Maize Market Agrowon
ॲग्रोमनी

Maize Market : मका बाजारातील चढ उतार पावसावर अवलंबून!

Maize Rate : खरिपात विक्रमी पातळीवर पोचणारा मका सध्या मात्र हमीभावापेक्षा कमी दरात विकला जात आहे. यंदा रबी आणि उन्हाळ हंगामातील मका उत्पादन जास्त आहे.

Anil Jadhao 

Maize Production : खरिपात विक्रमी पातळीवर पोचणारा मका सध्या मात्र हमीभावापेक्षा कमी दरात विकला जात आहे. यंदा रबी आणि उन्हाळ हंगामातील मका उत्पादन जास्त आहे. पण दुसरीकडे मक्याला उठाव कमी दिसतो. तर निर्यातीची गतीही कमी झाली. याचा दबाव दरावर येत आहे.

सध्या मक्याला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. बाजारात मक्याचे भाव १ हजार ७५० ते १ हजार ८५० रुपयांच्या दरम्यान आहेत.

देशात यंदा मका उत्पादनात २२ लाख टनांनी वाढ झाली. यंदा रबीतील उत्पादन कमी झाले. पण उन्हाळी मक्याची भर पडली. यामुळे यंदा रबी आणि उन्हाळी मिळून १२४ लाख टनांचा पुरवठा झाला.

मागील हंगामात रबीतील उत्पादन १०१ लाख टन होते. यंदा खरिपातील मक्याला निर्यातीसाठी चांगली मागणी होती. त्यातच तेलबिया पेंडेचे भावही अधिक होते. यामुळे मक्याला देशांतर्गत उठाव चांगला होता. परिणामी खरिपातील मक्याने विक्रमी ३ हजारांचाही टप्पा गाठलेला आपण काही बाजारात पाहीला.

आंतरराष्ट्रीय बाजारात रशिया आणि युक्रेन युध्दामुळे निर्माण झालेल्या टंचाईमुळे भारतीय मक्याला मागणी होती. पण या दोन्ही देशांमधील माल काही प्रमाणात बाजारात आला. यामुळे दरात नरमाई आली. त्यातच इतर काही देशांमध्येही नवं पीक आलं.

एप्रिल आणि मे महिन्यात भारतीय मक्याला पाकिस्तानच्या स्वस्त मक्याची स्पर्धा होती. पाकिस्तानचा मका स्वस्त होता यामुळे भारतीय मक्याला कमी उठाव मिळाला. पण पाकिस्तानचे पीक कमी असते. यामुळे जास्त काळ ही स्थिती चालली नाही.

भारतीय मक्यालाही काही प्रमाणात निर्यातीसाठी मागणी वाढली. पण अपेक्षित पातळीवर मागणी वाढली नाही. त्यातच देशांतर्गत बाजारात सोयापेंड आणि इतर तेलबिया पेंडेचे भाव कमी झाल्याने मक्यावरही दबाव आला, असे उद्योगांच्या वतीने सांगण्यात आले.

जगात मका उत्पादनात अमेरिका आघाडीवर आहे. त्यानंतर चीनचा तर तिसऱ्या क्रमांकावर ब्राझील आहे. चालू हंगामात जगातिक मका उत्पादनात घट झाली होती. अमेरिकेतील उत्पादनात झालेली घट जास्त होती. सोबतच अर्जेंटीना, युरिपियन युनियन, युक्रेन या देशांमध्येही उत्पादन कमी झाले होते.

यामुळे त्यातच रशिया आणि युक्रेनमधून होणारा पुरवठा कमी होता. यामुळे दरवाढीला आधार मिळाला होता. पण आता नव्या हंगामात अमेरिका, चीन आणि ब्राझील या महत्वाच्या तीन्ही देशांमध्ये नवे पीक चांगले येण्याचा अंदाज आहे. याचा बाजारावर दबाव दिसतो.

आंतरराष्ट्रीय बाजारात काय चाललंय?

सध्या अमेरिकेत मका पिकाची स्थिती चांगली नाही. पण अमेरिकेच्या कृषी विभागाने उत्पादनात घट होईल असे म्हटले नाही. अमेरिकेतील काही भागांमध्ये पाऊस नाही. यामुळे पीक संकटात आहे. याचा परिणाम म्हणून अमेरिकेतील बाजारात मक्याचे भाव वाढले. पण ही वाढ शुक्रवारी कमी झाली.

मागील एक महिन्यात सीबाॅटवर मक्याचे वायदे जवळपास ७ टक्क्यांनी वाढले होते. शुक्रवारी दुपारी मक्याचे वायदे मागील तीन महिन्यांतील उचांकी ६.७३ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते. पण शेवटच्या सत्रात वायद्यांमध्ये सहा टक्क्यांची घट झाली आणि वायदे ५.८४ डाॅलरवर बंद झाले. बाजारात पुढील काळातही चढ उतार दिसू शकतात, असे जाणकारांनी सांगितले.

देशात काय भाव मिळत आहे

देशातील बाजारात सध्या रबी आणि उन्हाळी मका येत आहे. देशातील बाजारात मक्याचे भाव सध्या दबावातच दिसत आहेत. मक्याला बहुतांशी बाजारात हमीभावापेक्षा कमी भाव मिळतो. मक्यासाठी १ हजार ९६२ रुपये हमीभाव होता. पण बाजारात १ हजार ७५० ते १ हजार ८५० रुपयाने विकला जात आहे. हा भाव वाळलेल्या मक्याला मिळत आहे.

पण जास्त ओलावा असलेल्या मक्याचे भाव देशातील काही बाजारांमध्ये अगदी १ हजार ३०० रुपयांपासून सुरु होत आहेत. सध्या देशांतर्गत बाजार आणि निर्यातीसाठी मक्याला कमी उठाव आहे. त्यामुळे तुर्तास तरी मक्याच्या दरात मोठी तेजी येण्याची शक्यता दिसत नाही, असे अभ्यासकांनी सांगितले.

बाजाराला आधार मिळेल का?

पण यंदा एल निनोची स्थिती आहे. त्यामुळे पाऊसमान अनेक भागात सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. तसेच खरिपातील लागवडीही काहीशा उशीराने होत आहेत. त्यामुळे खरिपातील पाऊसमान आणि मका लागवड याकडे बाजाराचे लक्ष असेल.

तसेच अमेरिकेतील मका पिकाची स्थिती कशी राहते आणि उत्पादनाचे अंदाज काय येतात यावरूनही बाजाराची दिशा ठरेल, असे मका बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT