Nashik Kanda Market News Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Rate : कांद्याचे दर कोसळल्यामुळे शेतकरी संतप्त; सरकारने तातडीने दखल घेण्याची मागणी

वातावरणीय बदल, कांदा रोपवाटिकांचे नुकसान, त्यात लागवडीवर रोगांचा प्रादुर्भाव अशा प्रतिकूल परिस्थितीत यंदा लेट खरीप कांदा लागवडी झाल्या.

मुकूंद पिंगळे

Nashik Kanda Market News : वातावरणीय बदल, कांदा रोपवाटिकांचे नुकसान (Onion Nursery), त्यात लागवडीवर रोगांचा प्रादुर्भाव (Onion Disease) अशा प्रतिकूल परिस्थितीत यंदा लेट खरीप कांदा लागवडी (Onion Cultivation) झाल्या. ऑक्टोबरअखेर अतिवृष्टी राहिल्याने हंगाम महिनाभर लांबणीवर गेला.

या महिन्यात आवक वाढल्याने सरासरी दर (Cotton Rate) हे ४५० ते ७०० रुपये इतके खाली आले आहेत. चालू सप्ताहात आवक कमी होऊनही दर कोसळल्याची स्थिती आहे. त्यामुळे वाढलेला उत्पादन खर्च, एकरी उत्पादनात घट व सध्या घसरलेल्या दरामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.

लेट खरीप कांद्याच्या उत्पादनासाठी राज्यात अव्वलस्थानी असणाऱ्या नाशिक जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. रोपवाटिकांचे नुकसान झाल्याने लागवडी पूर्ण करण्यात अडचणी आल्या.

काही शेतकऱ्यांनी दुबार रोपे तयार करून लागवडी पूर्ण केल्या. मागील वर्षी २०२१-२२ मध्ये जिल्ह्यात ६०,८४३ हेक्टरवर लागवडी झाल्या. यंदा ५१,३२१ हेक्टरवर लागवडी पूर्ण झाल्या. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत ९,५२२ हेक्टर लागवडी कमी झाल्या आहेत.

त्यातच क्षेत्र घटले. तर दुसरीकडे एकरी उत्पादनात घट येऊन सरासरी ६० ते ८५ क्विंटलदरम्यान उत्पादन हाती येत आहे. यासाठी एकरी जवळपास ६५ ते ७५ हजार रुपये लागवड ते काढणीपर्यंत खर्च आला आहे. मात्र प्रत्यक्षात १०० रुपयांपर्यंत दर खाली आले आहेत.

एकीकडे या कांद्याला साठवणूक क्षमता नसल्याने तो काढणीपश्चात तातडीने विकावा लागत आहे. पण सरासरी ५०० रुपयांच्या आसपास दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याची स्थिती आहे.

दर घसरणीचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना पत्र दिले होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या प्रश्‍नावर निवेदन दिले होते. सरकार हा विषय कधी गांभीर्याने घेणार, असा सवाल शेतकरी विचारत आहेत.

बाजार समितीनिहाय दरस्थिती (रु.) (ता. २१) प्रतिक्विंटल

लासलगाव...४००...१,१७०...७००

पिंपळगाव बसवंत...४००...१,२३९...६८०

सिन्नर...१००...७०१...५००

मनमाड...१००...८८३...५७५

चांदवड...३००...८५०...५००

नांदगाव...१००...७०१...४५०

उमराणे...३५०...८००..४७५

शेतकऱ्यांचा संताप रस्त्यावर

कांदा दर घसरल्यानंतर चांदवड येथे माजी आमदार शिरीष कोतवाल, मनमाड येथे माजी आमदार संजय पवार, उद्धव ठाकरे शिवसेनेचे गणेश धात्रक व महाविकास आघाडीचे नेते यांच्या उपस्थितीत कांदा लिलाव बंद पडून ‘रास्ता रोको’ झाले.

येवला येथे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने बाजार आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांमध्ये दर नसल्याने मोठा संताप आहे. खर्चही वसूल होत नसल्याने घेतलेले कर्ज व उसनवारी फेडायचे कशी, अशा विवंचनेत शेतकरी आहेत. त्याचा उद्रेक आता रस्त्यावर दिसू लागला आहे.

उत्पादन निम्म्याहून घटले असून, त्यासाठी खर्च एकरी ६० ते ६५ हजार झाला. मात्र २ ते ५ रुपये दरम्यान दर मिळत आहे. केंद्र सरकारने नुसता खाणाऱ्याचा विचार करू नये, तर शेतकरी ही जगला पाहिजे, ही भावना ठेवावी.

- भगवान जाधव, जिल्हा समन्वयक, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

कांदा उत्पादनात घट असून, ६० ते ७० क्विंटल उत्पादन मिळाले आहे. कांद्याला एका किलोसाठी साधारण १२ ते १५ रुपये खर्च येतो. सध्याच्या भावात उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही. सरकारने प्रतिकिलो दहा रुपये अनुदान जाहीर करावे.

- सागर बोराडे, शेतकरी, पाटोदा, ता. येवला

यंदा खराब हवामानामुळे अनेक फवारण्या करून ही कांद्याचा आकार वाढला नाही. काही भागांत करपा रोग असल्याने एकरी ५० ते ६० क्विंटल उत्पादन मिळाले. राज्य सरकारने केंद्राच्या मदतीने शेतकऱ्यांनी विकलेल्या पावतीप्रमाणे किमान एक हजार रुपये आर्थिक साह्य करावे.

- बापू पगारे, प्रसिद्धी प्रमुख, शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटना

सरकारने क्विंटलला कमीत कमी २,५०० रुपये भाव द्यावा. अन्यथा, क्विंटलमागे एक हजार रुपयांचे अनुदान द्यावे. केंद्र व राज्य सरकारने एकत्र बसून कायमस्वरूपी निर्णय घेतला पाहिजे.

- दीपक उशीर, कांदा उत्पादक, धोडांबे, ता. चांदवड, जि. नाशिक

शेतकऱ्यांनी मांडलेल्या व्यथा :

- उत्पादन खर्चसुद्धा निघेना

- किमान २ हजार रुपये दर अपेक्षित

- सध्याच्या दरात वाहतूक खर्चही वसूल होईना

- केंद्र सरकारचे निर्यातसंबंधी हस्तक्षेप; धरसोडीचे धोरण कारणीभूत

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT