Cotton Rate
Cotton Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Rate : जानेवारीत कापूस दर वाढणार

अनिल जाधव

पुणे ः देशातील बाजारात मागील दोन दिवसांपासून कापूस दरात (Cotton Rate) मोठी घट झाली आहे. बाजार समित्यांमधील (Cotton Market) दरही क्विंटलमागे ५०० रुपयाने कमी झाले आहेत. तर वायद्यांमध्ये आज काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. कापूस दरावर पुढील काही दिवस दबाव राहू शकतो. मात्र जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात दरात सुधारणा होऊ शकते, अशा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.

देशातील बाजारात सध्या कापसाचे दर घसरले आहेत. सोमवारी वायदे जवळपास १७०० रुपयांनी कमी होऊन २७ हजार ३०० रुपयांवर बंद झाले होते. मात्र मंगळवारी दुपारी दोन वाजेपर्यंत वायद्यांमध्ये २०० रुपयांची सुधारणा झाली होती. कापसाचे वायदे २७ हजार ३०० रुपयांवर पोचले होते.

वायद्यांमध्ये कापूस दर कमी झाल्यानंतर बाजार समित्यांमध्येही दरात नरमाई पाहायला मिळाली. सोमवारी कापूस दरात क्विंटलमागे सरासरी ५०० रुपये घट झाली होती. मात्र मंगळवारी कापूस दर स्थिरावले. तर काही बाजारांमध्ये कापूस दरात वाढ पाहायला मिळाली. देशातील बाजारांमध्ये कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० रुपये दर मिळाला. तर राज्यातील बाजारांमध्ये सरासरी दरपातळी ७ हजार ६०० ते ८ हजार ३०० रुपये होती.

वायद्यांमध्ये हेजिंग केले जाते. एका महिन्यातील वायद्यांची मुदत संपली की हेजर्स, गुंतवणूकदार किंवा खरेदीदार पुढील महिन्यातील वायद्यांमध्ये पोझिशन घेतात, म्हणजेच वायदे करतात. पण सेबीने एमसीएक्सवर जानेवारी २०२३ आणि त्यापुढील महिन्यांचे वायदे आणण्यास अद्याप परवानगी दिली नाही. म्हणजेच वायदे रोल ओव्हर अर्थात पुढील महिन्यातील वायद्यांमध्ये पोझिशन घेता आली नाही.

त्यातच डिसेंबरचे वायदे ३० डिसेंबरला संपतात. त्यामुळे दीर्घकालीन करार वायद्यांमधून बाहेर पडले. म्हणजेच ज्यांना पुढील महिन्यात आपले करार न्यायचे होते त्यांना वायद्यांमधून बाहेर पडावे लागले. त्यामुळे विक्री वाढून दर कमी झाले. पण वायदे संपेपर्यंत कमी झालेले दर पुन्हा वाढू शकतात. म्हणजेच दर पूर्वपातळीवर येऊ शकतात, अशी माहिती वायदे बाजारातील अभ्यासकांनी दिली.

शेतकऱ्यांनी घाबरून न जाता पॅनिक सेलिंग टाळावे. शेतकऱ्यांनी ८ हजारांच्या कमी दरात कापूस विक्री करू नये. गरजेपुरता कापूस विकून शक्य असल्यास दर वाढेपर्यंत वाट पाहणेच सध्याच्या परिस्थितीत फायदेशीर ठरेल, असे आवाहन जाणकारांनी केले. चीनमध्ये कोरोना वाढल्याच्या बातम्यांचाही परिणाम बाजारावर जाणवत असल्याचे सांगितले जाते. चीन कापसाचा सर्वात मोठा ग्राहक असल्याने त्याच्या मागणीचा आंतरराष्ट्रीय बाजार आणि पर्यायाने देशातील बाजारावरही परिणाम होतो.

जाणून बुजून दर घटविले

वायद्यांमध्ये दर कमी झाल्याचा कांगावा करत व्यापाऱ्यांनी प्रत्यक्ष खरेदीतील दरही कमी केले. वास्तविक पाहता पोझिशन्स रोल ओव्हर अर्थात पुढील वायद्यांमध्ये नेता न आल्याने वायद्यांमध्ये दर तुटले. हा मुद्दा हेजिंगशी निगडित आहे. त्यात मागणी आणि पुरवठ्याचा संबंध नाही. मात्र प्रत्यक्ष खरेदीत जाणून बुजून दर कमी केले गेले. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सुट्ट्या सुरु आहेत. त्यामुळे तुलना करता येत नाही. तसेच सध्या बाजारातील आवकही जास्त आहे. या सर्व कारणांमुळे प्रत्यक्ष खरेदीत कापूस दर कमी झाले.

जानेवारीत दर सुधारण्याची शक्यता

आंतरराष्ट्रीय बाजारात ४ जानेवारीपासून व्यवहार सुरु होतील. चीनमधील कोरोनाचे चित्रही जानेवारीच्या मध्यापर्यंत स्पष्ट होईल. चीनच्या मार्केटमधून मागणी वाढेल की घटेल, याचा अंदाज स्पष्ट होऊ शकतो. त्यातच चीनचे नवीन वर्ष सुरु झाल्यानंतर येथील बाजारातून कापसाला उठाव वाढू शकतो, असा अंदाज आहे. देशातील जास्त आवकेचा दबाव कमी होईल. त्यामुळे जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून कापूस दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT