Cotton Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : कापूस उत्पादन २९५ लाख गाठींवर स्थिरावणार

Cotton Production : देशातील कापूस उत्पादन यंदा ८ टक्क्यांनी घटणार आहे. उत्पादन यंदा २९५ लाख गाठींवर स्थिरावेल.

अनिल जाधव

Pune News : देशातील कापूस उत्पादन यंदा ८ टक्क्यांनी घटणार आहे. उत्पादन यंदा २९५ लाख गाठींवर स्थिरावेल. त्यामुळे कापूस आयात जवळपास दुप्पट होऊन २२ लाख गाठींवर पोचेल. त्यातच कापसाचा वापर यंदाही कायम राहील, असा अंदाज काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीएआयने व्यक्त केला. त्यामुळे यंदा कापसाला चांगली मागणी असूनही दरवाढीलाही पुरक स्थिती आहे, असे जाणकारांनी सांगितले.

देशातील कापूस मूल्यसाखळीतील सर्वच घटकांची शिखर संघटना असलेल्या सीएआयच्या अंदाजावरून मागील काही वर्षांपासून टिका होत आहे. नुकत्याच सरलेल्या हंगामात तर सीएआयने सुरुवातील जास्त उत्पादनाचा अंदाज दिला होता. मे महिन्यात उत्पादनात घट होईल असे सांगितले आणि हंगामाच्या शेवटी पुन्हा उत्पादनाचा अंदाज वाढवला होता. त्यामुळे सीएआयच्या अंदाजाविषयीची विश्वासार्हयता कमी झाल्याची टिका होत आहे.

सीएआयने नव्या हंगामात २९५ लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला. एक कापूस गाठ १७० किलो रुईची असते. तर मागील हंगामातील शिल्लक साठा जवळपास २९ लाख गाठींचा आहे. तर यंदा आयात जवळपास ७६ टक्क्यांनी वाढून २२ लाख टनांची होईल. म्हणजेच यंदा एकूण कापूस पुरवठा ३४६ लाख गाठींचा असेल, असे सीएआयने म्हटले आहे. तर देशातील कापूस वापर गेल्यावर्षीऐवढाच म्हणजेच ३११ लाख गाठींचा होईल. तर कापूस निर्यात १४ लाख गाठींवर स्थिरावेल. मागील हंगामातील कापूस निर्यात १५ लाख ५० हजार गाठींची झाली होती.

मागील हंगामात असे बदलले अंदाज (लाख गाठीत)

ऑक्टोबर २०२२ - ३४४

डिसेंबर २०२२ - ३३९.७५

जानेवारी २०२३ - ३३०.५०

फेब्रुवारी २०२३ - ३२१.५०

मार्च २०२३ - ३१३

एप्रिल २०२३ - ३०३

मे २०२३ - २९८.३५

जून २०२३ - ३११.१८

सप्टेंबर २०२३ - ३१८.९०

सीएआयच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह

सीएआयच्या कापूस उत्पादन आणि वापराच्या अंदाजावरून मागील काही वर्षांपासून टिका होत आहे. सीएआय उद्योगांच्या फायद्यासाठी आपल्या अंदाजात बदल करते, अशी टिका केली जाते. खूद्द काही व्यापारी आणि उद्योगही या अंदाजाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. पण या अंदाजाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत असतो. त्यामुळे सीएआयच्या अंदाजाविषयी आताही शाशंकता आहे.

आयात ७६ टक्क्यांनी वाढणार

सीएआयने आपल्या पहिल्या अंदाजातच देशातील कापूस उत्पादन कमी राहून आयात वाढणार, असे स्पष्ट केले. मागील हंगामात देशात १२ लाख ५० हजार गाठी कापूस आयात झाला होता. हीच आयात यंदा २२ लाख गाठींवर पोचणार आहे. म्हणजेच आयातीत तब्बल ७६ टक्क्यांची वाढ होणार आहे. यापुढील काळात कापूस उत्पादनाविषयीचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर आयात वाढेल की स्थिर राहील, हे स्पष्ट होईल.

निर्यात काहिशी घटणार

सीएआयने आपल्या अंदाजात यंदा १४ लाख गाठी कापूस निर्यात होईल असा अंदाज दिला. मागील हंगामात देशातून १५ लाख ५० हजार गाठी कापूस निर्यात झाली होती. पण बाजारातील अभ्यासकांच्या मते, यंदा अमेरिकेतील कापूस उत्पादन घटणार आहे. त्यामुळे शेजारचे देश भारताकडून कापूस खरेदी करू शकतात. असे झाल्यास देशातून होणारी निर्यात वाढेल.

दरवाढीला पुरक स्थिती

यंदा भारताची आयात वाढणार हे आता सीएआयनेही स्पष्ट केले. पण भारताला आंतरराष्ट्रीय बाजारात स्वस्त कापूस मिळण्याची शक्यता नाही. कारण महत्वाच्या अमेरिका आणि चीनमधील कापूस उत्पादन यंदा तब्बल १२ टक्क्यांनी घटणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्यापेक्षा भाव अधिक राहण्याची शक्यता आहे.

कारण चीनची आयात वाढणार आहे. सध्या भारतापेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव जास्त आहेत. चीनची आयात वाढली आणि त्यातच भारतासारखा उत्पादक आणि वापरकर्ता देश आयातीत उतरला तर आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे भाव वाढू शकतात. यामुळे देशातील दरवाढीलाही आधार मिळेल, असे अभ्यासकांनी सांगितले.

यंदा देशातील कापूस उत्पादन घटणार आहे. पण जागतिक पातळीवर सध्या कापडाला मागणी कमी आहे. युध्द आणि काही देशांमधील तणामुळे ही स्थिती निर्माण झाली. त्यामुळे कापसाचे भाव सध्या कमी आहेत. पण जागतिक परिस्थिती पूर्वपदावर आली आणि मागणी वाढली तर दरातही सुधारणा होऊ शकते.
- महेश शारदा, माजी अध्यक्ष, नाॅर्थ इंडिया काॅटन असोसिएशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT