Village Development Plan Agrowon
ग्रामविकास

Village Development : तयार करा गावाची कुंडली...

Rural Infrastructure : गावाच्या शाश्वत विकासासाठी नियोजन आणि धोरणात संतुलन असणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे गरजा आणि समस्या या पाणी, शेती, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास इ. भोवती सामावलेल्या असतात. त्यांचे नियोजन येत्या काळात महत्त्वाचे आहे.

Team Agrowon

डॉ. सुमंत पांडे

Rural Innovation : गावाच्या विकासाचा विचार करत असताना धोरणकर्ते आणि कारभाऱ्यांनी तसेच अंमलबजावणी करणाऱ्यांनी गावाकडे तटस्थपणे आणि नि:पक्षपातीपणे पाहिले पाहिजे. कारण गावाच्या शाश्वत विकासासाठी नियोजन आणि धोरणात संतुलन असणे आवश्यक आहे. गावाचा पंचायत आणि पंचक्रोशीचा विचार केला असता आजपर्यंतच्या काळात भरीव आणि शाश्वत असे काम नक्कीच झालेले आहे. तथापि, कालानुरूप त्याचप्रमाणे जीवनशैली आणि इतर बाबींमुळे त्यात काही इष्ट आणि बरेचसे अनिष्ट बदल झालेले आहेत. त्याचाही मागोवा घेणे गरजेचे ठरते.

आजचे गाव

गावातील संसाधनामध्ये नैसर्गिक, संसाधन आणि आर्थिक संसाधन यांचाही ताळमेळ गरजेचा ठरतो. आजच्या समस्या, गरजा आणि असलेल्या संसाधानातून त्याची किती गरज भागते इत्यादीचा ताळमेळ घालावा लागतो. सर्वसाधारणपणे गरजा आणि समस्या या पाणी, शेती, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास इ. भोवती सामावलेल्या असतात.

कालचे गाव

गावची आजची स्थिती काय आहे, हे तर ज्ञातच आहे; तथापि गावची एक शतकापूर्वीची स्थिती काय होती आणि पुढील किमान ४ ते ५ दशकांनंतर काय असेल, याचा अचूक अंदाज करता येणे गरजेचे आहे.

गावाचा पूर्वेतिहास किंवा कालचे गाव

आपल्याला गावात आणि पंचक्रोशीत आजही अस्तित्वात असलेल्या काही जुनी आणि प्राचीन इमारती, बरवा, कुंड, मंदिर, इत्यादी गोष्टींनुसार लक्षात येतील. गावातील ज्येष्ठ, जुनी जाणती मंडळीदेखील त्यांच्या स्मरणातील गावची स्थिती सांगू शकतात. गावचे वैभव आणि इतिहास सांगणारे काही साहित्य, ग्रंथही असतात, ज्यामधून आपल्याला समकालीन संदर्भ मिळतात. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याचे एक गॅझेटिअर ज्याला भौगोलिक नावांचा कोश अथवा स्थळवर्णन कोश म्हणतात. हा कोश जिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध असतो. त्याच प्रमाणे आता ऑनलाइनदेखील उपलब्ध आहे. त्यातूनही जुने संदर्भ मिळतात.

उद्याचे गाव

गावाचा पुढच्या ते चार ते पाच दशकाचा विचार करायचा असेल तर त्यासाठी कारभाऱ्यांच्या सोबत अनुभवी आणि तंत्र कुशल मंडळींची गरज नक्की जाणवते. आता उपग्रहाचे तंत्र आपल्याला सहज उपलब्ध आहे. त्याचा वापर नक्की करता येतो. त्याच प्रमाणे जे बदलणारी मानके आहेत जसे की लोकसंख्या, इत्यादी आपल्याला संकेत स्थळावरून मिळू शकतात.

दुष्काळ काल आज आणि उद्या

दुष्काळाची स्थितीचे विवेचन करावयाचे ठरविल्यास १९७२ चा दुष्काळ हा आपल्याला लगेच आठवणारा आहे. त्यावरूनच आजचा दुष्काळ काय आहे किंवा आजच्या पाण्याचे गांभीर्य काय आहे, याचा अभ्यास केला असता पुढील ४ ते ५ दशकानंतर दुष्काळाची स्थिती काय असेल याचा अंदाज बांधता येतो. तथापि, त्या वेळेस जलधरामध्ये पाण्याचा विपुल साठा होता. मागील दशकांमधल्या दुष्काळाची स्थिती पाहता नेमकी उलटी परिस्थिती लक्षात येते. पर्जन्याचे विचलन आणि अवर्षण हे दुष्काळाचे कारण त्यावेळेस होते आणि आजची ही तेच आहे.

निष्कर्ष

मागील ५० वर्षांमध्ये आपण भूगर्भातून प्रचंड प्रमाणात पाण्याचा उपसा केला होता. वाहतूक आणि दळणवळणाची साधने आणि उपलब्धता असल्यामुळे अन्नधान्याची टंचाई १९७२ च्या तुलनेत कमी होती.

भविष्यातील दुष्काळी स्थितीचे आकलन

दुष्काळाच्या स्थितीमध्ये आजपासून किमान ५० वर्षांनी गावची लोकसंख्या काय असेल? तर ती जन्म आणि मृत्युदराचे प्रमाण पाहता आजच्या लोकसंख्येच्या दुप्पट असेल असे अभ्यासक सांगतात.

जनावरांची संख्या आहे तेवढीच राहील किंवा कमी होईल. कारण मागील ३ ते ४ पशुधन गणनेनुसार फक्त उपयुक्त पशूंची संख्या वाढलेली दिसते. अन्य पशूंची संख्या कमालीची घटलेली आहे.

लागवडीखालील जमिनीचे क्षेत्र नक्की कमी झालेले असेल. आजची वृक्षांची जी संख्या आहे ती कदाचित निम्म्यावर येऊ शकेल.

हवामान बदलामुळे पर्जन्याचा स्वभाव अजून बदललेला असेल.

आता आपण तीनही कालखंडांतील गावाच्या स्थितीचे वरील माहितीच्या आधारे विश्‍लेषण करूयात.

येणाऱ्या दुष्काळामध्ये आपल्या गावची परिस्थिती गंभीर स्थितीकडून अति गंभीर स्थितीकडे जात असल्याचे स्पष्टपणे दिसते. अन्नधान्य कदाचित इतर भागांतून अथवा इतर देशांतून शासन आणूनही देईल. मात्र पिण्याच्या पाण्याचे काय? गावातील जलस्रोत आटलेले असतील. भूगर्भातील पाणी अतिउपसा केल्यामुळे संपलेले असेल. वृक्षराजी नसल्यामुळे पर्जन्यजलाचे रूपांतर भूजलामध्ये होण्याचे प्रमाण नगण्य असेल. मातीची ओल धरून ठेवण्याची क्षमता संपलेली असेल. अशा स्थितीमध्ये उत्पादकता, उत्पादन आणि आर्थिक स्थितीचा अंदाज बांधला असता परिस्थिती विषण्ण करणारी आहे, असेच दिसते.

... नेमकी काय तयारी करावी?

दुष्काळी स्थिती येणार आहेत असे समजून आपल्याला आजपासून तयारी करावी लागेल. पाणी टंचाईचे नियोजन करायचे असल्यास पावसाळा आणि पाणलोट समजून घेणे आवश्यक ठरते.

जलस्रोतांचे चिन्हीकरण आणि सीमांकन

रस्त्यांचे जाळे वाढलेले दिसेल तथापि त्यामध्ये पाण्याच्या प्रवाहाला प्रत्येक ठिकाणी थांबवलेले असणार आहे. त्यामुळे गावागावांत पावसाळ्यात पूरजन्य स्थिती असेल. नद्या केवळ पावसाळ्यात वाहणाऱ्या असतील आणि नदीतील पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झालेले असेल.

पाण्यालाही रस्ता हवा

भौतिक आणि पायाभूत सुविधा उभारताना पाणी आणि पाणलोटाचा विचार क्वचित केला जातो. काही ठिकाणचे तलाव अतिक्रमण झाल्याने संपले आहेत. ओढे, विहिरी बुजल्या गेल्या आहेत. अनेक शहरातून नद्या नष्टप्राय होत आहेत. यासाठी नियोजन करत असताना पाण्याला रस्ता मोकळाच पाहिजे.

मूलभूत सुविधांची उभारणी

आजच्या विकासाच्या व्याख्येमध्ये बसणाऱ्या मूलभूत सुविधांची उभारणी उदाहरणार्थ रस्ते, इमारती यांची उभारणी करत असताना त्या ठिकाणी ओढे, नाले, रस्ते, झरे, तलाव, नदी ही शाश्‍वत जलस्रोत ओळखून त्या जलस्रोतांचा अबाधित ठेवणे क्रमप्राप्त आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब आपल्याला कसा सामावून घेता येईल याचाही विचार करणे गरजेचे आहे.

पाण्याचे नियोजन

पाण्याची मागणी सातत्याने वाढतच जाणार आहे यात शंका नाही. शासकीय धोरण आणि शासनाने केलेल्या गुंतवणुकीच्या आधारे पायाभूत सुविधांचा विकास होणार आहे. आणि येणाऱ्या आणि असलेल्या उद्योग व्यवसायासाठी देखील पाणी लागणार आहे. त्यातून निघणारे सांडपाणी किती, याचा विचार करावा. बदललेल्या जीवनशैलीमुळे प्रदूषित पाण्यामध्ये कोणते घटक अधिक आहेत या सर्वांशी जाण असणे गरजेचे आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पाणी

गावाच्या नियोजनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होऊ शकतो का, याबाबत तज्ज्ञांचे अहवाल सांगतात, की सकारात्मक आणि उपयुक्तता निश्चितच आहे. नुकत्याच एका अभ्यासात सुमारे एक शतकानंतरच्या एका शहराच्या स्थितीचे आकलन करणारा नकाशा आणि छायाचित्र समाज माध्यमावर आपण पाहिले. ज्यामध्ये पाण्याची स्थिती अत्यंत भयावह होती. प्रदूषणाने आपली परिसीमा गाठलेली होती. सांडपाणी, घनकचरा आणि निर्माण होणारा इलेक्ट्रॉनिक कचरा यांचे प्रमाण मर्यादेच्या बाहेर झाल्याचे दिसले.

विकासाचे संतुलन हे आव्हान

विकासाचा विचार करत असताना व्यक्ती केंद्रित किंवा मानव केंद्रित विकासाच्या परिघाच्या बाहेर जाऊन निसर्ग केंद्र विकासाची आखणी करणे गरजेचे आहे. आपल्या गावकुसातील अथवा पंचक्रोशीतील नद्या या अविरत निर्मल आणि अतिक्रमणमुक्त असतील. गावातले जलस्रोत अतिक्रमण मुक्त असावेत. त्यातील पाण्याचा काटकसरीने वापर करता आला पाहिजे.

आधुनिक तंत्रज्ञान त्याचा सिंचनासाठी उपयोग करून, आहे त्याच पाण्यामध्ये अधिक उत्पादन आणि उत्पन्न कसे मिळेल याकडे आपल्याला लक्ष केंद्रित करता येऊ शकेल. थोडक्यात, भविष्यामध्ये आपल्याला पाण्याची उपलब्धता निश्‍चितच वाढवावी लागणार आहे. तथापि, पाण्याची मागणी आपल्याला नियंत्रित अथवा कमी करणे गरजेचे ठरते. त्याचप्रमाणे सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून असे पाणी सिंचन आणि इतर कामासाठी वापरता येऊ शकेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT