Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : कापूस सोयाबीनच्या वाटेवर ?

Cotton Rate Update : एकंदर सोयाबीनसारखी तेजी कापसात येण्यासाठी लागणारे सर्व घटक सज्ज आहेत. देशातील उत्पादनात घट, भक्कम मागणी, बांगलादेशमध्ये वस्त्रोद्योग कामगारांचा संप आदी घटत कापसाच्या दरवाढीसाठी अनुकूल आहेत.

श्रीकांत कुवळेकर

Cotton Rate : मागील आठवड्यात आपण या स्तंभातून सोयाबीनमध्ये आलेल्या वेगवान तेजीची कारणमीमांसा केली होती. तसेच ही तेजी कितपत टिकाऊ राहील आणि येत्या काळात या बाजारात कोणती आव्हाने येऊ शकतील याविषयी चर्चा केली होती.

सोयाबीनमध्ये तुलनेने समाधानकारक परिस्थिती असली तरी कापूस या दुसऱ्या महत्त्वाच्या पिकाबाबत अजूनही संभ्रमाचे चित्र आहे. मात्र बाजारातील अलीकडील घटना पाहता सोयाबीन प्रमाणेच कापूस देखील तेजीत येऊ शकेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या घटनांची दखल घेणे क्रमप्राप्त आहे.

उत्पादन अनुमाने

एक तर कमी पावसामुळे देशभरात गुजरात वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात कापसाचे क्षेत्र प्रभावित झाले होते. मात्र नेमके किती क्षेत्र संपूर्ण बाद झाले, किती क्षेत्रावर पीक अर्धेच आले इत्यादीबाबत खात्रीशीर माहिती अजूनही निश्चित झालेली नाही. उताऱ्याचे देखील असेच आहे. त्यामुळे पीक उत्पादन अनुमाने ही सरसकट केली जात आहेत.

यामध्ये कृषी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पहिल्या अनुमानामध्ये कापूस उत्पादन ३१.६ दशलक्ष गाठी दाखवले आहे. मागील वर्षापेक्षा ते २० लाख गाठी कमी आहे. सरकारी कल हा साधारणपणे सुरवातीला चांगले उत्पादन परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या अनुमानामध्ये थोडे कमी उत्पादन सांगण्याचा असतो. त्यामुळे एप्रिल-मे पर्यंत उत्पादन अंदाजात आणखी घट होऊ शकते.

त्यानंतर बाजारावर बऱ्यापैकी प्रभाव टाकणाऱ्या कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय)चे यंदाच्या हंगामासाठी (२०२३-२४) दुसरे अनुमान प्रसिद्ध झाले आहे. ऑक्टोबर महिन्याच्या या अनुमानामध्ये उत्पादन २९.४१ दशलक्ष गाठी दाखवण्यात आले आहे. हंगामाचे पहिले अनुमानच मुळी मागील वर्षाच्या ३१.१६ दशलक्ष गाठीवरुन २९.५१ दशलक्ष गाठी एवढे घटवणाऱ्या सीएआयने एक लाख गाठीने का होईना परंतु उत्पादन अनुमान सलग दुसऱ्यांदा घटवल्याने बाजारातील सेंटिमेंट निश्चित बदलले आहे.

चांगल्या दर्जाच्या कापसाचे भाव प्रति क्विंटल ३०० ते ४०० रुपयांनी वधारले आहेत. सरकीचे भाव देखील बऱ्यापैकी वाढले असून दोन्ही वस्तूंमध्ये स्टॉकिस्ट सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहेत. बाजारात स्टॉकिस्ट खरेदी करतात तेव्हा बाजारातील किमतीने तळ गाठल्याचे मानले जाते.

सोयाबीनमध्ये देखील ऑक्टोबरमध्ये असे दिसून आले होते. याबाबत आपण या स्तंभातून लिहिले होते. त्यामुळे सोयाबीन नंतर आता कापसात देखील एक माफक तेजी येण्याचे संकेत मिळत आहेत. माफक अशासाठी की मागील हंगामातला साठवणूक केलेला कापूस या तेजीमध्ये बाजारात आल्यास त्या प्रमाणात किमतीवर दबाव निर्माण होऊ शकतो.

बांगलादेशातील कामगारांचा संप

कापूस बाजारात सुधारणा होण्याचे अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे आपला शेजारी देश असलेल्या बांगलादेशमध्ये बऱ्याच काळापासून चालू असलेले कामगारांचे आंदोलन. बांगलादेश हा जगातील सर्वात मोठा कापूस आयातदार देश आहे. तसेच वस्त्रोद्योगातील जगातील सर्वोत्तम ब्रॅंडसमध्ये बांगलादेशचे योगदान असतेच असते. त्यानंतर व्हिएतनाम, भारत आणि इंडोनेशिया हे क्रमाने येतात.

त्यामुळे कापूस, सूत, तयार कपडे आणि निर्यात सुविधा या सर्व सोयी बंदराजवळ एकात्मिक पद्धतीने विकसित करून बांगलादेशने जगात नावलौकिक मिळवला आहे. तेथील वस्त्रोद्योगात कामगारांचे पगार दर पाच वर्षांनी वाढवले जातात. परंतु २०१८ नंतर ते अजून वाढलेले नाहीत. प्रचंड महागाईच्या पार्श्वभूमीवर उद्योगाकडून देण्यात आलेली पगारवाढ तुटपुंजी असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.

कामगार ती पगारवाढ स्वीकारण्याच्या मनःस्थितीत नाहीत. त्यामुळे हा तिढा अजून सुटलेला नसल्याने अनेक कंपन्यांत काम ठप्प झाले आहे. याचा फायदा अर्थातच सर्वात जवळचा स्पर्धक देश म्हणून भारताला होणार आहे. या घटनेमुळे भारतातील वस्त्रोद्योग कंपन्यांचे शेअर्स देखील चांगलेच वधारल्याचे मागील दोन आठवड्यात दिसून आले आहे.

बांगलादेशात आता सार्वत्रिक निवडणुकीचे वारे वाहत आहेत. वस्त्रोद्योग क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचा मुद्दा देखील संपाशी जोडला गेला आहे. त्यामुळे त्यात आंतरराष्ट्रीय संस्थांचा वेगवेगळ्या प्रकारचा दबाव निर्माण केला जात आहे. त्यामुळे वस्त्रोद्योग कर्मचाऱ्यांचे संपाचे प्रकरण एवढ्यात संपणार नाही.

शिवाय कालांतराने कर्मचाऱ्यांचे पगार तिप्पट करण्याची मागणी मान्य झाली तर बांगलादेशाची आंतरराष्ट्रीय बाजारातील स्पर्धाक्षमता कमी होऊन त्याचा अप्रत्यक्ष फायदा भारताला होऊ शकेल. अर्थात सध्या जरी या जरतर च्या गोष्टी असल्या तरी बाजारावर त्याची आधीच सावली पडत असते. म्हणूनच भारतीय शेअर बाजारात वस्त्रोद्योग कंपन्यांना मागणी वाढली आहे.

आयसीएसी परिषद

इंटरनॅशनल कॉटन अॅडव्हायझरी कमिटी (आयसीएसी) या नामांकित संस्थेची ८१वी वार्षिक परिषद मुंबईत पुढील आठवड्यात २ ते ५ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या दरम्यान भारताच्या कस्तुरी या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत ब्रॅंडचे प्रमोशन अधिकृतपणे सुरू केले जाईल. तसेच कापूस पिकासमोर असलेली आव्हाने, कापसावर आधारित उद्योग यांच्या विकासासाठी नावीन्यपूर्ण कार्यक्रम, पायाभूत सुविधा याबाबत काही घोषणा होतील. तसेच या क्षेत्रासाठी संबंधित अनेक विषयांवर या परिषदेत चर्चा होईल.

एकंदर सोयाबीनसारखी तेजी कापसात येण्यासाठी लागणारे सर्व घटक सज्ज आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला सध्या एक गोष्ट काळजीची आहे. ती म्हणजे आपला दूसरा पश्चिमेकडील शेजारी पाकिस्तानात कापसाचे आलेले अमाप पीक. मागील वर्षाच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये कापूस उत्पादन दुपटीहून अधिक झाले आहे. त्यामुळे तेथील बाजारात आत्तापर्यंत साडेसात दशलक्ष गाठी कापूस आला आहे.

मागील वर्षी याच कालावधीत आवक जवळपास तीन दशलक्ष गाठी होता. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानी कापूस मोठ्या डिस्काऊंटमध्ये विकला जात असल्यामुळे देखील भारतातील कापसाला अप्रत्यक्ष स्पर्धा निर्माण होत आहे.

पाकिस्तानी कापूस पुरवठा जसजसा कमी होईल तेव्हा भारतीय कापसाच्या किमती अधिक सुधारण्यास मदत होईल. या सर्व गोष्टींचा विचार केल्यास आपल्याकडील कापूस काही काळासाठी साठवणूक करून ठेवल्यास बाजारातील पुरवठा कमी होऊन किमती ७ ते १० टक्क्यांपर्यंत वाढण्यास मदत होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 : आदिती तटकरेंचा विजय निश्चित; कोकणातील पहिला निकाल स्पष्ट

Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 : लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Poultry Processing Product : अबब! कडकनाथच्या अंड्यांपासून एवढी उत्पादने?

SCROLL FOR NEXT