Milind Rangrao Patil : माझ्यातला लेखक जागविण्याची गोष्ट

Agrowon Diwali Ank : एकीकडे वयाच्या चाळिशीपर्यंत शब्दशः संपूर्ण चकचकीत शहरी व्यावसायिक आणि नंतर पूर्ण गावगाड्याशी आणि शेतीमातीशी एकरूप झालेला शेतकरी, असे हे दोन भाग.
Milind Rangrao Patil
Milind Rangrao PatilAgrowon
Published on
Updated on

आबाजी ऊर्फ मिलिंद रंगराव पाटील

माझ्या आयुष्याचे बरोबर दोन भाग आहेत. एखाद्या सिनेमाच्या मध्यंतरापर्यंतचं एक आणि मध्यंतरानंतर संपूर्ण वेगळं कथानक असावं तसे. पण तरीही या दोन्ही आयुष्यांच्या प्रेरणा मात्र त्या त्या क्षणी पराकोटीच्या मनस्वी राहिल्यात. एकीकडे वयाच्या चाळिशीपर्यंत शब्दशः संपूर्ण चकचकीत शहरी व्यावसायिक आणि नंतर पूर्ण गावगाड्याशी आणि शेतीमातीशी एकरूप झालेला शेतकरी, असे हे दोन भाग.

इकडे शेतजमीन खरेदी केली आणि आता आपण शेती कसायची व केवळ शेतकरी म्हणून उरायचं असं ठरवून आलो. उर्वरित आयुष्य जगायचं ते केवळ निसर्गाला पार्टनर करूनच. जेवढी शांत सरळसाधी जीवनशैली आहे ती तत्काळ अवलंबायची... जगण्यात आलेली बेसुमार रखरख हद्दपार करायची... असे तमाम मनसुबे मनात होते. आणि तसं नवं आयुष्य सुरू केलंसुद्धा.

इकडे येताना माझ्यातला कवी, लेखक, छायाचित्रकार असा छंदिष्ट कुटुंबकबिला सोबत असला, तरी प्रत्यक्ष मातीत राबताना यांचा मला काडीचाही उपयोग होणार नव्हता, हे मी जाणून होतो. कारण ही नुसती बोलघेवडी आणि वरवरचा आनंद देणारी अवजारं मातीजवळ काय कामाची? माती तर केवळ शरीरश्रम मागायची.

Milind Rangrao Patil
Women Empowerment : मिळून साऱ्याजणी, घालू आकाशाला गवसणी

त्यामुळे शहरी जीवनात तोवर ज्याचा भरपूर रियाज झाला होता त्या आयुष्यातले ते हवापाण्याच्या गप्पांचे अड्डे, राजकीय टीकाटिप्पणीने भरलेले हिरिरीचे युक्तिवाद, एरंडाची गुऱ्हाळं वाटावीत असे वादविवाद, निव्वळ टाइमपास टाइपची व्याख्यानं, त्यातली ती आभासी उद्‍बोधक प्रबोधनं अशातच जास्त वेळ सरायचा. कधी कधी खूप गंभीर, निराशेचं नाहीतर अगदीच अत्यानंदाचं काही घडलं असलं तर ते साजरं करायला किंवा तावातावाने त्यावर बोलायला म्हणून आम्ही बारमध्ये बसायचो.

आपल्या जीवनमरणाशी काडीचाही संबंध नाही, अशा विषयांवर मध्यरात्रीपर्यंत पदरचे पैसे खर्च करत भंकस चालवून घरी परतायचो. या वर्तनातले विरोधाभास उत्तररात्री जडत्वाच्या अवस्थेतही मनाला बोचत राहायचे. परिणामी, सगळ्यांचा एक उबग येत चालला होता. आपल्यातल्याच या दांभिकपणाचा खोलखोल राग पण अधूनमधून येत राहायचा. तिकडच्या आयुष्यात मी व्यावसायिक आणि माध्यमातला मुक्त छायचित्रकार सुद्धा राहिलोय. वर्तमानपत्रात पोटतिडकीने वाचकांची पत्रे लिहीत होतो. कित्येक लेख लिहिले.

Milind Rangrao Patil
Sugarcane Rate : आमदार प्रकाश आवाडे आणि स्वाभिमानी महिला आघाडीत खडाजंगी, आवाडेंना महिलांचे आव्हान

जे आज वाचताना केवळ ओढाताण केलेला खटाटोप वाटतात. तेव्हा मात्र त्याबद्दल छान छान, सुंदर सुंदर अशा वाचक प्रतिक्रियांनी क्षणिक हुरळायला व्हायचं. आपण प्रसिद्ध होत आहोत हे मनाला गालावरच्या मोरपिसासारखं वाटत राहायचं. पण रात्रीअपरात्री अंतरीचं खरं वैषम्य गदगदा हलवून मला जागवायचं. गोपुरावर रोषणाई आणि गाभाऱ्यात मात्र घुसमट, अशी मनाची काहीतरी चमत्कारिक अवस्था असायची. तो जुनाट कोंडमारा मिटण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालला होता.

त्यातच ‘रोजमर्राची जिंदगी गुजाराय’ला भरपूर पैसा हवाच ना शहरी लाइफमध्ये? तर त्या वाढत चाललेल्या प्रापंचिक (?) गरजांसाठी आवश्यक अर्थिक स्रोतासाठी इतर नाना उद्योग करावे लागायचे. म्हणजे नुसतं धाव.. धाव... मॅरेथॉन कर नी कमव..! अवघ्या जिंदगानीतली गाणी हरपल्यासारखं जीवनाचं असं अजब डिझाइन बनत चाललं होतं.

याच्याही खूप आधी जेव्हा कुणीच नव्हतो, म्हणजे बापाच्या जिवावर जगण्याच्या काळात, शाळा-कॉलेज जीवनात कविता नी ललित लेखनात रमलो होतो. मराठी हाच एकमेव मनापासून आवडता विषय होता. बाकी कुणाशी नाही जमलं माझं. पण खूप स्वप्नील दिवस वाटायचे ते. तरीही ते लेखन सतत काल्पनिक, आभाळातलं, हाताला न येणारं वाटत राहायचं. वाढत्या वयाबरोबर एक मऊसूत रुखरुख जी हळूहळू पारंबीएवढी मजबूत बनत चालली होती, की आपण असं काहीच करत नाहीये, की ज्यामुळे आपल्याला आयुष्याकडे बघताना स्वतःलाच प्रेरणा मिळेल. किंवा मनातल्या त्या रोजच्या कित्येक चिंता मरणातलं आपलं एक मरण तरी कमी होईल.

असं काहीच घडत नव्हतं जे जास्त काळ स्वतःला आनंद देणारं ठरेल. त्यामुळे जे करतोय त्याचं समाधानच लाभत नव्हतं. स्वतःकडून ज्या अपेक्षा होत्या त्याच्या जवळपाससुद्धा आपण नाही आहोत, ही टोचणी लागून रात्ररात्र जागून निघायची. दिवसेंदिवस जिकडे तिकडे जगण्याच्या नुसत्या शर्यतीच वाढत चालल्या होत्या. अशा काही शर्यतीत मनाविरुद्ध भाग पण घ्यावा लागायचा. पण जगण्याला येत चाललेला हा भारंभार वेग नकोसा वाटत होता. त्यामुळे तो नियंत्रित करून शांतावणारं आयुष्य जगणं जमवायला मला गावाकडे येऊन जास्त आटापिटा करावा लागलाच नाही. एखाद्या फास्ट ट्रेनमधून निर्मनुष्य स्टेशनावर उतरावं आणि उबग आणणाऱ्या वेगातून सुटकेचा आनंद व्हावा असं झालं होतं. त्यामुळे अक्षरशः एका रात्रीत माझं आयुष्य बदललं.

(सविस्तर वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com