Kolhapur News : देशाच्या साखर उत्पादनात महाराष्ट्र व उत्तर प्रदेशात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. नोव्हेंबरअखेर १७२ लाख टन ऊस गाळप करून १३.५० लाख टन नवे साखर उत्पादन घेऊन महाराष्ट्राने देशभरात आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशातील ११० कारखान्यांनी १४४ लाख टन ऊस गाळप करून १३ लाख टन नवे साखर उत्पादन घेतले आहे.
दोन्ही राज्यांच्या उत्पादनातील फरक केवळ ५० हजार टनांचा आहे. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या कर्नाटक राज्यातील ७३ कारखान्यांनी १३० लाख टन ऊस गाळप करून ११ लाख टनांचे नवे साखर उत्पादन केले आहे.
देशाच्या एकूण साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व कर्नाटकचा वाटा तब्बल ८२ टक्के आहे. उर्वरित १८ टक्के साखर देशातील ११ राज्यांनी एकत्रित मिळून उत्पादित केली आहे. या कालावधीतीत सरासरी साखर उताऱ्यामध्ये उत्तर प्रदेशने ९.०५ टक्के उतारा घेऊन आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ कर्नाटक राज्याचा सरासरी साखर उतारा ८.५० टक्के राहिला. महाराष्ट्राचा मात्र सरासरी साखर उतारा ७.८५ टक्के इतकाच मिळाला आहे.
अर्थात थंडी सुरू झाल्यानंतर साखर उताऱ्यामध्ये वाढ होणे अपेक्षित आहे. ऑक्टोबरमध्ये देशाचा हंगाम सुरू झाला. उत्तर प्रदेशने पहिल्यापासूनच साखर उत्पादनात आघाडी घेतली. महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेशात वातावरण चांगले असल्याने व शेतकरी संघटनांचे आंदोलन नसल्याने सुरुवातीपासूनच ऊस तोडणीस जोरदार सुरुवात झाली. महाराष्ट्रात मात्र शेतकरी संघटनांचे आंदोलन असल्याने प्रमुख ऊस उत्पादक पट्ट्यातील ऊस तोडणी रखडली.
गेल्या हंगामात (२०२२-२३) या कालावधीत राज्यात १०४ साखर कारखान्यांनी १२४.७१ लाख टन उसाचे गाळप करून १०.६० लाख टन साखरेचे उत्पादन केले होते. यंदाच्या गळीत हंगामात राज्य ऊस गाळप आणि साखर उत्पादनात पुढे आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षी या कालावधीत १८८ साखर कारखाने सुरू होते. यंदा १७२ कारखान्यांनी हंगाम सुरू केला आहे. २२६ लाख टन ऊस गाळप करून ९ लाख टन साखर तयार केली होती. यंदा ८ लाख टन साखर तयार झाली आहे.
महाराष्ट्राची पिछाडी शक्य
सध्या महाराष्ट्रात अवकाळी पाऊस सुरू आहे. यामुळे गेल्या आठवड्यापासून गाळप अत्यंत धीम्या गतीने होत आहे. यातच उत्पादनही कमी आहे. थंडीचे प्रमाण कमी राहिले आणि अवकाळी पाऊस आणखी काही दिवस झाला तर येत्या पंधरवड्यात महाराष्ट्र देशाच्या साखर उत्पादनात उत्तर प्रदेशपेक्षा पिछाडीवर पडण्याची शक्यता आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.