Cotton Rate : शेतकरी करताहेत कापसाचा साठा

यंदाही गेल्या वर्षीप्रमाणे कापसाला विक्रमी भाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. पुढच्या काही महिन्यांत कापसाला वाढीव दर मिळेल, असे त्यांना वाटतेय.
 Cotton Rate
Cotton RateAgrowon

पुणे ः यंदाही गेल्या वर्षीप्रमाणे कापसाला विक्रमी भाव (Cotton Rate) मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. पुढच्या काही महिन्यांत कापसाला वाढीव दर (Cotton Market) मिळेल, असे त्यांना वाटतेय. त्यामुळे त्यांनी कापूस रोखून (Cotton Stock) धरला आहे. शेतकरी कापसाचा मोठ्या प्रमाणावर साठा करत आहेत. ते टप्प्याटप्प्याने माल बाजारात आणत आहेत. त्यामुळे यंदा उत्पादन (Cotton Production) वाढण्याचा अंदाज जाहीर होऊनही निर्यात मात्र थंडावलेली दिसतेय. बाजारात कापसाची आवक वाढत नसल्याने दर चढे आहेत. त्यामुळे जागतिक बाजारपेठेतील किंमतपातळी विचारात घेता भारतीय कापूस महाग पडतोय. त्यामुळे निर्यात किफायतशीर ठरत नाही.

 Cotton Rate
Cotton Rate: यंदाही कापसाला विक्रमी भाव मिळणार का?

कापूस उत्पादन जास्त राहणार ः सीएआय

यंदा कापूस उत्पादन जास्त राहील. भारतात यंदा ३४४ लाख गाठी उत्पादन होऊन गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पादन १२ टक्के अधिक आहे. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे (सीएआय) अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी सांगितले, की कापसाच्या नवीन पिकाची वेचणी गेल्या महिन्यात सुरू झाली. परंतु शेतकरी माल विकायला उत्सुक नाहीत.

गेल्या वर्षीप्रमाणे कापसाला जादा भाव मिळेल, या आशेने त्यांनी माल साठवून ठेवलाय. शेतकऱ्यांना गेल्या हंगामात विक्रमी भाव मिळाला. परंतु यंदा तसा भाव मिळण्याची स्थिती नाही. देशातील कापूस उत्पादनात वाढ झाली असून, जागतिक बाजारपेठेत भाव खाली आले आहेत. जूनमध्ये कापसाला उच्चांकी दर मिळाला होता. त्या वेळी जागतिक बाजारपेठेतही दर चढे होते. परंतु आता जूनच्या तुलनेत देशात कापसाच्या दरात ४० टक्के घट झाली आहे. ऑक्टोबर ते जानेवारी या चार महिन्यांत भारतातील एकूण निर्यातीपैकी ६० ते ७० टक्के कापूस निर्यात होतो. पण यंदा परिस्थिती वेगळी आहे.

 Cotton Rate
Cotton Rate : कापसाचे दर वाढणार ?

विश्‍लेषक म्हणतात

‘सीएआय’ने उत्पादन वाढीचा अंदाज दिला आहे, परंतु बाजारात सध्या सरासरीच्या तुलनेत एक तृतीयांश आवक येत असल्याचे बाजारातील सूत्रांनी सांगितले. गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी १० हजार ते १५ हजार रुपयांना कापूस विकलाय. सध्या ९ हजार रुपये भाव मिळतोय. त्यामुळे शेतकरी कापूस विकत नाहीत.

परंतु यंदा कापसात गेल्या वर्षीइतकी तेजी येण्याची शक्यता दिसत नाही. ‘गेल्या वर्षी आम्ही कापूस ८ हजार रुपये क्विंटलने विकला आणि नंतर मात्र भाव १३ हजार रुपयांवर गेला,’ असे गुजरातमधील शेतकरी बाबूलाल पटेल म्हणाले. यंदा मात्र आम्ही ती चूक पुन्हा करणार नाही. आम्ही १० हजारांच्या खाली कापूस विकणार नाही, असे त्यांनी सांगितले.

यंदा २५ लाख गाठी निर्यातीचा अंदाज

इंडियन कॉटन फेडरेशनचे सचिव निशांत अशीर यांनी सांगितले, की जगभरात वस्त्रोद्योग क्षेत्रात मंदीचे वातावरण असल्याने कापसाला मागणी घटली आहे. भारतातून निर्यात होणाऱ्या कापसापैकी ५० टक्के कापूस बांगलादेशला जातो. इतर खरेदीदार देशांमध्ये चीन, व्हिएतनाम, थायलंड आणि इंडोनेशिया यांचा समावेश होतो. बांगलादेश संकटाचा सामना करत असून, तेथून कापसाला मागणी येत नाही. तसेच तेथे पश्‍चिम आफ्रिका किंवा अमेरिकेतून तुलनेने स्वस्तात कापूस उपलब्ध होत आहे. भारतीय कापसाचा सध्याचा दर पाहता यंदाच्या हंगामात कापूस निर्यात फक्त २५ लाख गाठी राहण्याचा अंदाज आहे, असे अशीर म्हणाले.

निर्यातदार म्हणतात...

‘सीएआय’च्या अंदाजानुसार यंदा कापूस निर्यातीत ३० टक्के घट होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी ४३ लाख गाठी कापूस निर्यात झाला होता. मात्र कापूस निर्यायीत एवढी घट होणार नाही. निर्यात किमान गेल्या वर्षीइतकी तरी राहील किंवा किंचित जास्तच राहील. यंदा निर्यात ४५ ते ४८ लाख गाठी होईल.

गुजरात, महाराष्ट्रात कापूस स्थिती चांगली

निर्यातदारांच्या सर्वेक्षणानुसार गुजरात आणि महाराष्ट्रात कापसाची स्थिती चांगली आहे. शेतकऱ्यांनी यंदा माल मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवलाय. दरवाढीच्या अपेक्षेने ते माल टप्प्याटप्प्याने बाजारात आणतायत आणि त्यामुळेच किमतीवर आवकेचा दबाव दिसून येत नाही.

डिसेंबरपासून आवक वाढणार

काही व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरातमध्ये निवडणुका संपल्यानंतर डिसेंबरपासून कापसाची आवक वाढायला सुरुवात होईल. तर महाराष्ट्र आणि तेलंगणात येत्या काही दिवसांत आवक वाढेल.

७० हजार गाठी निर्यातीसाठी करार

डीलरच्या माहितीनुसार यंदाच्या हंगामात व्यापाऱ्यांनी आतापर्यंत ७० हजार गाठी कापूस निर्यातीसाठी करार केले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत पाच लाख गाठींहून अधिक कापूस निर्यातीसाठी करार झाले होते. यावरून यंदाच्या हंगामातली कापूस निर्यातीतील घसरण दिसून येते. स्थानिक बाजारातील कापसाचे दर कमी होण्याबरोबरच जागतिक बाजारपेठेतील किमती वाढत नाहीत तोपर्यंत निर्यातीला वेग येणार नाही.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com