Ahilyanagar News: यंदा राज्यातील विविध भागांत रब्बी हंगामातील पेरण्यांना महिनाभर उशीर होत असल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्यात सलग पंधरा ते वीस दिवस पाऊस झाल्यामुळे जमिनीची पाणी धारण क्षमता संपली. त्यामुळे जमिनीत साचलेले पाणी मुरत नसल्याने वाफसा स्थिती आलेली नाही. त्याचा परिणाम रब्बीच्या पेरण्यांवर होऊ लागला आहे..राज्यात साधारण सप्टेंबर महिन्यापासूनच रब्बीच्या पेरण्यांना सुरुवात होते. काही भागांत ऑगस्ट महिन्यातच (गोकुळ अष्टमीपासून) रब्बी ज्वारी पेरली जाते. यंदा मात्र ऑक्टोबर संपत आला तरी बहुतांश भागांत रब्बीच्या पेरण्यांना मुहूर्त लागलेला नाही. तुरळक ठिकाणी अल्प क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत..Rabi Season: रब्बी हंगामात संवर्धित शेती पद्धती फायद्याची.यंदा राज्यात अनेक ठिकाणी सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली. पुरामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे जमिनीची पाणी धारण क्षमता संपली. त्यामुळे पाणी मुरत नसल्याने जमिनी चिबडल्या आहेत. प्रामुख्याने अहिल्यानगर, बीड, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, लातूर, धाराशिव, पुणे, सांगली, नाशिकसह खानदेश व विदर्भातील काही भागांत हे चित्र दिसते. पाऊस संपून महिना झाला तरी अजूनही बहुतांश भागात जमिनीत पाणी साचलेले आहे. त्यामुळे रब्बीच्या पेरण्या रखडल्या आहेत..राज्यात रब्बीचे सरासरी ५४ लाख हेक्टर क्षेत्र असते. त्यात ज्वारी व हरभरा ही प्रमुख पिके आहेत. त्याशिवाय गहू, मका, करडई ही पिके घेतली जातात. राज्यात गेल्या काही वर्षांपासून ज्वारीचे क्षेत्र घटत आहे. गेल्या वर्षी साधारण १२ लाख हेक्टरवर ज्वारीचा पेरा झाला. प्रामुख्याने सोलापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलडाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ज्वारीची लागवड होते. ज्वारीची पेरणी साधारणपणे १५ सप्टेंबर ते १५ आक्टोबर कालावधीत होत असते. उशिराचा पेरा आक्टोबर अखेर होतो. यंदा मात्र अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागांत ज्वारीची पेरणी अद्याप सुरूच झालेली नाही..Rabi Season: रब्बी हंगामासाठी पाऊस लाभदायक.हरभऱ्याचे राज्यातील सरासरी क्षेत्र सुमारे २१ लाख हेक्टर आहे. गेल्या वर्षी २७ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. हरभरा, गहू आणि मक्याची पेरणी १ नोव्हेंबरपासून १५ डिसेंबरपर्यंत होत असते. यंदा पेरणीला उशीर होण्याची चिन्हे आहेत..हरभरा, मका, गव्हाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाजसप्टेंबर महिन्यातअतिवृष्टी होण्यापूर्वीच राज्यातील बहुतांश जिल्ह्यांतील धरणे, जलाशये भरलेली होती. यंदा बहुतांश भागांत पाण्याची उपलब्धता बऱ्यापैकी आहे. त्यामुळे रब्बी हंगामात हरभरा, मका आणि गव्हाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. रब्बीचे लागवड क्षेत्र एकूण १० लाख हेक्टरने वाढण्याचा अंदाज गृहीत धरून कृषी विभागाने नियोजन केल्याचे सांगण्यात आले..सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने रब्बीतील ज्वारीसारख्या पिकाच्या पेरणीला उशीर होत आहे. याशिवाय रब्बीतील इतर पिके उशिरा पेरली जाण्याची शक्यता दिसते. पेरणी सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्या-त्या कालावधीतील पिकांविषयी नियोजन करावे लागणार आहे.सुधीर शिंदे, कृषी विकास अधिकारी, अहिल्यानगर..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.