School Development Agrowon
ग्रामविकास

Village Development : संत्रा बागेसह आदर्श शाळेसाठी नाव मिळवलेले बोर्डी गाव

Team Agrowon

गोपाल हागे

अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यातील बोर्डी या पाच हजारांवर लोकसंख्या असलेल्या गावात प्रवेश करता क्षणीच संपन्नतेची जाणीव होते. टुमदार इमारती, गल्लोगल्ली दुचाकी, चारचाकी वाहने पाहण्यास मिळतात. शेतशिवारात सिंचनाची सोय असल्याने बहुतांश शेतकऱ्यांचा फळबागांकडे असलेला कल लक्षात येतो.

दोन दशकांपेक्षा अधिक काळापासून गावातील शेतकऱ्यांनी संत्रा पीकपद्धती जोपासली असून, शेतकरी या पिकात तज्ज्ञ झाले आहेत. पावणेदोनशे हेक्टरपेक्षा त्याचे जास्त क्षेत्र गाव परिसरात असावे. गेल्या काही वर्षांत अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या. मात्र शेतकऱ्यांनी जिद्दीने प्रयोगशीलता जोपासली. व्यापारी सौदे करण्यासाठी थेट बांधावर येतात. त्यातून दरवर्षी मोठी उलाढाल होते. संत्र्यासह सफेद मुसळीचीही शेती दिसून येते.

मंदिराची प्राचीन परंपरा

बोर्डी गावात प्राचीन नागास्वामी महाराज मंदिर आहे. त्यास ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. दरवर्षी श्रावणात तिसऱ्या सोमवारी धारगड यात्रेला विदर्भातून हजारो भाविकांची मांदियाळी होते. शेकडो वर्षांची रथ मिरवणुकीची परंपरा येथे आहे. माघ शुद्ध सप्तमीला गजानन महाराज प्रकटदिन, गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी, संत नागास्वामी महाराज बर्शी कार्यक्रम आदी कार्यक्रम नित्यनेमाने साजरे होतात.

गावातील नियोजित कामे

सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन

मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण

अंतर्गत पेव्हबर ब्लॉक्स.

दफनभूमी, दलित वस्ती विकास.

१५ किलोमीटर पांदण रस्ते.

शैक्षणिक सुविधा

आज अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांच्या इमारतीची दुरवस्था झालेली दिसून येते. मात्र बोर्डी येथे उभारलेली जिल्हा परिषदेची वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा आदर्शवत आहे. गावकऱ्यांचा लोकसहभाग, लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांचे सहकार्य व शिक्षकांचा पाठपुरावा यातून ती उभी राहिली. शाळेच्या जुन्या इमारतीचे नूतनीकरण करून आठ नव्या वर्गखोल्या बांधल्या. शाळेला महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची (MIEB.) संलग्नता प्राप्त झाली. पहिली ते १० वीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. यात अंगणवाडी, ‘कॉन्व्हेंट’, पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषद केंद्रीय मराठी शाळा आहे.

आठवी ते दहावीपर्यंत श्री गुरुदेव विद्या मंदिरात शिक्षणाची सोय आहे. हे विद्यालय म्हणजे गुरुकुंज आश्रम मोझरी येथील राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज संस्थेची शाखा आहे. येथील शिक्षक व विद्यार्थी भगवी टोपी घालून शाळेत येतात. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून पेव्हर ब्लॉक्स बसविले. मुख्याध्यापकांच्या पुढाकारातून स्वच्छतागृहांची दुरुस्ती झाली. लोकवर्गणीतून तारेचे कुंपण परिसराला झाले. शाळा हळूहळू सजली. सुंदर प्रवेशद्वार व प्रशस्त ‘पेन्सिल गेट’ झाले. इमारतीतील व्हरांडा व अन्य ठिकाणी बोलकी (Interactive) चित्रे रंगविण्यात आली. त्यात ‘स्टोरी बोर्ड’,

गणितीय सूत्रे, प्रतिके, पायऱ्यांवर सुभाषिते व परिपाठ फलक तयार करण्यात आले. ‘मिस्टेरियस वॉल’, ‘एज्युकेशन पार्क’ आदी संकल्पनांना आकार देण्यात आला. प्रत्येक वर्गखोलीत साहित्य कोपरे व ‘मोटिव्हेशनल बोर्ड’ आहे. सर्व वर्गखोल्या डिजिटल आहेत. जिल्हा परिषदेमार्फत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी भेट देत कौतुक केले आहे.

स्वच्छता, महिलांचा सर्वांगीण विकास, अपूर्ण कामे शासनाच्या माध्यमातून लवकर व्हावीत तसेच गावातील विकासाला चालना देण्यासाठी ग्रामपंचायत सातत्याने प्रयत्नशील आहे
स्वाती चंदन, सरपंच, बोर्डी
गावातील सांडपाणी भूमिगत करणे, पथदिवे आदी सुविधा देण्यात येत आहेत. मातोश्री पांदण रस्ता योजनेअंतर्गत तीन किलोमीटर शेतर स्ता तयार झाला आहे. आणखी १५ किलोमीटरचे रस्ते प्रस्तावित आहेत.
राजेश भालतिलक, ९८२२२२५७७७ (उपसरपंच)
लोकसहभागातून नावीन्यपूर्ण असे शाळेचे वाचनालय आहे. शिष्यवृत्ती, नवोदय व अन्य स्पर्धा परीक्षांमध्ये शाळेचे विद्यार्थी दरवर्षी पात्र होतात. वर्ग, शाळा व गावस्तरावर विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारी शाळा म्हणून नाव तयार झाले आहे. बाहेरील शिक्षक, शिक्षण तज्ज्ञ, अधिकाऱ्यांनी शाळेला भेटी देत माहिती घेत असतात.
उमेश चोरे, ९७६३३०२८९२ (मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा)
संत्रा पिकाने गावाला नवी ओळख मिळवून दिली आहे. शेतीतून पैसा मिळू शकतो हा विश्‍वास निर्माण झाल्याने गावातील तरुण मुले शेतीकडे वळत आहेत.
सुभाष तळोकार
सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले बोर्डी गाव बऱ्याच गोष्टींमुळे ओळखले जाते. कधी काळी सफेद मुसळी पीक काय आहे याची फारशी माहिती कोणाला नव्हती. सुरुवातीपासूनच शेतीत काही तरी नवे करावे या विचाराने सतत अभ्यास करून या वनौषधीबद्दल माहिती मिळवली. सातपुड्याच्या जंगलामध्ये येणारे पीक आपल्या शेतातही येऊ शकते हे आम्ही दाखवले. त्यामुळे बोर्डी गावाला वेगळी ओळख मिळाली. शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला त्यातून चालना मिळते आहे.
जगन्नाथ धर्मे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT