला मातीत घालून काही जण मालामाल होत आहेत, यामध्ये केंद्र सरकारच्या काही यंत्रणांचे पाठबळ आहे का, यामागे नेमका हात कोणाचा आहे, असे सवाल विचारत शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार अशी होते तस्करी :

- कांदा निर्यात एरवी बारदाना व प्लॅस्टिक गोण्यांमधून होत असे; मात्र आता कांदा व्यापारी खळे तसेच पॅकहाउसमधून डाळिंब, द्राक्ष, संत्रा, लिंबू व हिरव्या मिरचीच्या या पेटाऱ्यांत कांदा भरतात.

- त्यानंतर रेफर कंटेनर लोड होताना हे पेटारे मध्यभागी असतात. दर्शनी व तपासणीच्या भागात नाशिवंत शेतीमाल व फळे ठेवली जातात.

- श्रीलंकेत कडधान्यांच्या पोत्यातून कांद्याची तस्करी

- दररोज १५०० ते २००० टन तस्करी. त्यातून १५ ते २० कोटींची दररोज कमाई

कांद्याचा तुटवडा अन् दराचा भडका

भारतात कांद्याला घाऊक बाजारात सरासरी १० रुपये प्रतिकिलोच्या आसपास दर मिळत आहे. तर शेजारच्या देशात कांद्याचा तुटवड्यामुळे दराचा भडका उडाला आहे. ‘सेंट्रल बँक ऑफ श्रीलंका’ यांच्या अहवालानुसार श्रीलंकेत आयात झालेल्या कांद्याला भारतीय चलनाप्रमाणे १०० रुपये प्रतिकिलोवर दर मिळत आहे. तर बांगलादेशातील ‘सोब्जी बाजार’ या संकेतस्थळावरील माहितीनुसार घाऊक बाजारात प्रतिकिलोला ६५ रुपयांवर दर आहे, तर किरकोळ बाजारात १०० रुपये दर आहेत.

मलेशियात घाऊक बाजारात किलोला ७५ तर किरकोळ बाजारात १०० रुपये दर आहेत. ‘काठमांडू टुडे’च्या माहितीनुसार नेपाळमध्ये प्रतिकिलोला ६७ रुपये दर आहेत. त्यामुळे तस्करीतून ५ ते १० पट पैसे कमावले जात आहेत. एक कंटेनर सोडण्यासाठी जवळपास दीड लाखापासून ते अडीच लाखापर्यंत पैसे सीमेवरील अधिकाऱ्यांना दिले जातात.

भारत व बांगलादेश सीमेवरील घोजाडांगा (पश्चिम बंगाल) भागातून हा कांदा बांगलादेशमध्ये जातो. येथून पुढे मलेशियात जातो. जेएनपीटी(मुंबई) बंदरातून आखाती देशांमध्ये जातो. तर तुतिकोरीन (चेन्नई) येथील बंदरातून तो श्रीलंकेत जात असल्याचे सूत्राने सांगितले. काही व्यापारी व निर्यातदारांशी संपर्क साधला; काहींनी बोलले टाळले तर काहींनी प्रतिसाद दिलेला नाही.

शेतकऱ्याला संपवून काही विशिष्ट घटकांना मालामाल करण्याचा प्रकार आहे. केंद्र सरकार निर्यात खुली करू शकत नाही, तस्करी थांबवू शकत नाही. त्यामुळे हे केंद्र सरकारचे अपयश आहे. हा प्रकार सर्रास होत आहे. कंटेनर सोडण्यासाठी अडीच लाखांपर्यंत पैसे दिले जात असल्याची चर्चा आहे. कोण सहभागी आहे हे शोधले पाहिजे. नसेल होत तर कांदा उत्पादकांना क्विंटलमागे ३ हजार रुपये तोटा झाला, तो द्या.
- भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: ज्वारीचा भाव टिकून; गवार तेजीत, जांभळाला उठाव, मुग दबावात, सोयाबीन दर मंदीत

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्यांना विलंब नको

Urea Shortage : युरियाच्या कृत्रिम टंचाईमुळे शेतकरी त्रस्त

Go Green Scheme : ‘गो-ग्रीन’मधून वीजबिलात १२० रुपयांची सवलत

Khandesh Water Crisis : टँकर घटले; काही भागांत टंचाई कायम

SCROLL FOR NEXT