Nagpur News : जागतिकस्तरावर कापसामध्ये मंदी असताना भारतात कापसाच्या दरातील तेजीमागे रुपयाचे सातत्याने होणारे अवमूल्यन असल्याची माहिती कापूस विपणन क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अभ्यासक विजय जावंधिया यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना दिली.
श्री. जावंधिया पुढे म्हणाले, की राज्यात या वर्षी ४२ लाख क्षेत्रावर कापसाची लागवड असून, त्यापासून ४०० लाख क्विंटल कापसाचे उत्पादन अपेक्षित आहे. त्यामुळे कापसातील तेजीमंदीकडे शेतकऱ्यांचे लक्ष्य लागून आहे.
सध्या रुईमध्ये तेजीची शक्यता कमी आहे. सध्या ५८०० ते ६० हजार रुपये खंडी असा रुईचा दर आहे. तर सरकीला ३००० ते ३२०० रुपये क्विंटलचा दर मिळत आहे. त्यातच सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून तेलाचे दर नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत. आयात शुल्कातही त्याकरिता सवलत देण्यात आली आहे. परिणामी, तेलाला भाव नसल्यामुळे सरकीचे दरही दबावात राहतील.
मका बाजारात येणार असल्यामुळे ढेपीची मागणी कमी होईल. या सर्व परिस्थितीचा परिणाम कापसाच्या दरावर होणार आहे. त्यामुळे बाजार स्थिर ठेवण्यासाठी शासकीय हस्तक्षेपाची गरज असून, त्याकरिता शासनाने हमीभावाने खरेदी केंद्र तत्काळ सुरू केले पाहिजे.
‘सीसीआय’कडून यंदाच्या हंगामात ९० केंद्र प्रस्तावित करण्यात आल्याचे सांगितले जाते. बाजारात सीसीआय आणि पणन महासंघाकडून हस्तक्षेप न झाल्यास परिस्थिती आणखी विदारक होऊ शकते. त्यामुळे हमीभावाने खरेदीचा निर्णय तत्काळ होण्याची गरज असल्याचेही जावंधिया यांनी सांगितले.
आयातीत सूर्यफूल तेल १०५ रुपये लिटर उपलब्ध आहे. जर एवढे स्वस्त तेल असेल तर सरकी आणि सोयाबीन तेलाला मागणी आणि दर कसे राहतील. ब्राझीलमध्ये तापमान जास्त असल्यामुळे सोयाबीन उत्पादकतेवर फरक पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तरी सुद्धा ४६०० रुपये सोयाबीन आणि ७००० ते ७५०० रुपयांपेक्षा कमी कापसाचे दर राहणार नाहीत, असेही विजय जावंधिया यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.