Maize Market
Maize Market Agrowon
ॲग्रोमनी

Maize Market : मक्याकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढणार का?

श्रीकांत कुवळेकर

श्रीकांत कुवळेकर

Maize Rate : मे उजाडायला आला तरी अजून अवेळी पाऊस आणि गारपीट शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर गहू, मका, हरभरा याबरोबरच शेवटच्या टप्प्यात कांद्याचे खूपच नुकसान झाले आहे.

काही आठवडे अगोदर प्रचंड आवक आणि त्यामुळे पडलेले भाव यांच्या तडाख्यातून बाहेर पडण्यापूर्वी लहरी हवामानाने घाव घातला आहे.

साधारणपणे अशा परिस्थितीत शेतीमाल बाजारपेठेत निदान किमती सुधारून बुडत्याला काडीचा आधार मिळतो. परंतु तूर, उडीद वगळता इतर शेतीमालाच्या किमती वधारण्याची अजूनही प्रतीक्षा आहे.

पावसाळा अजून दूर असला तरी खरीप हंगामाचे नियोजन आणि त्याची पूर्वतयारी लवकरच सुरू होईल. मागील हंगामात सोयाबीन आणि कापसाने निराशा केल्याने येत्या खरिपात क्षेत्र नियोजन करताना अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतील. सध्या चर्चेत असलेल्या तुरीला पहिली पसंती मिळण्याची शक्यता असली तरी इतर पिकांची निवड करताना मकादेखील महत्त्वाचा ठरणार आहे.

अलीकडेच दिल्ली येथे भारतीय व्यापार आणि उद्योग महासंघ या उद्योजकांच्या संघटनेने मका परिषद आयोजित केली होती. तिथे अनेक तज्ज्ञांनी आपली मते मांडली. या परिषदेमध्ये चर्चिल्या गेलेल्या आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या अशा विषयांचा गोषवारा आजच्या लेखामध्ये घेण्याचा प्रयत्न आहे. हेतू हा, की त्यामुळे सोयाबीन, मका आणि कापूस यामध्ये समतोल साधणे सोपे जावे.

मक्याचे वाढते महत्त्व

मका हे खरीप आणि रबी या दोन्ही हंगामांत घेतले जाणारे पीक आहे. गेल्या काही वर्षांत देशात आणि महाराष्ट्रात या पिकाची लागवड सातत्याने वाढत आहे. खरीप मका उत्पादनामध्ये मध्य प्रदेश देशात पहिल्या क्रमांकावर आहे. त्या पाठोपाठ महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.

रब्बी मका उत्पादनात बिहार आघाडीवर आहे. तर खरीप आणि रबी या दोन्ही हंगामांतील मका उत्पादन विचारात घेतले तर महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो.

राज्यातील पीक पद्धतीत मागील काही वर्षांत सोयाबीनने महत्त्वाचे स्थान पटकावले आहे. परंतु मकादेखील एक भरवशाचे नगदी पीक म्हणून उत्पादकांना आकर्षित करत आहे. बदलत्या हवामानामुळे आणि कमी होणाऱ्या पाण्याच्या उपलब्धतेमुळे मक्याचे क्षेत्र हळूहळू वाढत आहे.

परंतु मुख्यत: गेल्या दोन वर्षांत मक्याला चांगला भाव मिळाल्यामुळे मक्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. २०२२-२३ या पीक वर्षात भारतात मक्याचे ३४० लाख टन एवढे विक्रमी उत्पादन झाले असल्याचे सरकारी आकडेवारी दाखवत आहे. तर मक्याची निर्यात देखील ४० लाख टन एवढी झालेली आहे.

मक्याचा वापर मुख्यत: पशुखाद्य म्हणून होत असला तरी अलीकडील काळात मक्याला मानवी अन्न, प्लॅस्टिकला पर्यायी उत्पादने आणि इतर अखाद्य औद्योगिक उत्पादने तसेच ऊर्जानिर्मितीसाठी महत्त्वाचा स्रोत म्हणून अधिकाधिक महत्त्व प्राप्त होताना दिसत आहे.

त्यामुळेच मक्याला पारंपरिक पशूखाद्य क्षेत्रात वाढत्या स्पर्धेपासून फारसा धोका राहिलेला नाही. तसेच इतर उद्योगांमध्ये कच्चा माल म्हणून इतर कमोडिटीजचा वापर करण्याचा पर्याय उपलब्ध असला तरी सतत वाढत असलेल्या स्टार्च उद्योगाला मक्याशिवाय पर्याय नाही, असे मत या उद्योगाशी संबंधित व्यक्तींनी मांडले.

आपल्या देशात सध्या पेट्रोलमध्ये इथनॉलचे मिश्रण २० टक्क्यांपर्यंत वाढविण्याच्या धोरणाची अंमलबजावणी जोरात चालू आहे. इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी साखर उद्योगावर भिस्त ठेवण्यात आलेली आहे.

अतिरिक्त साखर उत्पादनामुळे किमतीत घसरण होऊन ऊस उत्पादकांचे पैसे देणे कठीण होण्याची परिस्थिती उद्‍भवू नये म्हणून आधीच मोठ्या प्रमाणावर ऊस इथनॉल उत्पादनाकडे वळवायचा असे हे धोरण आहे. परंतु सरत्या हंगामात उसाचे उत्पादन कमी झाल्यामुळे आणि जागतिक बाजारात साखरेच्या किमती वाढल्याने सरकारला महागाईकडे अधिक लक्ष द्यावे लागेल.

तसेच येत्या वर्षात एल-निनोमुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली तर उस उत्पादन कमी होऊन इथनॉल वापर धोरणाकडे नव्याने पाहिले जाण्याची शक्यता आहे. म्हणजे उसापासून इथनॉल उत्पादनाचे उद्दिष्ट कमी केल्यास ती कसर भरून काढण्यासाठी पर्यायी कच्चा माल म्हणून मक्याला महत्त्व येण्याची शक्यता आहे. यातून २०-३० लाख टन मक्याची अतिरिक्त मागणी निर्माण होण्याची शक्यता काही जाणकारांनी व्यक्त केली आहे.

या मका परिषदेला केंद्रीय कृषी सचिव मनोज आहुजा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी देखील मक्याच्या वाढत्या मागणीचा उल्लेख करतानाच हेही सांगितले की भारतात मक्याच्या उत्पादनात वेगाने वाढ होण्याची गरज आहे. लवकरच देशांतर्गत उत्पादन ४०-४५० लाख टनापर्यंत नेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यातून केंद्र सरकार मक्याकडे गंभीरपणे पाहत असल्याचे लक्षात येते.

राज्य सरकारचे धोरण

दिल्लीतील मका परिषदेत राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हेही उपस्थित होते. त्यांनी राज्यात मक्यावर आधारित प्रक्रिया उद्योग आणि इतर पायाभूत सोयीसुविधांसाठी पायघड्या अंथरल्याचे या वेळी सांगितले.

अनेक देशांतील प्रमुख मका प्रक्रियादार, बहुराष्ट्रीय कंपन्या, यू. एस. ग्रेन कौन्सिल आणि आंतरराष्ट्रीय व्यापार प्रतिनिधी यांच्याशी कृषिमंत्र्यांनी चर्चा केली आणि त्यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून कच्चा माल घेण्यासाठी आग्रह धरला.

तसेच राज्यातच मका साठवणूक, प्रक्रिया आणि व्यापारी संस्था उभारणीसाठी संपूर्ण सरकारी सहाय्य देण्याचे आश्‍वासन दिले. मात्र हे सर्व करताना कृषिमंत्र्यांनी केवळ मका-बहुल औरंगाबाद विभागातील आपल्या मंतदार संघापुरता विचार केला आहे की हे राज्याचे अधिकृत धोरण राहील, याबाबत स्पष्टता येण्याची आवश्यकता आहे.

अतिवृष्टी आणि प्रतिकूल हवामानात तग धरण्याची क्षमता तुलनेने अधिक असणाऱ्या मक्यासाठी आश्‍वासक वातावरण निर्माण करण्यासाठी अधिक जोमाने काम कऱण्याची आवश्यकता आहे. परंतु प्रसारमाध्यमांचे या विषयाकडे दुर्लक्ष होत आहे. प्रमुख माध्यमांनी कृषिप्रधान महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या असलेल्या परिषदेची दखलच घेतली नाही. परंतु याच काळात राज्यात सत्तांतरासंदर्भात चालू असलेल्या घडामोडींबद्दल कृषिमंत्र्यांच्या वक्तव्यांना मात्र भरपूर प्रसिद्धी मिळाली. असो.

दिल्लीतील मका परिषदेत विविध तज्ज्ञांनी जी मांडणी केली, त्याचा एकंदर सूर पाहता येत्या हंगामात सोयाबीन, कापसाच्या स्पर्धेत मक्याला देखील तेवढेच महत्त्व प्राप्त होईल, असे संकेत मिळत आहेत.

गेल्या काही वर्षांत देशात आणि महाराष्ट्रात मका पिकाची लागवड सातत्याने वाढत आहे. खरीप मका उत्पादनामध्ये मध्य प्रदेश देशात पहिल्या क्रमांकावर आहे. त्या पाठोपाठ महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.

राज्यातील पीक पद्धतीत मागील काही वर्षांत सोयाबीनने महत्त्वाचे स्थान पटकावले आहे. परंतु मकादेखील एक भरवशाचे नगदी पीक म्हणून उत्पादकांना आकर्षित करत आहे. बदलत्या हवामानामुळे आणि कमी होणाऱ्या पाण्याच्या उपलब्धतेमुळे मक्याचे क्षेत्र हळूहळू वाढत आहे. गेल्या दोन वर्षांत मक्याला चांगला भाव मिळाल्यामुळे मक्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

मका दृष्टिक्षेपात

- मका हे खरीप आणि रबी या दोन्ही हंगामांत घेतले जाणारे पीक.

- प्रमुख मका उत्पादक राज्यांमध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक आदी राज्यांचा समावेश.

- प्रतिकूल हवामानात टिकून राहण्याची क्षमता जास्त.

- देशात आणि राज्यात गेल्या काही वर्षांत मक्याच्या लागवड क्षेत्रात वाढ.

- मानवी अन्न, प्लॅस्टिकला पर्यायी उत्पादने आणि इतर अखाद्य औद्योगिक उत्पादने, ऊर्जानिर्मितीसाठी मक्याचा वाढता वापर.

- इंधनात इथेनॉल मिश्रणासाठीही मका उपयुक्त.

- गेल्या दोन वर्षांत मक्याला तुलनेने चांगला भाव.

(लेखक कृषी व्यापार व कमोडिटी मार्केटचे अभ्यासक, स्तंभलेखक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT