Nashik News: मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अक्षय तृतीयेच्या बाजारासाठी आंब्याची आवक वाढल्याचे चित्र आहे. यंदा मागणीही टिकून असल्याने दरही स्थिर आहेत. विविध प्रकारचे आंबे बाजारात दाखल झाले आहेत. आमरसासाठी मागणी असल्याने खरेदीसाठी ग्राहकांची नाशिक शहराच्या विविध भागांतील बाजारांत गर्दी दिसून आली.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेठ रोडवरील फळबाजार आवारात कोकणसह, कर्नाटक, गुजरात व आंध्र प्रदेशातून आंब्याची आवक झाली. मागील वर्षी आवक कमी असल्याने दरात सुधारणा दिसून आली होती; मात्र यंदा आवक वाढल्याने मागणीमुळे दर स्थिर आहेत. गोड व आकर्षक आंब्यांना ग्राहकांकडून विशेष मागणी आहे.
अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर १५ एप्रिलपासून आंब्याची आवक टप्प्याटप्प्याने वाढली आहे. गेल्या चार दिवसांत शनिवारी (ता. २६) ६७१, रविवारी (ता. २७) ७०९, सोमवारी (ता. २८) ६४५ क्विंटल आवक झाली. त्यामध्ये हापूस आंब्याला मागणी असल्याने दर सर्वाधिक होते.
बाजार समितीत आंबा महोत्सव
अक्षय तृतीयेच्या निमित्ताने पेठ रोडवरील शरदचंद्रजी पवार बाजार आवारात तीनदिवसीय आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. येथे आंबा घेण्यासाठी गर्दी पाहायला मिळाली. येथे जुनागढ केशर, रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, बंगलोर लालबाग, विजयवाडा बदाम, आम्रपाली गुजरात, हैदराबाद मलिका अशा वाणांचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध होते. यामध्ये कोकणच्या हापूस आंब्यासह केसर आंब्याला ग्राहकांकडून मागणी असल्याचे दिसून आले.
नाशिकमधील दर स्थिती (रुपयांत)
आंबा प्रकार...घाऊक दर...किरकोळ दर :
हापूस...१५० ते १७०....२०० ते २५०
केसर...१०० ते १५०...१३० ते २००
बदाम...७० ते ८०...१०० ते १२०
लालबाग...८० ते १००...१०० ते १४०
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याची आवक वाढली आहे. ग्राहक नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्याची मागणी करत आहेत. त्यानुसार यंदा मालाची उपलब्धता केली आहे.भारत नोटवाणी, फळ विक्रेते, नाशिक
यंदा दरवर्षीच्या तुलनेत हापूस आंब्याची उपलब्धता कमी आहे. तर गुजरातमधून केसर, कर्नाटकचा आंबा, बदाम व केसर या आंब्याची आवक वाढलेली आहे. उन्हाचा चटका असल्याने विक्रीवर थोडा परिणाम आहे.विज्ञान रोडगे, आंबा व्यापारी, नाशिक बाजार समिती, फळबाजार आवार
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.