संग्रामपूर, जि. बुलडाणा ः तालुक्यात सध्या कापूस हंगाम (Cotton Season) जोरावर असून खेडा खरेदीचेही (Kheda Kharedi) पेव फुटलेले आहे. विना परवानगी ही खरेदी होत असून व्यापारी वजन काट्यात खोट करून शेतकऱ्यांना लुटत आहेत. हा प्रकार तालुक्यात सोमवारी (ता. २८) समोर आला असून आदिवासी भागात शेतकऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्याला चपलेने बदडले. याचा व्हिडिओ सोशल मीडियात सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. हे प्रकरण आपसात मिटवण्यात आले आहे.
तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्या असलेल्या लाडणापूर शिवारात शिकदार जामसिंग डुडवा या शेतकऱ्याच्या शेतात ही घटना समोर आल्याचे सांगितले जाते. जागेवरच अकोट बाजाराचा दर देण्याचे आमिष देत हा व्यापारी वजन काट्यात घोळ करून शेतकऱ्यांची फसवणूक करीत होता. शेतकऱ्याने संबंधित वजन काट्याचे निरीक्षण केले असता त्यामध्ये घोळ झालेला दिसून आला.
हा वजनकाटा विशिष्ट ठिकाणी लॉक व्हायचा. त्यामुळे एका क्विंटलमागे साधारणपणे २० किलो अधिक कापूस मोजल्या जात होता. १२ क्विंटल कापसाचे वजन १० क्विंटलच दाखवण्यात आले. यामुळे शेतकऱ्याला शंका आली. तेथून काट्यात केलेल्या घोळाचे बिंग फुटले.
अकोला जिल्ह्यातील अडगाव येथील या व्यापाऱ्याने घटनास्थळावरून पळ काढला होता. मात्र, शेतकऱ्यांनी मापाऱ्यासह इतर हमालांना पकडून ठेवले. व्यापारी घटनास्थळावर परत येईपर्यंत कुणालाही जाऊ दिले नाही. बराच वेळ हे प्रकरण सुरू होते. शेतकरी व व्यापाऱ्यात तडजोड झाल्याने याची पोलिस तक्रार झाली नाही. मात्र, असे प्रकार गावोगावी होत असून शेतकऱ्यांची लुबाडणूक सुरू आहे.
बाजार समितीचे दुर्लक्ष ----
ग्रामीण भागात खेडा खरेदी जोरात सुरू असून या माध्यमातून बाजार समितीचे उत्पन्न सुद्धा बुडत आहे. या खरेदीवर कुणाचेही नियंत्रण नाही. वजनकाटे मापन विभागही झोपेत आहे. कुठेही या विभागाकडून कारवाई केल्या जात नाही. खेड्यांमध्ये व्यापारी शेतकऱ्यांना जागेवरच मोठ्या बाजारातील दर देण्याचे आमिष दाखवत काट्यात लुटत आहेत, हे या प्रकाराने पुन्हा एकदा उघडकीस आणले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.