
Turmeric Price Update : टोमॅटोनंतर सध्या माध्यमांमध्ये चर्चा आहे ती हळदीची. हळदीच्या भावाने ३५ हजारांचा टप्पा गाठल्याच्या बातम्या आता फिरत आहेत. हळद उत्पादक लखपती झाल्याची चर्चा आता जोर धरू लागली. पण दुसरीकडं शेतकऱ्यांना विचारलं तर वेगळचं चित्र दिसतं. बाजारातील केवळ कमाल भावाची चर्चा होते. पण कमाल भाव कमी मालाला मिळतो. तर सरासरी भाव जास्त मालाला मिळत असतो. त्यामुळे सरासरी दरावर बाजाराचा विचार व्हावा, असे जाणकारांनी सांगितले.
मागील आठवड्यापासून हळदीच्या भावाची जोरदार चर्चा सुरु आहे. मागील महिन्यात टोमॅटोचा भाव चर्चेत होता. त्याची जागा ऑगस्ट महिन्यात हळदीने घेतल्याचं दिसतं. त्यात हिंगोली जिल्ह्यातील वसमत मार्केट प्रकाश झोतात आले. वसमत बाजारात हळदीला प्रतिक्विंटल ३० हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला होता. हा भाव आतापर्यंत सेलम वाणाच्या हळदीला मिळालेला विक्रमी होता. पण हा विक्रम पाचच दिवसांत मोडीत निघाला. आता सेलम हळदीचा विक्रमी भाव ३५ हजार रुपये आहे. शुक्रवारी हा भाव मिळाला. हळदीचा हा भाव माध्यमांनी डोक्यावर घेतला आणि चर्चेला उधाण आलं.
पण ही चर्चा वरवरची दिसते. हळदीचे भाव देताना केवळ कमाल म्हणजेच दिवसभरात जास्तीत जास्त मिळालेल्या भावाचीच चर्चा आहे. हा भाव किती मालाला मिळाला? या मालाचे पैसे लगेच मिळाले का? इतर मालाला काय भाव मिळाला? याची माहिती दिली जात नाही. आपण हळद बाजाराची सर्व अंगाने माहिती घेतली तर लक्षात येईल की सध्याची चर्चा एकांगी दिसते.
वसमत बाजारात मिळालेला ३५ हजारांचा भाव केवळ १० क्विंटलच्या एका लाॅटला मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. याच बाजारातील सरासरी भाव १५ हजार ते १७ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान होते. म्हणजेच कमाल भावापेक्षा सरासरी भाव निम्म्यापेक्षा कमीच आहेत. तर किमान भाव सरासरी भावापेक्षा कमी दिसतो. त्यामुळे कोणत्याही मालाच्या सरासरी भावावर चर्चा केल्यास बाजारातील खरी स्थिती कळण्यास मदत होते.
यंदा शेतकऱ्यांनी लागवडी कमी केल्याचे दिसते. त्यातच जून महिन्यात पावसाने हळद उत्पादक भागांमध्ये दडी दिली. लागवडीयोग्य पाऊस नसल्याने लागवडी खोळंबल्या होत्या. महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांमध्ये लागवड यंदा उशीरा सुरु झाल्या. या सर्व कारणांनी देशातील हळद लागवड यंदा १५ ते २० टक्क्यांनी कमी झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. निर्यातही यंदा जवळपास २५ ते ३० टक्क्यांनी वाढली आहे. यामुळे हळदीच्या दराला आधार मिळाला.
देशातील घटलेले उत्पादन आणि वाढलेली निर्यात यामुळे हळदीच्या भावात चांगलीच वाढ झाली. हळदीचे भाव सध्या बाजारात १४ हजार ते १५ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहेत. तर वायद्यांमध्ये हळदीने १८ हजारांचा टप्पा गाठला. डिसेंबरचे वायदे १८ हजार ३८८ रुपयांवर पोचले होते. यंदाची हळदीची कमी झालेली लागवड आणि कमी पाऊसमानाचा अंदाज यामुळे दळदीच्या दरातील तेजी कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.