Nashik Maize News : शेतीच्या दृष्टीने पेरणीचा हंगाम अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. परंतु नेमक्या याचवेळी मजुरांची टंचाई निर्माण होत किंवा जादा पैसे देत पेरणी करून घ्यावी लागत असते.
यावर पर्याय म्हणून नवनवीन पेरणी यंत्रे आल्याने शेतकरी त्यांचा अवलंब करू लागल्याने मजुरीत मोठी बचत होऊ लागली आहे. मका पेरणीसाठी देवळ्यामध्ये अशाच नवनवीन यंत्रणाचा वापर वाढला आहे.
तालुक्यात गिरणा नदीकाठावरील अनेक शेतकरी मका पेरणीसाठी मका टोकन यंत्राचा वापर करू लागले आहेत. कसमादे पट्ट्यात दरवर्षी मका लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. गिरणा काठावरील अनेक शेतकरी तर मॉन्सूनच्या पावसाआधीच मका पेरणी करतात. ही लागवड पूर्वी पारंपरिक पद्धतीने केली जात होती.
यासाठी हंगामात शेतमजुरांची टंचाई असते. अशावेळी अनेकदा जादा मजुरी देऊन शेतकऱ्यांना आपली पेरणी करावी लागायची. मात्र आता मका पेरणी जलद गतीने व्हावी यासाठी येथील शेतकऱ्यांकडून मका टोकन यंत्राचा वापर वाढला असून हे यंत्र प्रभावीदेखील ठरत आहे.
सव्वा ते दीड तासात एक माणूस या यंत्राद्वारे एकरभर मका पेरणी करू शकतो. बियाणे एका विशिष्ट अंतरावर पडत असल्यामुळे मजूर, वेळ आणि बियाण्याचीही बचत या यंत्राने होते, असे शेतकऱ्यांनी सांगितले. सावकी-विठेवाडी शिवारातील प्रगतिशील शेतकरी धनंजय बोरसे यांच्यासह अनेक शेतकरी या पेरणी यंत्राने मका पेरणी करत आहेत.
वाढती मजुरी व मजूर टंचाई याला पर्यायी व्यवस्था म्हणून शेतकरी सुधारित यंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसून येत आहेत. सध्या गिरणा नदीचे शेवटचे आवर्तन सोडले असल्याने नदीकाठाच्या विहिरींना मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे लोहणेर, सावकी, विठेवाडी, भऊर, खामखेडा परिसरात खरीप हंगामातील मका पेरणीला वेग आला आहे.
काही शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काही प्रमाणात मका पेरणी केली आहे. तर काही शेतकरी आता पेरणी करत आहेत.
मका बियाण्यांचे भाव वाढल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर आहे. आधीच कांद्याला भाव नाही, त्यात कांद्याचे अनुदान नाही आणि बियाण्यांचे भाव वाढलेले आहेत. किमान मजुरी तरी वाचावी यासाठी या यंत्राचा वापर करत घरच्या घरी मका पेरणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.