अनिल जाधव
पुणेः देशातील बाजारात सध्या बाजरीचे दर (Bajara Rate) वाढलेले आहेत. यंदा बाजारीची लागवड वाढली होती. मात्र पावसाने पिकाला फटका बसला. त्यामुळे उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे. त्यातच सध्या बाजारातील आवक (Bajara Arrival) कमी आहे. त्यामुळे बाजारीच्या दरातील तेजी टिकून राहण्याचा अंदाज आहे.
देशात बाजरी उत्पादनात राजस्थान आघाडीवर आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. यंदाच्या खरिपात देशात बाजरी लागवड ७ टक्क्यांनी वाढून ७० लाख हेक्टरवर पोचली होती. यापैकी जवळपास ६५ टक्के लागवड एकट्या राजस्थानमध्ये झाली. यंदा राजस्थानमध्ये ४५ लाख हेक्टरवर बाजरी पीक होते. त्यानंतर उत्तर प्रदेशात यंदा लागवड वाढून १० लाख हेक्टरवर पोचली होती. तर गुजरातमध्ये साडेचार लाख हेक्टर आणि महाराष्ट्रात ४ लाक हेक्टरवर बाजरीचा पेरा झाला.
यंदा बाजरीचा पेरा वाढला खरा, मात्र दुसरीकडे कमी पाऊस आणि अतिपावसाचा पिकाला मोठा फटका बसला. उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये सुरुवातीच्या काळात बाजरी पेरणीस पुरक पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरणीला उशीर झाला. तर गुजरात आणि महाराष्ट्रात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पावसाने पिकाचे नुकसान केले. नोव्हेंबर महिन्यातही अनेक भागात पावसाचा बाजरी पिकाला फटका बसला.
मागील हंगामातील उत्पादन
मागील हंगामात देशातील बाजरी उत्पादन जवळपास १ लाख टनाने घटले होते. मागील हंगामात देशात ६३ लाख हेक्टरवर बाजरीचे पीक होते. त्यामुळे उत्पादन ९ लाख ६७ हजार टनांवर स्थिरावले होते. मात्र यंदा बाजरीची लागवड वाढली. मात्र पिकाचे नुकसान झाल्याने उत्पादनात जास्त वाढ होण्याचा अंदाज नाही.
यंदाचे उत्पादन
केंद्र सरकारने पहिल्या अंदाजात यंदा ९ लाख ७५ हजार टन बाजरी उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला. मात्र व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या मते बाजरीचे उत्पादन सरकारच्या अंदाजपेक्षा कमीच राहील. सध्याच्या बाजारातील कमी आवकेमुळे याचा अनुभवही येत आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
दरात वाढ
सध्या बाजारातील बाजरीची आवकही कमी आहे. त्यामुळे बाजरीच्या दरात सुधारणा झाली. सध्या बाजरीला प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ३ हजार १०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. बाजारीच्या दरातील तेजी टिकून राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.