Commodity Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Commodity Market : मका, हळद, तूर, हरभऱ्याच्या किमतींत वाढ

डॉ.अरूण कुलकर्णी

फ्यूचर्स किमती ः सप्ताह ५ ते ११ ऑगस्ट २०२३

हळदीच्या किमतीतील तेजी याही सप्ताहात कायम राहिली आहे. हळदीच्या स्पॉट व फ्यूचर्स किमतींमध्ये बराच मोठा फरक आहे. त्यामुळे फ्यूचर्स मार्केटमध्ये विकणे अजूनही किफायतशीर आहे. हेजिंगसाठी सुद्धा खूप चांगली संधी आहे. मका, हळद, तूर, हरभरा, कांदा व टोमॅटो यांच्या किमती वाढत आहेत.

SEBI ने २१ जुलै पासून हळदीवरील मार्जिन २ टक्क्यांनी वाढवले आहे. पण त्याचा परिणाम या सप्ताहातील किमतीवर दिसला नाही.

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार ११ ऑगस्टपर्यंत खरीप पिकांखालील क्षेत्रात गेल्या वर्षाच्या तुलनेने वाढ झाली आहे. सोयाबीन व मक्याखालील क्षेत्रात अनुक्रमे १ व २ टक्क्यांनी वाढले आहे. कापूस, मूग व तूर यांच्या क्षेत्रात मात्र अनुक्रमे १, ३ व ५ टक्क्यांनी घट झालेली आहे. सोयाबीनच्या किमती भारतातील उत्पादन, सोयतेल व सोयपेंड यांच्या किमती व सोयाबीन व इतर खाद्य तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींवर अवलंबून असतात.

अमेरिकेतील शेतकी खात्याने १० तारखेला प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार भारतातील या वर्षीचे सोयाबीन उत्पादन गेल्या वर्षीइतकेच असेल.

मात्र जागतिक उत्पादन जवळ जवळ ९ टक्क्याने वाढेल. वर्षअखेरचा जागतिक साठासुद्धा १५ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय किमती वाढण्याची शक्यता कमी आहे. या सप्ताहात मका, सोयाबीन व टोमॅटो वगळता इतर पिकांच्या स्पॉट किमती वाढल्या. कांद्याचे भाव प्रकर्षाने वाढले.

११ ऑगस्ट रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात १.४ टक्क्याने वाढून रु. ५८,९४० वर आले होते. या सप्ताहात ते २.४ टक्क्यांनी वाढून रु. ६०,४२० वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स भाव रु. ५९,५४० वर आले आहेत. जानेवारी फ्यूचर्स रु. ५८,५०० वर आले आहेत. ते सध्याच्या स्पॉट भावापेक्षा ३.२ टक्क्यांनी कमी आहेत. कापसाचे भाव वाढण्याचा कल आहे. आवक कमी होत आहे.

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) गेल्या सप्ताहात रु. १,४६७ वर आले होते. या सप्ताहात ते ३.३ टक्क्यांनी वाढून रु. १,५१५ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,५२० वर आले आहेत. एप्रिल फ्यूचर्स रु. १,५६७ वर आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ३.४ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत. कपाशीचे फ्यूचर्स भाव हमीभावापेक्षा अधिक आहेत.

मका

NCDEX मधील रबी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) गेल्या सप्ताहात रु. २,१०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.५ टक्क्याने घसरून रु. २,०९० वर आल्या आहेत. फ्यूचर्स (सप्टेंबर डिलिव्हरी) किमती रु. २,०१७ वर आल्या आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स किमती रु. २,१३१ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २ टक्क्यांनी अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहे.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती गेल्या सप्ताहात १०.३ टक्क्यांनी वाढून रु. १४,२३४ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा २.३ टक्क्यांनी वाढून रु. १४,५५५ वर आल्या आहेत. ऑक्टोबर फ्यूचर्स किमतीसुद्धा ३.६ टक्क्यांनी वाढून रु. १६,९०४ वर आल्या आहेत. डिसेंबर फ्यूचर्स किमती रु. १७,९१८ वर आल्या आहेत; स्पॉट भावापेक्षा त्या २३.१ टक्क्यांनी जास्त आहेत. ही वाढ निश्‍चित सट्टेबाजीमुळे निर्माण झालेली आहे; मात्र फ्यूचर्स विक्रीसाठी त्याचा फायदा करून घेता येईल.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात २.४ टक्क्यांनी वाढून रु. ५,४२५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुनः १.८ टक्क्याने वाढून रु. ५,५२५ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे. गेल्या तीन महिन्यांत हरभऱ्याचे भाव वाढत आहेत.

मूग

मुगाची स्पॉट किमत (मेरटा) गेल्या सप्ताहात १.३ टक्क्याने वाढून रु. ७,७०० वर आली होती. या सप्ताहात ती ०.३ टक्क्याने वाढून रु. ७,७२५ वर आली आहे. मुगाची आवक गेल्या काही सप्ताहात वाढत होती; आता ती घसरू लागली आहे. गेल्या हंगामापेक्षा या वर्षी ती कमी झाली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ आहे.

सोयाबीन

गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) रु. ५,२०२ वर आली होती. या सप्ताहात ती १ टक्क्याने कमी होऊन रु. ५,१५१ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात १.३ टक्क्याने वाढून रु. ९,४६७ वर आली होती. या सप्ताहात ती २.२ टक्क्यांनी वाढून रु. ९,६७५ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,००० आहे. तुरीच्या भावात अजूनही तेजी आहे. आवक कमी आहे. पुढील वर्षाचे उत्पादन अनिश्‍चित आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT