Soybean Price Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Prices : सोयाबीन भावाचा तिढा कसा सुटेल?

Anil Jadhao 

Agriculture Commodity Prices : जागतिक सोयाबीन उत्पादनाचा विचार केला तर ब्राझील पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर अमेरिका आणि ब्राझील हे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. चीन चौथ्या, तर भारत ५ व्या आणि पॅराग्वे पाचव्या क्रमांकावर असतो.

देशनिहाय उत्पादनातील वाटा (टक्के)

ब्राझील…३९

अमेरिका…२९

अर्जेंटिना१३

चीन…५

भारत…३

पॅराग्वे३

इतर…८

आपल्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च अवास्तव आहे का?

जागतिक पातळीवर पिकांचा उत्पादन खर्च वाढलेला आहे. सोयाबीनचा विचार करता ब्राझील, अमेरिका आणि अर्जेंटिना या देशांमध्ये २०१६ ते २०२३ या काळात उत्पादन खर्च ७ ते ९ टक्क्यांनी वाढलेला आहे. बियाणे, खते आणि इंधनाच्या भावातील वाढीमुळे उत्पादन खर्चामध्ये हा परिणाम दिसून आला. पण भारतात सोयाबीनचा उत्पादन खर्च यापेक्षा जास्त वाढला. कारण सोयाबीन, खते आणि मजुरीच्या दरात वाढ झालेली आहे. थोडक्यात, आपण असे म्हणू शकतो, की जागतिक पातळीवरच सोयाबीनच्या उत्पादन खर्चात वाढ झाली. एका अभ्यासानुसार सोयाबीन उत्पादनात आघाडीवर असलेल्या पहिल्या देशांमध्ये ब्राझीलचा सोयाबीन उत्पादन खर्च जास्त आहे. ब्राझीलमध्ये प्रतिहेक्टरी उत्पादन खर्च ७८२ डॉलर आहे. अमेरिकेमध्ये ६६५ डॉलर आणि अर्जेंटिनात ३५१ डॉलर आहे.

भारतातील शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाचा विचार करता सुरुवातीपासून नांगरटीपासून ते मळणीपर्यंत प्रति हेक्टरी ४० हजार रुपये खर्च येतो. काही शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च यापेक्षा कमी किंवा जास्तही असू शकतो. पण सरासरी आपण प्रति हेक्टरी ४० हजार पकडला आणि डॉलरमध्ये याचा हिशोब मांडला तर ४७७ डॉलर प्रतिहेक्टर असा येतो. तसेच आपण ब्राझीलचा उत्पादनखर्च रुपयात काढला, तर जवळपास ६६ हजार प्रतिहेक्टर येतो. अमेरिकेतील उत्पादन खर्च ५६ हजार रुपये प्रति हेक्टरी येतो. अर्जेंटिनाचा उत्पादन खर्च जवळपास ३० हजार रुपये प्रति हेक्टरी येतो. म्हणजेच जगातील सोयाबीन उत्पादनात आघाडीच्या तीन देशांशी तुलना केली तर भारतातील सोयाबीनचा उत्पादन खर्च ब्राझील आणि अमेरिकेतील उत्पादन खर्चापेक्षा कमी आहे. अर्जेंटिनातील उत्पादन खर्चापेक्षा जास्त आहे. म्हणजेच भारतीय शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च अवास्तव आहे किंवा खूपच जास्त आहे, असे म्हणणे संयुक्तिक ठरणार नाही. कारण आपल्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च ब्राझील आणि अमेरिकेतील शेतकऱ्यांच्या तुलनेत कमी आहे.

देशनिहाय सोयाबीनचा हेक्टरी उत्पादन खर्च (रुपये)

देश…उत्पादन खर्च

ब्राझील…६६,०००

अमेरिका…५६,०००

भारत…४०,०००

अर्जेंटिना--- ३०,०००

हेक्टरी उत्पादकतेत भारत पिछाडीवर :

भारतातील शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च जगात सर्वाधिक नाही. तीन देशांशी तुलनेत केली तर आपला उत्पादन खर्च फक्त अर्जेंटिनापेक्षा जास्त आहे तर ब्राझील आणि अमेरिकेपेक्षा कमी आहे. मग असे असताना आपल्या शेतकऱ्यांना एका हेक्टर सोयाबीन उत्पादनातून मिळणारे हेक्टरी उत्पन्न म्हणजेच एका हेक्टरमध्ये सोयाबीन पीक घेतल्यानंतर ते पीक विकल्यानंतर हाती आलेला पैसा कमी का आहे? तर त्याचे उत्तर आहे कमी असलेली हेक्टरी उत्पादकता. म्हणजेच या सर्व देशातील शेतकऱ्यांनी एक एक हेक्टरमध्ये सोयाबीन पेरले तर या एक हेक्टरमधून भारतातील शेतकऱ्यांना सर्वांत कमी उत्पादन मिळते. ब्राझील, अमेरिका, अर्जेंटिना, चीन, पॅराग्वे या देशांच्या तुलनेत भारतातील शेतकऱ्यांना खूपच कमी उत्पादन मिळते. किती कमी मिळते? हे आपल्याला पुढच्या आकड्यांवरून लक्षात येईल.

सोयाबीन लागवड आणि उत्पादकता (२०२३ मधील)

लागवड : (लाख हेक्टर) उत्पादकता ः हेक्टरी क्विंटल

देश…लागवड…उत्पादकता

ब्राझील…४५८…३३

अमेरिका…३३३…३४

अर्जेंटिना---१६५…३०

चीन…१०५…२०

पॅराग्वे---३७…२९

भारत…१२४…१०

वरील आकडेवारीवरून असे लक्षात येते, की भारताच्या तुलनेत अमेरिका, ब्राझील आणि अर्जेंटिनाच्या शेतकऱ्यांना एका हेक्टरमधून मिळणारे उत्पादन तीन ते साडेतीन पटीने जास्त आहे. एवढेच नाही तर पॅराग्वे देशातील उत्पादकताही जवळपास तीन पटीने जास्त आहे. चीनमधील शेतकऱ्यांनाही आपल्यापेक्षा दुप्पट उत्पादन मिळते.

उत्पादन खर्चाचा मेळ

महत्त्वाच्या देशातील हेक्टरी उत्पादन आणि उत्पादन खर्च काढल्यानंतर सध्याच्या भावात देशातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित काय आहे? हेही आपल्याला काढता येईल. त्यासाठी आधी सोयाबीनला भाव काय मिळतो हे पाहावे लागेल. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा सरासरी भाव ९.५५ डॉलर प्रति बुशेल्सच्या दरम्यान आहे. रुपयात हा भाव जवळपास २ हजार ९५० रुपये येतो. पण आपण गोळाबेरीज करण्यासाठी ३ हजार रुपये गृहीत धरूयात.

ब्राझील

ब्राझीलमध्ये २०२३ मध्ये म्हणजेच गेल्या हंगामात एका हेक्टरमधून शेतकऱ्यांना सरासरी ३३ क्विंटल सोयाबीन उत्पादन मिळाले. सध्याचा सरासरी भाव ३ हजार रुपये आहे. तर एका हेक्टरमधील सोयाबीन विकून ब्राझीलच्या शेतकऱ्याला ९९ हजार रुपये मिळतील. ब्राझीलमधील शेतकऱ्यांना एका हेक्टरचा उत्पादन खर्च आहे ६६ हजार रुपये. एकूण मिळालेल्या हेक्टरी उत्पन्नातून खर्च वजा केला तर ३३ हजार रुपये उरतात. म्हणजेच ब्राझीलच्या शेतकऱ्यांना उत्पादन खर्च जाऊन हेक्टरी ३३ हजार रुपये उरतात.

अमेरिका

अमेरिकेतील शेतकऱ्यांना २०२३ मध्ये एका हेक्टरमधून ३४ क्विंटल सोयाबीन उत्पादन मिळाले. सध्याचा भाव ३ हजार रुपये गृहीत धरला तर हे सोयाबीन विकून अमेरिकेतील शेतकऱ्यांना एकूण १ लाख २ हजार रुपये मिळतील. तर अमेरिकेतील शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च हेक्टरी ५६ हजार रुपये आहे. सोयाबीन विक्रीतून मिळालेल्या एकूण पैशातून उत्पादन खर्च वजा केला तर अमेरिकेतील शेतकऱ्यांना ४६ हजार रुपये मिळतात. म्हणजेच अमेरिकेतील शेतकऱ्यांनी एका हेक्टरमध्ये सोयाबीन पीक घेतले, तर उत्पादन खर्च जाऊन ४६ हजार रुपये उरतात, असे आपण म्हणू शकतो.

अर्जेंटिना

अर्जेंटिनातील शेतकऱ्यांना एका हेक्टरमधून मागील हंगामात ३० क्विंटल सोयाबीन मिळाले होते. म्हणजेच अमेरिका आणि ब्राझीलपेक्षा कमी उत्पादन राहीले. सध्याचा सरासरी भाव ३ हजार रुपये गृहीत धरला तर हे सोयाबीन विकून अर्जेंटिनातील शेतकऱ्याला एका हेक्टरमधून ९० हजार रुपये मिळतात. तर अर्जेंटिनातील शेतकऱ्याचा हेक्टरी उत्पादन खर्च ३० हजार रुपये आहे. एक हेक्टरमधील सोयाबीनची विक्री करून मिळालेल्या एकूण पैशातून म्हणजेच ९० हजारांतून उत्पादन खर्च ३० हजार रुपये वजा केले, तर ६० हजार रुपये मिळतात. म्हणजेच अर्जेंटिनातील शेतकऱ्यांनी एक हेक्टरमध्ये सोयाबीन पीक घेतले, तर उत्पादन खर्च जाऊन ६० रुपये मिळतात.

भारत

भारतातील शेतकऱ्यांना गेल्या हंगामात एका हेक्टरमधून सरासरी १० क्विंटल सोयाबीन मिळाले. सध्या भारतात सोयाबीनला सरासरी ४ हजारांचा भाव मिळत आहे. भारतातील शेतकऱ्यांनी एका हेक्टरमधून मिळालेले उत्पादन सध्याचे भावात विकले, तर शेतकऱ्यांना ४० हजार रुपये मिळतील. या मिळालेल्या पैशातून उत्पादन खर्च वजा केला तर शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहत नाही. कारण भारतातील शेतकऱ्यांचा हेक्टरी उत्पादन खर्चही ४० हजार रुपये आहे आणि एका हेक्टरमधील १० क्विंटल सोयाबीन विकले, तर मिळणारा पैसाही तेवढाच आहे. म्हणजेच सध्याच्या भावाचा विचार केला तर भारतातले शेतकरी तोट्यात आहेत, असे म्हणायला हरकत नाही.

सोयाबीनचे निव्वळ उत्पन्न सध्याच्या भावात (हेक्टरी रुपये)

ब्राझील…३३,०००

अमेरिका…४६,०००

अर्जेंटिना---६०,०००

भारत…०

म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या भारतापेक्षा तब्बल एक हजाराने भाव कमी असूनही ब्राझील, अमेरिका आणि अर्जेंटिनातील शेतकऱ्यांना उत्पादन खर्च जाऊन पैसा शिल्लक राहतो. विशेषतः ब्राझील आणि अमेरिकेतील शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च भारतातील शेतकऱ्यांच्या तुलनेत जास्त आहे. तरीही ब्राझीलमधील शेतकऱ्यांना ३३ हजार रुपये आणि अमेरिकेतील शेतकऱ्यांना ४६ हजार रुपये जास्त मिळतात. अर्जेंटिनातील शेतकऱ्यांना तर ६० हजार रुपये जास्त मिळतात. भारतातील शेतकऱ्यांना एक हजार रुपये जास्त भाव मिळत असूनही सध्याच्या भावात उत्पादन खर्चाचा मेळ बसतो. म्हणजेच शिल्लक काहीच राहत नाही.

कमी शेती हा मोठा प्रश्‍न

आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा, बाजारातील चढ-उताराचा थेट परिणाम आपल्या सोयाबीनच्या भावावरही होत असतो. आपल्या देशातील सोयाबीनचे उत्पादन, वापर आणि सोयापेंड निर्यात पाहिली तर मागील काही वर्षांत आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा काहीसा अधिक दर मिळालेला दिसतो. पण तरीही एक दोन वर्षे सोडली तर आपल्या शेतकऱ्यांना सोयाबीनचा भाव परवडला नाही. सध्याही परवडत नाही. उत्पादन खर्च वजा केला तर एका हेक्टरमधून मिळणारे उत्पन्न तुटपुंजे आहे. आता ब्राझील, अमेरिका आणि अर्जेंटिनातील शेतकऱ्यांना बाजार पडलेला असतानाही एका हेक्टरमधून खर्च वजा जाता शिल्लक पैसा राहतो. महत्त्वाचे म्हणजे या देशांच्या तुलनेत भारतातील शेतकऱ्यांकडील शेतीचा आकार कमी आहे. अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे.

दोन हेक्टर शेती असलेल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. तर ब्राझील, अमेरिका आणि अर्जेंटिना या देशांमध्ये अशा शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. त्यातही अमेरिका आणि अर्जेंटिनामध्ये शेतकऱ्यांची जमीनधारणा क्षमता जास्त आहे. एका शेतकऱ्याकडे सरासरी १० ते ५० हेक्टर क्षेत्र आहे. म्हणजेच आता अमेरिकेतील शेतकऱ्यांना एका हेक्टरमधील सोयाबीनध्ये ४६ हजार रुपये उरत असतील आणि त्या शेतकऱ्याने १० हेक्टरमध्ये पीक घेतले असेल, तर त्याला ४ लाख ६० हजार आणि ५० हेक्टरवाल्या शेतकऱ्याला २३ लाख रुपये राहतील, हा ढोबळ अंदाज आहे. पण भारतात मुळातच शेतजमीन कमी. समजा सरकारने उद्या ५ हजार रुपये भाव दिला समजू. तर एका हेक्टरधून १० क्विंटल सोयाबीन मिळेल आणि ५ हजारांच्या भावाने ५० हजार होतील. उत्पादन खर्च ४० हजार. शेतकऱ्याला उरतील १० हजार. दोन हेक्टरवाल्याला २० हजार उरतील. तीन हेक्टरवाल्याला ३० हजार उरतील. म्हणजेच जेव्हा आपण भारतीय सोयाबीन उत्पादकांचा विचार करू तेव्हा केवळ आंतरराष्ट्रीय बाजारातील भावाचा विचार करून चालणार नाही. तर आपल्या शेतकऱ्यांची हेक्टरी उत्पादकता, जमीनधारणेचाही विचार करावा लागेल.

उत्पादकता वाढ हाच रास्त पर्याय

आपल्या शेतकऱ्याला ब्राझील, अमेरिका आणि अर्जेंटिनातील शेतकऱ्यांप्रमाणे सोयाबीन पिकातून उत्पादन खर्च जाता किमान हेक्टरी किमान ३० हजार राहावे यासाठी सोयाबीनला किमान ७ हजार रुपये भाव द्यावा लागेल. आता बाजारात नेहमीच ७ हजार रुपये भाव मिळेल, असे होणार नाही. केवळ एक वर्ष शेतकऱ्यांना एवढा भाव मिळाला. त्यानंतर भाव सतत कमी होत गेले. आता तर भाव गेल्या चार वर्षातील नीचांकी पातळीवर पोचले. म्हणजेच बाजारात नेहमीच सात हजार भाव राहणार नाही. मग दुसरा पर्याय उरतो की सरकारने शेतकऱ्यांना वरचे पैसे द्यावेत. म्हणजेच जर बाजारात चार हजार भाव असेल तर उरलेले तीन हजार सरकारने द्यावे. पण सरकार असे करणार नाही. एखाद्यावेळी काही कारणाने सरकार काहीशी मदत करेल पण क्विंटलला ३ हजार रुपये सरकार देईल, अशी अपेक्षाही शेतकरी बाळगणार नाहीत. मग आपल्याही शेतकऱ्यांना हेक्टरी उत्पादनातून अमेरिका, ब्राझील आणि अर्जेंटिनातील शेतकऱ्यांप्रमाणे नफा राहावा, अशी परिस्थिती निर्माण करायची असेल तर त्यासाठी आपल्या शेतकऱ्यांची हेक्टरी उत्पादकता वाढविणे हाच उत्तम मार्ग आहे.

सध्याची उत्पादकता पाहिली तर खूप कमी आहे. मागच्या वर्षी पॅराग्वे देशातील शेतकऱ्यांनी ३९ लाख हेक्टरमधून १०५ लाख क्विंटल सोयाबीन उत्पादन घेतले होते. तर आपल्या भारतातील शेतकऱ्यांनी १२४ लाख हेक्टरमधून १२० लाख क्विंटल उत्पादन घेतले होते. म्हणजेच आपल्यापेक्षा तिपटीने कमी क्षेत्रात लागवड करून आपल्या बरोबरीने उत्पादन घेण्याचा प्रयत्न पॅराग्वे करत आहे. कमी उत्पादकता हीच आपल्या शेतकऱ्यांची मोठी समस्या आहे. त्यामुळे उत्पादकता वाढ हाच एक पर्याय असू शकतो. कारण नेहमीच सरकार बाजारात आपल्या मनाप्रमाणे भाव असणार नाही आणि सरकारही देवू शकणार नाही. कायमस्वरूपी तोडगा काढायचा असेल तर शेतकऱ्यांचे हेक्टरी उत्पादन वाढविणे आवश्यक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Conservation : जलसंधारणासह जयपूरची पर्यावरणात आघाडी

Green Soybean : हिरव्या सोयाबीनचा आहारात वाढवा वापर

World River Day : चला साजरा करूयात नद्यांचा उत्सव

NAFED Issue : नाफेडचा पर्याय शेतकऱ्यांच्या माथी मारू नका

Infestation Rice & Sugarcane : शेतकरी दुहेरी संकटात, भातावर खोड किड तर उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव

SCROLL FOR NEXT